• Sun. May 28th, 2023

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

  विद्येविना मति गेली | मतिविना निती गेली ||
  नितिविना गति गेली | गतिविना वित्त गेले ||
  वित्ताविना शुद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले ||

  या भुतलावर जन्मलेल्या माणसाजवळ जर शिक्षण नसेल, तर माणसाची काय अवस्था होते. याचं मार्मिक सत्य ज्योतिबांनी सांगितलं आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिकलं पाहिजे.हा ज्योतीबांचा ध्यास होता.आणि यासाठीच महात्मा फुलेंनी शिक्षणाची चळवळ उभी केली.महात्मा फुलेंचा हा परिवर्तनवादी विचार समाजाला शिकण्याची प्रेरणा देऊन जात आहे.

  भारतीय स्त्रीशिक्षणाचे आद्य प्रवर्तक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना संबोधले जाते. त्याकाळामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी प्रामुख्याने ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीकरिता चालविलेल्या शाळा या काळात अस्तित्वात होत्या.पण बहुजन समाजाच्या शिक्षणाची सोय करावी हे ध्येय मात्र त्यांचे नव्हते. अहमदनगर जिल्ह्यातील मिस फॅरारबाईच्या मिशनरी शाळेपासून महात्मा ज्योतिबा फुले यांना शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली.त्यांना त्या बाईने तुम्ही तुमच्या भारतीय लोकांसाठी शाळा का काढीत नाहीत.असाच उपदेश केला होता. ख्रिश्चन मिशनरी शाळेत अध्यापनाचे कार्य करणाऱ्या व्यक्ती ह्या भारतीय नव्हत्या.त्यामुळे ख्रिश्चन मिशनरी शाळांना भारतीय स्त्रीशिक्षणाच्या शाळा म्हणुन संबोधता येत नाही.

  सनातन्यांचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात सन १८४८ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली खाजगी शाळा सुरू केली. आणि स्त्री शिक्षणाची पहिली मुहूर्तमेढ पुणे नगरीत रोवली. उपलब्ध इतिहास असे सांगतो की, एका भारतीयाने स्वप्रयत्नाने,स्वखर्चाने सुरू केलेली व चालवलेली ही मुलींची पहिली खाजगी शाळा होय.स्त्रीशिक्षणाच्या ह्या ऐतिहासिक घटनेचा पुणे शहराने खरं तर, अभिमान बाळगला पाहिजे. पुर्वीच्या काळी चुल आणि मुल एवढंच स्त्रीचं जग होतं.आणि त्याकाळात स्त्रीयांनी शिकलं पाहिजे.त्यांनी निरक्षर न राहता साक्षर झालं पाहिजे.हा परिवर्तन घडवणारा क्रांतीकारी विचार ज्यांनी मांडला ते होते महात्मा ज्योतिबा फुले. एक समतावादी क्रांतीकारी विचारांचं पर्व.ज्यांनी भारतामध्ये स्त्रीशिक्षणच नव्हे तर, सांस्कृतिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रामध्ये केलेलं कार्य हे कितीतरी पिढ्यांना लढण्याची प्रेरणा देवुन जातंय.

  ज्याकाळात स्त्रीयांनी शिक्षण घ्यावे ही कल्पनाच समाजाला मान्य नव्हती त्याकाळात महात्मा फुलेंनी स्त्रीयांना शिकवण्याचा मनामध्ये निर्धार केला. आणि आपल्या कार्याला सुरुवात केली. त्यावेळी सनातनी लोकांचा विरोध हा होताच,पण त्याचबरोबर इतर समाजातील लोक व आप्त स्वकीय यांचा देखील त्यांच्या कार्याला विरोध होता. त्यामुळे त्यांना अनेक अडचणी व संकटांना सामोरे जावे लागले.अर्थिक अडचण तर होतीच. कारण सरकारी अनुदानाची पध्दतच अस्तित्वात नव्हती.पण त्यापेक्षाही महत्वाची अडचण म्हणजे अशा शाळेत शिकण्यासाठी मुली कशा येतील, कुठुन येणार. कोणकोणत्या जातीतुन येतील व त्यांना शिकवणार कोण? या सर्व प्रश्नांची सोडवणूक ज्योतिबांनी केली होती.ज्योतिबांनी सर्वप्रथम त्यांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम शिक्षण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना शिकविले व सावित्रीबाईही आनंदाने शिकल्या.व ज्योतिबांनी सुरू केलेल्या शाळेत देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून रुजू झाल्या.

  सावित्रीबाई फुले या स्त्रीशिक्षणाचे कार्य करत असताना त्यांना अनेक अडचणी व रोज नवनव्या संकटांना सामोरे जावे लागले. स्त्रीशिक्षणाचे कार्य करत असताना रस्त्यात त्यांना अश्लील शिवीगाळ, शापवाणी व शेणचिखलाचा अंगावर मारा व्हायचा.त्यावेळी उस्मान शेख व फातिमा शेख ह्या दोघ्या उभयतांनी सावित्रीबाईंच्या मार्गातील अडथळा दूर करण्याचा प्रयत्न केला.आणि म्हणुनच महात्मा ज्योतिबा फुले यांना स्त्रीशिक्षणाचा प्रसार करता आला.

  स्त्रीशिक्षणाचे उध्दार कर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी स्थापन केलेल्या शाळा खालीलप्रमाणे –
  सन.१८४८ मध्ये बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा
  सन.३ जुलै १८५१ बुधवार पेठेतील अण्णासाहेब चिपळूण करांच्या वाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना.
  १८५१ मध्ये सदाशिवराव गोवंडे यांनी दिलेल्या जागेत महार मांगांसाठी शाळेची स्थापना.
  दि.१७ सप्टेंबर १८५१ मध्ये रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची स्थापना.
  दि. १५ मार्च १८५२ मध्ये वेताळ पेठेत मुलींच्या शाळेची स्थापना.

  ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी स्थापन केलेल्या या सर्व शाळांची संख्या हि ३३५ होती असे १८५३ च्या सरकारी पाहणीवरुन दिसुन येते. शाळेचे काम पाहण्यासाठी व्यवस्थापक मंडळ, शाळेच्या खर्चाने मुलींना ने आण करणारे शिपाई,शाळेचा उत्कृष्ट निकाल ही या शाळांची वैशिष्ट्ये म्हणता येतील.आणि अशाप्रकारे महात्मा फुले यांच्या स्त्रीशिक्षणाच्या कार्याची दखल इंग्रज सरकारलाही घेणे भाग पडले.दि १६ नोव्हेंबर १८५२ रोजी इंग्रज सरकारच्या वतीने मेजर कॅंडी यांनी फुले दांपत्याचा जाहीर सत्कार केला.व शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना ‘ मानपत्र ‘ अर्पण केले.

  महात्मा ज्योतिबांचे कार्य हे स्त्रीशिक्षणाचा प्रसार करणे एवढेच नव्हते तर,शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणाचे महत्व दैनंदिन जीवनात कसे आहे हे देखील सांगण्यचा प्रयत्न केला आहे.माणसाला माणसासारखे जगु दिले पाहिजे. त्याला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. व शिक्षण घेणे हा त्याचा मुलभूत हक्क आहे.शिक्षणाने माणुस स्वाभिमानी होतो.त्याच्यातली मानवता जागी होते. मानवाला जन्मजात शुद्र ठरवुन गुलामीचं जीवन जगण्यास प्रवृत्त करणे हा माणुसकीला लावलेला काळिमा आहे. अमेरिकेतील निग्रोंची गुलामगिरी संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख करुन आपले ” गुलामगिरी ” हे पुस्तक अमेरिकेतील चांगल्या लोकांना समर्पित केले आहे.

  भारतीय शिक्षणपद्धती कशी असली पाहिजे . यावरील महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार

  प्राथमिक शिक्षण व शिक्षकांवरील विचार, प्राथमिक शाळेतील शिक्षक, प्राथमिक शाळेतील शैक्षणिक अभ्यासक्रम कसा असला पाहिजे ? प्राथमिक शाळेंचे निरिक्षण, प्राथमिक शाळेतील व्यवस्थापन, खाजगी व्यवस्थापने बरोबर सरकारने शासकिय शाळा चालविण्याची जबाबदारी घ्यावी.सर्व जातीजमातील मुलांना वयाच्या १२ वर्षांपासून सक्तीचे शिक्षण द्यावे,शिक्षक हा प्रशिक्षित असावा,त्याला त्याच्या मुलभुत गरजांपेक्षा त्याचा पगार कमी देवु नये. शाळेत विद्यार्थींमध्ये शिक्षणाची गोडी लागावी, म्हणून त्यासाठी बक्षिसे व शाळेत शिष्यवृत्ती योजना असावी.प्राथमिक शिक्षणाबरोबरच सरकारने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाबरोबर उच्च शिक्षणाचा देखिल विचार‌ केला पाहिजे.

