• Tue. Jun 6th, 2023

महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक ऐतिहासिक भेट

    सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील उच्चपदस्थ लोकांच्या काही भेटी या इतिहास निर्माण करीत असतात.अशा भेटीतून एक वेगळा संदेश जनतेला देण्याचा प्रयत्न असतो.अशीच एक ऐतिहासिक भेट विदर्भातील चिखली येथे काल नुकतीच घडून आली.शिवसेनेचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी काल त्यांच्या चिखली येथील जाहीर सभेनंतर मराठा सेवा संघाचे व संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अॕड.पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.त्यांच्यासोबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत,खासदार अरविंद सावंत,विनायक राऊत, चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेची अनेक ज्येष्ठ नेते मंडळी उपस्थित होती. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला माजी आमदार रेखाताई खेडेकर,संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर आणि मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.जवळपास एक तास या मान्यवरांमध्ये काही महत्त्वपूर्ण विषयांवर चिंतन झाले.या बैठकीनंतर या दोन बड्या नेत्यांच्या बैठकीचे फोटो संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या तर काहींना मिरच्याही झोंबल्या. महाराष्ट्रामध्ये लगेच वेगवेगळ्या चर्चांना उधान आले.

    शिवसेना ही मराठी माणसाच्या हितासाठी निर्माण झालेली एक आक्रमक संघटना आहे. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड सुद्धा आक्रमक आणि वैचारिक पाया असलेले संघटन आहे.काही महिन्यापूर्वीच या दोन संघटना/पक्ष यांची राजकीय युती झाली आहे.या पार्श्वभूमीवर ठाकरे कुटुंबाचे व शिवसेनेचे प्रमुख असलेले उद्धवजी ठाकरे आपल्या प्रमुख नेत्यांना घेऊन अॕड.पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या घरी जातात ही गोष्ट निश्चितच महाराष्ट्राच्या मराठी मनाला एका धाग्यात ओवण्यासाठी व भविष्यात नवे राजकीय समीकरण तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.उध्दवजी ठाकरे यांच्या मनाचा हाच दिलदारपणा महाराष्ट्राच्या जनतेला भावत आलेला आहे.त्यामुळेच ते सर्वात लोकप्रिय नेते आहेत.अॕड.पुरुषोत्तम खेडेकर हे नाव महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीमध्ये मागील ३० वर्षापासून एक आक्रमक आणि अभ्यासू नेते व संघटक म्हणून गाजत आहे.ते संभाजी ब्रिगेडचे संस्थापक आहे व लाखो तरुणांची अभ्यासू व लढाऊ फौज त्यांनी उभी केलेली आहे.उध्दवजी ठाकरे यांनी सुध्दा युतीच्या पहिल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या या लढाऊ बाण्याचे कौतुक केले होते.संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये पुरुषोत्तम खेडेकर यांनी सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खूप मोठे परिवर्तन घडवून आणले आहे आणि आता राजकारणात सुद्धा संभाजी ब्रिगेड सक्रिय झाली आहे.या पार्श्वभूमीवर उद्धवजी ठाकरे आणि पुरुषोत्तमजी खेडेकर यांची भेट होणे ही गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.

    जाहीर सभेतच संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर उद्धव ठाकरे यांचा भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती आणि थोर विचारवंत व संस्कृत पंडीत डॉ.आ.ह.साळुंखे यांचे *सर्वोत्तम भूमिपुत्र-गोतम बुध्द* आणि *बळीवंश* ही पुस्तके देऊन सत्कार करतात.उद्धव साहेब सुध्दा अतिशय सन्मानपूर्वक सौरभ खेडेकर यांना विचारपिठावर बसवून घेतात व बुध्दांच्या मुर्ती संदर्भात सौरभ खेडेकर यांच्यासोबत गांभीर्याने चर्चा करतात ही गोष्ट निश्चितच एकमेकांचा सन्मान,आदर करणारी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची सध्याची घसरलेली पातळी दुरुस्त करण्यासाठी फार आशादायी आहे.घरी आल्यानंतर खेडेकर साहेब आणि रेखाताई खेडेकर उद्धवजींचा जगद्गुरु तुकोबाराय यांची मूर्ती आणि बळीराजाची प्रतिमा देऊन सत्कार करतात.डाॕ.आ.ह.साळुंखे यांचे *विद्रोही तुकाराम* व *शून्याचा ताळमेळ* हे स्वतःचे आत्मचरित्र भेट देतात.ही गोष्ट काही वैचारिक मतभेद जरी असले तरी ते वैयक्तिक मतभेद न समजता एकमेकांच्या विचारधारांचा आपण सन्मान केला पाहिजे या दृष्टीने महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील या दोन ज्येष्ठ नेत्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने एकमेकांना समजून घेऊन चिखलीच्या भेटीत महाराष्ट्राला दाखवून दिले आहे.

    महाराष्ट्राची हीच खरी उज्वल संस्कृती व परंपरा आहे.याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे राजकारण आपल्याला चालवावे लागणार आहे.त्या दृष्टीने उद्धव ठाकरे आणि पुरुषोत्तम खेडेकर यांची भेट ही अविस्मरणीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी वेगळे परिमाण घेऊन येणारी आहे.त्याचबरोबर यावेळी मराठा सेवा संघाच्या २०२३ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सुद्धा उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.ही दिनदर्शिका प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांना अर्पण करण्यात आली असून या दिनदर्शिकेमधे प्रबोधनकारांचा इतिहास फार वेगळ्या पध्दतीने वर्णन केलेला आहे.त्यामुळे प्रबोधनकारांच्या रक्ताचे वारस आणि विचारांचे वारस एकत्र आल्यामुळे या महाराष्ट्रात निश्चितच फार मोठे परिवर्तन घडवून येईल असे महाराष्ट्राच्या जनतेला वाटत आहे आणि याच गोष्टीची अनेक दिवसांपासून महाराष्ट्राची जनता आतुरतेने वाट पाहत आहे.महाराष्ट्र नव्याने उभा करण्यासाठी या दोन सच्च्या महाराष्ट्र प्रेमी नेत्यांच्या भेटीला भविष्यामध्ये सोन्याचे दिवस येवोत हीच जिजाऊ चरणी प्रार्थना !
    जय जिजाऊ – जय महाराष्ट्र

      -प्रेमकुमार बोके
      अंजनगाव सुर्जी
      ————–

      तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

      ——————–

      आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

      -बंडूकुमार धवणे
      संपादक गौरव प्रकाशन
      ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *