• Mon. Jun 5th, 2023

विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांच्या सहभागासह सायकल रॅलीद्वारे मतदार जनजागृती

* उठ तरूणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : मतदार जागृतीसाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांच्या सहभागात आज शहरात उत्साहपूर्ण वातावरणात सायकल रॅली काढण्यात आली.मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात निरंतर मतदार नोंदणीच्या अनुषंगाने बुधवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने याचदिवशी सकाळी शहरात सायकल रॅलीचा उपक्रम राबविण्यात आला. विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीला हिरवी झेंडी शुभारंभ करण्यात आला.

    रॅलीच्या अग्रस्थानी मतदार जागृतीच्या संदेशाने सुशोभित चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांसह अनेक अधिकारी, अमरावती सायकलिंग असोसिएशन, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी- विद्यार्थिनींनी रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

    ‘उठ तरूणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणांनी वातावरणात उत्साह निर्माण केला. ‘ओ भाऊ, मी मतदार नोंदणी केली तुमी पण मतदार नोंदणी करा’ असे संदेशफलक घेऊन सहभागींनी शहरभर जनजागृती केली. जिल्हाधिकारी कार्यालय येथून एस. बी. आय. चौक, वेलकम पॉईंट, पंचवटी चौक, इर्विन चौक, रेल्वेस्थानक चौक, बसस्थानक, सुंदरलाल चौक मार्गे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला.

    मतदारांना मतदार नोंदणीचे महत्व कळावे यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. ताणतणावाच्या व धावपळीच्या आजच्या युगात सायकलिंग निरामय आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे मतदार जागृतीबरोबरच फिटनेस व आरोग्य जागृतीचा संदेशही या रॅलीतून साधला गेला, असे विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले.

    अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे, तहसीलदार संतोष काकडे, विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, जिल्हा न. प. प्रशासन अधिकारी गीता वंजारी, नायब तहसीलदार श्याम देशमुख, अरविंद माळवे, अमरावती सायकलिंग असोसिएशनचे श्री. कुलकर्णी, श्री. कळमकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सूरज मडावी, प्रा. डॉ. श्रीकांत पाटील, अमित चेडे, चंदू धकिते, आशिष ढवळे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *