श्रमच ज्यांचे जीवन..

  पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर तोललेली नसून ती तळहातावर तोललेली आहे असे अण्णाभाऊ साठे म्हणत असत.पौराणिक कथेत आपली पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर डोलत असते असे सांगितले असेल तरी अण्णाभाऊ जे म्हणतात तेच मला पटते. याचे कारण काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजनच्या बातम्यात गटारीचे चेंबर साफ करीत असतांना दोन कामगारांचा आत गुदमरून मृत्यु झाला ही बातमी ऐकली आणि मन सुन्न झाले.त्या दोघांना दिवाळी नव्हती का ? तरी ही ते त्या घाणीत उतरले होते आणि आपले काम इमाने इतबारे करत होते.जिथं त्यांना ऑक्सीजन न मिळाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.आपल्या नजरेत कायम वैभव असणाऱ्या माणसांना मान सन्मान असतो.तोच सन्मान काहीजण कष्टकऱ्याना द्यायला तत्पर नसतात.त्यांच्या लेखी त्यांचा जन्मच मुळी अशी कामे करण्यासाठी झालेला असतो.अशा लोकांना समजावणं खूप अवघड असतं.समोरच्या व्यक्तिच्या दुःखाशी, त्रासाशी तादात्म्य पावल्या शिवाय आपल्यात ती संवेदनशिलता येणार तरी कशी ? थोड्याच दिवसापूर्वी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली आपण.फटाके तर किती वाजवले याचा हिशेबच नाही ठेवला.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  पण रात्रीच्या अंधारात न दिसून आलेला फटाक्यांचा कचरा मात्र भल्या पहाटे थंडीची परवा न करता कुडकुडत स्वच्छता कामगार तो कचरा उचलून परिसर स्वच्छ करतात. त्या बिचाऱ्यानी तर रात्री ते फटाके उडवलेले नसतात. कारण त्या साठी पैसे वाया घालवायचे तर सण कसा साजरा करायचा याची भ्रांत त्या बिचाऱ्याना असणार.गटारीच्या कडेने आणि घाणीतून जाताना नाकाला रुमाल लावणारे आपण. ते लोक त्या घाणीत उतरून ती घाण कशी साफ करत असतील याचा कधी विचार करतो का ? त्या बिचाऱ्यांचं पूर्ण आयुष्य ही कामे करण्यात जातं. पण ही माणसं ना कधी गब्बर श्रीमंत होत ना कधी मुजोर होत. ती मनोरंजनासाठी मोठ्या खर्चिक टूरवरही जात नाहीत तरी ही ती जगतात बरं का. यांना सोन्या चांदीचा, भरजरी कपड्यांचा मोह कधी होत नसेल का ?

● हे वाचा – आयुष्याच्या वाटेवर,अनुभव संपन्न कविता संग्रह

  साधूला ही जी अलिप्तता जमत नसेल ती वैराग्यता यांच्यात कुठून आली असेल कि यांची परिस्थितीच यांना तसे जगायला शिकवत असेल.पण स्वतःचा स्वाभिमानाचा बोलबाला न करता श्रम संस्कृतीचे हे खरे रक्षक म्हणावे लागतील.घामाचा खरा अर्थ यांच्याकडे पाहून कळतो.नाहीतर एसीत बसणाऱ्या माणसालाही त्याचा बी पी वाढला कि घाम येतो.पण या दोघात किती फरक हो.अनवाणी पायांनी यांना कधी इन्फेक्शन होत नसेल का असा प्रश्न पडतो.मनापासून ही माणसं त्यांच्या वाट्याला आलेली ही कामे करीत असतात.पाणी जसं सगळं काही शुद्ध करतं त्याच प्रमाणे हे श्रमिक आपल्या श्रमाने भोवताल स्वच्छ करत असतात.

  हाती धरुनी झाडू
  तू मार्ग झाडीलाशी
  श्रमे तुझ्या महात्म्या
  ये थोरवी श्रमाशी

  अशा ओळी आपण महात्मा गांधीबद्दल वापरतो.त्या अशा श्रमिकांसाठी अतिशय योग्य ठरतात.देवाचं निर्माल्य उचलणार्‍यांचे हात त्या निर्माल्याने सुगंधी होतात.पण माणसांच निर्माल्य उचलणाऱ्या हातांचं काय ? हा विचार कधी केलाय का आपण ?

  श्रमतोस तू शेतामध्ये
  तू राबसी श्रमिका सवे

  असं आपण देवाच्या बाबतीत म्हणतो. पण आपण कधी त्यांच्या सोबत सदभावनेने जोडले जाणार आहोत.परिसर,अवती भवतीची दुनिया स्वच्छ करणारे हे दूत खरं तर सर्वासाठी आदर्श ठरायला हवेत.मोठ्या कार्यक्रमात यांना मुख्य पाहुणे म्हणून सन्मानाने का बोलावले जाऊ नये.भौतिक श्रीमंत होण्यापेक्षा विचार वाढवून श्रीमंत होऊयात.आपलं जगणं सुलभ करणारी ही माणसं म्हणजे देवापेक्षा कमी नाहीत याची जाणीव ठेवली तरी खूप झालं.

  -सुजाता नवनाथ पुरी
  अहमदनगर
  8421426337
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–
  (छाया : Loksatta)