स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना पहिला मान मिळाला. नेहरुजींना भारतीय इतिहासात महत्वाचे स्थान आहे.पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबादमध्ये झाला.त्यांची जयंती आपण बालक दिन म्हणून साजरी करतो. नेहरूंना गुलाबाची फुले आणि लहान मुले खूप आवडायची.बालक दिन आपला एक उत्सव आहे असे म्हणावे लागेल.कारण बालक म्हणजे उद्याचे भविष्य ही महान विचारसरणी नेहरूंची होती. स्वतः नेहरूनी आपले प्राथमिक शिक्षण घरीच खासगी शिक्षकांकडून घेतले. पंडित नेहरू शालेय जीवनात खूप हुशार व जिद्दीच्या जोरावर पुढे जाऊ लागले. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ते इंग्लंडला गेले.त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेऊन विद्यापीठातून त्यांनी नैसर्गिक विज्ञानात पदवी प्राप्त केली.ते भारतात परत आले.आणि भारतीय राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थी दशेत असतानाही नेहरूंनी अन्यायाचा प्रतिकार केला.परकीय जुलमी राजवटीमुळे देशांच्या नुकसानीचे पडसाद उमटले. तेव्हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सहभाग होता. आपण भारतात स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होण्यावाचून पर्याय नाही हे त्यांना कळून चुकले होते.
स्वतः पुढाकार घेऊन परकीय लोकांच्या हातून देशाला वाचविण्यासाठी ते काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून सक्रिय झाले. नंतर ते अलाहाबादच्या होम रुल लीगचे सचिव बनले. जेव्हा ते पहिल्यांदा महात्मा गांधींना भेटले आणि खूपच प्रेरित झाले. महात्मा गांधीचे महान कार्य ते डोळ्याने पाहत होते आणि मनाशीच ठरवून आपण स्वतःही देशासाठी खूप काही करावे हा विचार त्यांच्या मनात घोंगावत होता.अखेर त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिल्या किसान मार्चचं आयोजन केलं. आणि सरकारला शेतकरी प्रश्नासाठी जाग केलं. असहकार चळवळीच्या वेळी त्यांना दोन वेळा तुरुंगात जावे लागले.देशहितासाठी नेहरूंनी सर्वधर्म समभावाची आग्रही भूमिका घेतली.
जेव्हा नेहरूजी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस बनले. तेव्हा त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशियाचा दौरा केला. बेल्जिअममध्ये ब्रुसेल्स येथील गरीब देशांच्या संमेलनाला ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. काँग्रेसला स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाप्रती कटिबध्द बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये सायमन कमिशनच्या विरोधात एका मिरवणुकीचे नेतृत्व करताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. पण त्यांनी न डगमगता आपले कार्य सुरूच ठेवले. त्यांनी सर्वपक्षीय परिषदेत सहभाग घेतला आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या भारतीय घटनात्मक सुधारणेवरील नेहरू अहवालावर स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी ते एक होते. त्याचवर्षी त्यांनी “भारतीय स्वातंत्र्य लीग”ची स्थापना केली आणि त्याचे सरचिटणीसही झाले. भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून पूर्णपणे वेगळे करणे हा या लीगचा मूळ उद्देश होता.
पंडित जवाहरलाल नेहरू यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ज्याचा मुख्य उद्देश देशासाठी संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे हा होता. प्रसिध्द मिठाचा सत्याग्रह आणि काँग्रेसच्या आयोजीत अन्य आंदोलनांमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास घडला. अल्मोरा येथील तुरुंगात त्यांनी स्वत:चे “आत्मचरित्र” पूर्ण केलं.
भारतावर महायुध्दात सहभागी होण्यासाठी दवाब टाकल्याच्या विरोधात नेहरू यांनी केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहामुळे त्यांना अटक झाली.पण देशहितासाठी ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.मुंबईत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत ऐतिहासिक “भारत छोडो”चा संकल्प त्यांनी केला. त्यासाठी अन्य नेत्यांबरोबर त्यांनाही अटक झाली. भारत स्वतंत्र होई पर्यंत त्यांनी आपल्या कामात खंड पडू दिला नाही.देश स्वातंत्र्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन प्रयत्नांची मशाल नेहमी तेवत ठेवली. इंग्रजी जुलमी राजवटीला आपल्या विचार धारेवर सळो की पळो करून सोडण्याची हिम्मत नेहरूंनी जनतेला दिली.अखेर 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि चाचा नेहरूंचे स्वप्न सत्यात उतरले.बालक हाच देशाचा आधारस्तंभ आहे.तोच उद्याचे भविष्य आहे ही नेहरूंची विचारधारा आजही अमर आहे.स्वातंत्र टीकविण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. बालक दिनी हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
- अविनाश अशोक गंजीवाले
- तिवसा, अमरावती
- --------------------
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- --------------------
0 टिप्पण्या