Header Ads Widget

परिवहन विभागातर्फे बाईक रॅलीद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : जागतिक अपघातग्रस्त स्मृतिदिनानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षाविषयक जनजागृतीसाठी शहरात आज मोटरसायकल रॅली काढण्यात आली. त्यात ५० परिवहन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

    अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबविला जातो. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. गित्ते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागडी, सहायक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके, निरीक्षक वैभव गुल्हाने यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

    शहरातील इर्विन चौक, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, पंचवटी चौक अशा प्रमुख ठिकाणांना रॅलीने भेट देत रस्ता विषयक सुरक्षितता व दक्षतेबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीने टोलनाक्यांनाही भेट देऊन रस्ता सुरक्षितता नियमांची पत्रके वाहनचालकांना वाटण्यात आली. रॅलीत परिवहन विभागाचे ५० अधिकारी व कर्मचारी बाईकवर हेल्मेटसह सहभागी झाले होते.

    नांदगावपेठ टोल नाक्यावर रस्ता सुरक्षा प्रबोधन कार्यक्रम झाला. त्यात विविध वाहनचालक, एसटी महामंडळ कर्मचारी व प्रवासी अशा सुमारे दीडशे व्यक्तींनी सहभाग नोंदवला. यावेळी सर्वांनी दक्षता पालनाबाबत प्रतिज्ञाही घेतली. अपघात टाळण्यासाठी सर्वांनी दक्षता नियमांचे संघटितपणे पालन करूया, असे आवाहन यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. गित्ते यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या