  महात्मा ज्योतिबा फुले ‌हे शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाच्या कल्पनेचे खरे जनक होत.शिक्षणाचे सार्वत्रिकरण‌ म्हणजे जात,धर्म,पंथ,लिंग व शरीरिक अपंगता यांचा अडसर न ठेवता समाजातील सर्व घटकांना समाजातील समानतेच्या तत्त्वावर शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे होय. शिक्षण घेणे हा मानवी हक्क असुन त्यात समतावादी विचार आणणे हा खरा धर्म असल्यामुळे त्याप्रमाणे आचरण करणे ही सामाजिक नितिमत्ता होय.असे त्यांच्या तत्वज्ञानाचे सार आहे.शिक्षणाचे महत्त्व आज सर्वांनाच पटलेलं आहे.शिक्षणामुळे मानवी जीवनाला परिपुर्णता येते म्हणून ते सर्वांनी घेतले पाहिजे.हा आजचा विचार आहे.हा क्रांतीकारी विचार रुढ करण्याचे व त्याप्रमाणे कृती करण्याचे श्रेय हे महात्मा ज्योतिबा फुले यांना दिले पाहिजे.कारण महात्मा ज्योतिबा फुले यांची समाजिकक्रांतीची आधारशिला शिक्षण ही हजारो विद्यापीठं उभी करणारी होती.

  महात्मा ज्योतिबा फुले यांची ग्रंथ संपदा –

  भाषणे, लेखन आणि वर्तमान पत्रातील लेखन याव्दारे व्यक्तीला आपले विचार समाजापुढे मांडता येतात.‌सामिजिक सुधारणेचे महत्व व सत्यशोधक समाजाचे कार्य इतरांना समजावे या दृष्टिने ज्योतिबांनी पुणे व आसपासच्या परिसरात भाषणे देण्यास सुरुवात केली.सन १९४९ नंतर त्यांनी गावोगावी पायपीट करून जमेल तेथे, जमेल जेव्हा लोकांसमोर भाषणे देत, आपल्या मुलांमुलींना शिकवा,बुकं वाचा,विधवांचे केशवपन करु नका. बालवयात मुलींना सती पाठवु नका. त्यांचा पुर्नरविवाह करा.त्यांना विवाहाची संधी द्या, देवाच्या दर्शनासाठी ब्राह्मण दलालांची मध्यस्थी घेवुन नका.ह्या विषयांवर जमेल तेवढ्या लोकांसमोर जेमतेम विशी ओलांडली होती.तेव्हापासुन महात्मा ज्योतिबा फुले हे आपले विचार मांडत होते.

  महात्मा फुलेंची ग्रंथसंपदा –
  सन.१८५५ मध्ये – तृतीय रत्न (नाटक)
  सन.१८६९ मध्ये – ब्राम्हणांचे कसब
  सन.१८७३ मध्ये – गुलामगिरी
  सन. १८८३ मध्ये – शेतकऱ्यांचा आसूड
  सन.१८८५ मध्ये – सत्सार अंक – १ व २ छोट्या पुस्तिकेचे लिखाण १ ऑक्टोबर १८८५ मध्ये –
  सन.१८८९ मध्ये – इशारा इशारा

  सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक प्रकाशित अस्पृश्यांची कैफियत यांसारखे महत्वपूर्ण व प्रेरणादायी ग्रंथ लिहिले. स्त्रीशिक्षणाचे आद्य प्रवर्तक, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, परिवर्तनवादी प्रबोधन क्रांतीकारी साहित्यिक महात्मा ज्योतिबा फुले.यांचं शैक्षणिक क्षेत्रातील योगदान हे अजोड आहे.त्यांची शिक्षणाविषयी विचारधारा ही समाजाला शिकण्याची व शिकवण्याची सदैव प्रेरणा देत राहते.

  -प्रविण खोलंबे
  मो.८३२९१६४९६१
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *