Header Ads Widget

मोर्शी तालुक्यांतील १७ गावातील शेतकऱ्यांना नुकसानीच्या मदतीची प्रतीक्षा !

  * शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ मदत जमा न झाल्यास रुपेश वाळके यांचा आंदोलनाचा ईशारा !
  * मोर्शी तालुक्यातील शेतकरी संतप्त ; मोठे आंदोलन होण्याची शक्यता !
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  मोर्शी तालुका प्रतिनिधी : मोर्शी तालुक्यांमध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र १७ गावातील शेतकऱ्यांच्या बँक याद्याच तयार न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते झालेच नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ही प्रक्रिया सोपी असली तरी सदर कामाला ग्राम सेवक राज्य संघटनेचा बहिष्कार असल्यामुळे प्रशासनाच्या असहकारामुळे व काही कृषी सहायक, तलाठी यांच्या वेळकाढू पणामुळे मोर्शी तालुक्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी व्यक्त केली.

  राज्य शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची घोषणा केली. त्यानंतर जिल्ह्याकडे मदत वळती झाली. मात्र ग्रामसेवक आणि कृषी सहायकाच्या असहकार आंदोलनानंतर काही ग्रामसेवक कृषी सहायकांनी खाते नंबरच्या याद्या तयार करण्याचे कामच केले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोर्शी तालुक्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जवळपास १७ गावातील शेतकऱ्यांच्या खाते नंबर च्या याद्या काही ग्रामसेवक व काही कृषी सहायकांनी अजून पर्यंत तहसीलदार यांना सादर केलेल्या नसल्यामुळे मोर्शी तालुक्यातील १७ गावातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित असून त्यांची दिवाळी अंधारात गेली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांच्या नेतृत्वात संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला व प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात आला.

  मोर्शी तालुक्यातील गोराळा, भिलापूर, सालबर्डी, घोडदेव खुर्द, घोडदेव बु. डोंगर यावली, दापोरी, उमरखेड, रसलपूर, बेलखेडा, कासमपूर, पातूर, विठ्ठलपूर, डोमक, घोडगव्हान, इस्माईलपूर, दाभेरी येथील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची मदत जमा झाली नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे या तालुक्यात ग्रामसेवकांनी खाते नंबरच्या याद्या दिल्याच नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मोर्शी तालुक्यात काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या १७ गावांमध्ये पैसे वळते झालेच नाही.

  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी तत्काळ मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली असून प्रशासनाला जाग येऊन लवकरात लवकर अतिवृष्टी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल का हा खरा प्रश्न आहे. ही प्रक्रिया सोपी असली तरी ग्रामसेवकांच्या असहकारामुळे शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यासोबतच परतीच्या पावसानेही नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली दिवळीआधी मदत मिळाली असतील तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. मात्र, तसे झाले नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली असून. यावेळी तहसीलदार गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी यांनी तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक उमेश गुडधे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंकुश घारड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, विलास ठाकरे, गजानन वानखडे, शुभम तिडके, गोलू काळे, श्रीकांत गावंडे, राहुल उघडे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. मदत तातडीने देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही रुपेश वाळके यांनी यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या