ग्रामीण जीवनाचा आरसा – उसवत्या सांजवेळी

  कर्जत जि अहमदनगर येथील कवयित्री मा स्वाती पाटील यांची नुकतीच प्रकाशित झालेली काव्य कलाकृती *उसवत्या सांजवेळी* वाचनात आली. या काव्यकलाकृतीचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके असून ग्रामीण जीवनाचा आरसा आहे. या मुखपृष्ठाचा जर सूक्ष्म अभ्यास केला तर त्यावरील जे संदर्भ आले आहे ते आजही ग्रामीण शेतकरी कुटुंबाच्या रोजच्या वास्तववादी जीवनाशी निगडीत आहेत.. या मुखपृष्ठावर संध्याकाळची दिवे लागणीची वेळ झालेली आहे, एक महिला आणि दोन शेतकरी जनावरे घेउन घराच्या ओढीने निघालेले आहे, त्यांच्या पाठीमागे चार पाच झाडे दिसत आहेत तर काही पक्षी देखील खोप्याच्या दिशेने जाताना दिसत आहेत. या सर्वांच्या खाली विळा दाखवला आहे. त्याखाली ‘उसवत्या सांजवेळी’ हे काव्य कलाकृतीचे शीर्षक वेगळ्या अक्षरात लिहले आहे. त्याखाली स्वाती पाटील असे हे प्रथम दर्शनी मुखपृष्ठ दिसते. या सा-या संदर्भातून आपल्याला काही अर्थ शोधायचे आहेत.. या सा-या संदर्भाचा आपण बारकाईने विचार करू . या मुखपृष्ठावर हे संदर्भ का घेतले असावे.. या मुखपृष्ठावरील संदर्भ आणि या कलाकृतीतील अंतर्भूत साहित्य आणि कवयित्री यांचा कुठे त्रिवेणी संगम आहे का? कवयित्रीचे वास्तव आयुष्य आणि मुखपृष्ठ यांचा काही जीवन संदर्भ आहे का ? या कलाकृतीतील साहित्य आणि मुखपृष्ठ यांचा काही संदर्भ आहे का ? या अंगाने आपण या मुखापृष्ठाचा विचार करणार आहोत.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

● हे वाचा – आयुष्याच्या वाटेवर,अनुभव संपन्न कविता संग्रह

  अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत हा तालुका शेती व्यवसायात अग्रेसर . शेती हाच एकमेव व्यवसाय असल्याने घरोघरी शेतीची कामे जोमाने चालत असत. व्यक्ती ज्या भागात राहतो त्या भागातील रितीरिवाज , चाली रुढी , जीवनशैली , तेथील आचार विचार हे त्या व्यक्तीच्या अंगी भिनले जातात, तेथील संस्कृती तेथील उद्योगधंदे हे त्या व्यक्तीच्या विकासास , जडणघडणेत महत्वाची भूमिका बजावत असतात. कवयित्री स्वाती पाटील या याच भागातील असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वावर तेथील परिस्थितीचा पगडा आहे. त्या शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्या लिखाणात शेतकरी आणि त्यांच्या जीवनशैलीचा संदर्भ आढ़ळून येतो. म्हणुनच त्यांच्या या काव्यकलाकृतीच्या मुखपृष्ठावर शेतकरी कुटुंबाचे संदर्भ रेखाटले आहे. मुखपृष्ठकाराने या कलाकृतीचा बारकाईने अभ्यास करून अत्यंत कल्पकतेने आपल्या कुंचाल्याने ग्रामीण जीवनाचे विविध रंग हे मुखपृष्ठावर साकारले आहे.

  या मुखपृष्ठाच्या एकेका अंगाचा आपण विचार करू. या मुखपृष्ठावर काही झाडे दाखवली आहेत या झाडांचे फक्त अवशेष उरलेले दिसत आहे. पाने गळून गेली आहेत याचा अर्थ असा की – गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने दुष्काळ जाणवत आहे. पर्जन्यमान कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या जरी पाउस चांगला झालेला असला तरी काही भागात कोरडा दुष्काळ असल्याचे हे प्रातिनिधिक दृश्य रेखाटले आहे. झाडांसोबत इथला शेतकरी देखील दुष्काळाच्या झळाने रुक्ष झाला आहे, बोडका झाला आहे . त्याच्या आशा, इच्छा आकांक्षाची हिरवी पाने गळून गेली आहे. त्याच्या अपेक्षा गळून गेल्या आहेत. उद्या पुन्हा झाडाला बहर यावा तसा आपल्या मनाला बहर येइल या आशेवर तो त्या वटलेल्या वृक्षासारखा उभा आहे. तो जगाचा पोशिंदा आहे त्याला याही परिस्थितीत उभे रहावे लागणार आहे. या लाक्षणिक अर्थाने हे वृक्ष पाठीमागे उभे दाखवले आहे असे मला वाटते.

● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!

  यानंतर आपले लक्ष जाते ते मुखपृष्ठावरील त्या स्री कड़े आणि गाई कड़े . ही दोन्ही प्रतिके लाक्षणिक अर्थाने खुप महत्वाची आहेत. या स्रीला मुखपृष्ठकाराने सर्वात पुढे दाखवले आहे. होय … स्री ही पुढेच असायला हवी. याचा अर्थ असा की – जसे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे तो पाठीमागे राहून आपल्याला अन्न पुरवित असतो तसे ही स्री आपल्याला अन्न देण्यासाठी पुढे असते. स्रीची शेतीविषयक भूमिका ही अगदी सिंधु संस्कृतीपासून चालत आली आहे. वाचनात आले होते की आदिमानवांच्या नंतर सिंधु नदीच्या खो-यात राहणारी मानव जमात हळूहळू प्रगत होत गेली त्यावेळी स्रीने या सिंधु नदीच्या खो-यात शेती करायला सुरुवात केली. म्हणजेच शेती हा व्यवसाय सुरुवातीला स्रीने सुरु केला. त्यावेळी पुरुष मंडळी जंगलातून शिकार करून आणायचे आणि ती शिकार भाजून खायचे. मात्र स्रीने शेतीचा शोध लावला आणि त्यानंतर आजपावेतो तिच्यात आमूलाग्र बदल होत गेला. त्यामुळे स्रीला प्रथम स्थानी दाखवून मुखपृष्ठकाराने तिचा सन्मान केला आहे. ती जगाची अन्नदात्री आहे. त्याच प्रमाणे गायीला कृषि संस्कृततीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. गाईची सर्व जण पूजा करतात,आपल्या कृषीसंस्कृतीचं प्रतिकच गाय-बैल त्यामुळे गाय ही प्रथम दर्शनी साकारली असावी असे मला वाटते.

  यानंतर या स्रीच्या डोक्यावर गवताचा भारा दाखवला आहे. याचा अर्थ असा की- शेतकरी हा सतत शेतीत कष्ट करीत असतो त्याच्या मागे त्याची पत्नी देखील कष्ट करीत असते. आणि हे कष्ट एक दिवस केले आणि काम झाले असे नाही तर ते वर्षानुवर्ष , पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. म्हणजेच हे कष्ट कायम स्वरूपी डोक्यावर बसलेले असते ते खाली उतरतच नाही आणि हाच तो कष्टाचा भारा त्या स्रीच्या डोक्यावर आहे. ती परिवाराचा, शेतीचा, घराचा सर्व भार जीवाची पर्वा न करता डोक्यावर घेत असते या मतितार्थाने हा भारा स्रीच्या डोक्यावर दाखवला असावा. ही कल्पकता सुचने हे मुखपृष्ठकाराचे कौशल्य असते असे मला वाटते.

  यानंतर या मुखपृष्ठावर दोन शेतकरी दाखवले आहे. हे शेतकरी घराच्या ओढीने निघालेले आहेत. त्यांच्या अंगात जे कपडे परिधान केलेले आहेत ते ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे आहे. कुठलाही साज नाही, कुठलाही डामडौल नाही. कपड्याला इस्री नाही. डोक्याला मुंडासे बांधलेले असा हा जगाचा पोशिंदा शेतकरी साधी रहाणीमानाचे प्रतिक आहे. आयुष्यात खुप श्रीमंत पाहिले पण जगाला पोसणारा हा जगश्रीमंत अवलिया अत्यंत साध्या पेहरावात आपल्या दिसून येतो हा अर्थ आपण लक्षात घ्यायला हवा. जुगारावर करोड़े रुपये लावून डाव हरावा तसा हा शेतकरी शेतीमातीत दरवर्षी लाखों करोडो रुपये लावतो … डाव हरतो पण तरीही वटलेल्या वृक्षासारखा पुन्हा दुस-या वर्षासाठी उभा राहतो ही श्रीमंती असुनही तो दाखवत नाही, साध्या राहणीमानात आपल्याला दिसतो हे जगाने लक्षात घ्यायला हवे. या अर्थाने हा शेतकरी येथे दाखवला आहे.

● हे वाचा – Rahul Gandhi : राहुल, संतांच्या पवित्र भूमीत तुझे स्वागत करतांना ……..

  जसंजसे आपण मुखपृष्ठ बारकाईने वाचत जातो तसंतसे त्याचे गूढ़ उकलत जाते. या मुखपृष्ठावर एक विळा दाखवला आहे आणि त्या विळ्यात स्री आणि शेतकरी दाखवला आहे. या मुखपृष्ठकाराच्या कल्पकतेला हजार सलाम. इतकं अर्थपूर्ण मुखपृष्ठ आपल्या कुंचल्याने साकारावे हे विशेष आहे. संपूर्ण साहित्य कलाकृतीचा सार या मुखपृष्ठावर साकारायाचे दिव्यत्वाचे काम आहे. हा विळा म्हणजे कष्टकरी, शेतमजूर, श्रमजीवी घट्कांच्या कष्टाचे आणि त्याच बरोबर त्यांच्या अनेकविध प्रश्नांचे प्रतिक आहे. काव्यसंग्रहातील अनेक कविताही शेवटी प्रश्नचिन्ह उभ्या करणाऱ्या आहेत. हा अन्यायाविरुद्ध रोष आहे. आज आपण पाहतो शेतकरी आत्महत्त्या करीत आहे. खरे तर आत्महत्या हा पर्याय नाही. जगाच्या पोशिंद्याने आत्महत्या हा मार्ग न निवडता अन्यायाविरुद्ध लढाई करून आपला हक्क मागितला पाहिजे , हा विळा त्या अन्यायाविरुद्ध लढून न्याय मागण्याचे प्रतिक आहे. विळा म्हणजे अन्याया विरुद्ध लढा द्या या अर्थाने प्रतिकात्मक वापरला आहे. शेतक-यावर आजही अन्याय होत आहे. शेतीला पूरक दर मिळत नाही, शेतीला विज मिळत नाही त्यामुळे वेळेत पाणी न मिळाल्याने पिक करपून जातात. शेतीचे नुकसान होते. बाजारभावात व्यापारी मालामाल होतात. तो बाजारभाव शेतक-याला मिळत नाही. यासर्व अन्यायाविरुद्ध लढाई करण्यासाठी हा *विळा* प्रतिकात्मक दाखवला आहे.

● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य

  यानंतर विळ्याच्या खाली *उसवत्या सांजवेळी* हे शीर्षक वेगळ्या टंकलेखनात दाखवले आहे याचाही मला गर्भित अर्थ जाणवला आहे. एखादे कापड जुने झाले म्हणजे ते उसवत जाते.. त्याला कितीही शिवायचा प्रयत्न करा पण त्याच्या उपयोग होत नाही. जसे जुने कापड विरत जाते, उसवत जाते तसे मानवी मन देखील काही संदर्भाने उसवत जाते. त्याला कितीही समजुतीच्या धाग्याने शिवायचा प्रयत्न करा पण मन पुढे पुढे उसवत जाते. वयपरत्वे मानवाच्या मनात बदल होत जातात. लहानपणात जगलेले आयुष्य तरुणपणात त्याला वेगळी छटा येते, तरुणपणात जगलेले आयुष्य त्याला म्हातारपणात विरक्ती आल्याचा भास होतो. तरुणपणातला जोश म्हातारपणी कमी होतो आणि मग त्याला त्या वयात मनाला काहीतरी कमीपणाचे शल्य बोचत असते. *सांजवेळी* म्हणजे माणसाच्या उतारवयात मन असे उसवत जाते. खंगत जाते. वृद्धत्वाकडे झुकलेला देह मनातील गत अनुभवाच्या आठवणीने उसवत जातो.. आणि हे असे उसावलेले आयुष्य जगत रहावे लागते. यावरून मला अत्यंत गर्भित अर्थाने असे म्हणायचे आहे की, जर आपल्या जीवनात एकाकीपणा आला , काहीतरी विसरल्याचा भास होतो, काहीतरी अनपेक्षित घटना आपल्या जीवनात घडते आणि आपण असे उसवत जातो तसेच जसे उसावलेल्या कपड्याचे धागे झिरमळ्या सारखे दिसतात तसे टंकलेखन केलेले शीर्षक दिसते म्हणजेच माणसाचे मन असे झिरमळ्यासारखे होत असते या गर्भित अर्थाने या शीर्षकाला घेतले असावे असे मला वाटते. व्यक्तीच्या आयुष्यातील अशा काही घटना आहेत ज्याने त्यांचे मन उसवत गेले.. ज्या वयात एकमेकांना सोबत घेउन उर्वरित आयुष्य आनंदाने जगावे.. पण तरीही अशा उतारवयात *(सांजवेळी)* ते घडत नाही आणि या विचाराने मन उसवत जावे हे मनाच्या गाभा-यात जाणीव करून देत असते. अशा लाक्षणिक गर्भित अर्थाने या काव्य कलाकृतीला हे शीर्षक साजेसे दिले असावे.

● हे वाचा – हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप ; अमरावतीच्या युवकाचे संशोधन

  या साहित्य कलाकृतीला सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार, लेखक, कवी, अभिनेते मा बाबासाहेब सौदागर यांची पाठराखण हे या कलाकृतीच्या गगनचुंबी सफलतेला, लौकिकतेला पूरक आहे , तसेच सुप्रसिद्ध संगीतकार मा हर्षित अभिराज यांच्या शुभेच्छा काव्यकलाकृतीला संगीतमय करणा-या आहेत. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध गीतकार , पाठ्यपुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे यांची प्रस्तावना या कलाकृतीला वेगळ्या उंचीवर घेउन जाणारी आहे.

  मा कवयित्री स्वाती पाटील, मा प्रकाशक- परिस पब्लिकेशन यांना पुढील दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी शुभेच्छा आणि मुखपृष्ठकार मा अरविंद शेलार यांच्या कल्पकतेला आणि कुंचल्याला हजार सलाम. आपल्या हातून असेच अर्थपूर्ण, दर्जेदार मुखपृष्ठ निर्मिती होवो ही सदिच्छा देतो ……… तुर्ताच इतकेच…..

-समीक्षक-

-प्रशांत एस वाघ (पॅसिफिक टायगर)

  संपर्क- *तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार
  (टिप- अनावधानाने काही चुकीचे संदर्भ आले असतील तर वाचक माफ़ करतील अशी अपेक्षा)
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–