आयुष्याच्या वाटेवर,अनुभव संपन्न कविता संग्रह

  सावर्डे गाव द्राक्षबागानी, भवानी मातेच्या डोंगरकुशीत विसावलेले निसर्गाचे वरदान लाभलेले गाव डोंगरमाथ्यावर निर्मळ निर्झर उड्यामारीत जातानाचे दृश्य मन मोहून सोडते, सभोवती ऊसाचे मळे हिरवाईने गावाला हिरवाईचा अंलकाराचे लेणं सजवीतच मनात चेतना नव तारुण्य निर्माण करते या मातीत कवितेचं बाळ कडू पित अब्दुल मौला सय्यद “आयुष्याच्या वाटेवर “पहाटेच्या धुक्यातून जाताना कवितेच्या मोहक झंकारानी अंग शहारून जायचा अन् मनात कवितेचा अंकुर फुटायचा या अंकूराच्या नाजून पात्याच्याप्रमाणेच एक एक कविता आयुष्याच्या वाटेवर पेरत गेला अशा चौवेचाळीस कवितेचा ऐवज घेऊन रसिकजनासमोर येत आहे तेही मोहन माने याच्या अथक प्रयत्नानंतर साहित्याचा आस्वाद घेण्याचे भाग्य लाभले. आई अंमीरबी व वडिल मौलाअली यांच्या पवित्र स्मृतिस अर्पण करीत अब्दुल आपल्या कविताचे श्रेय त्याच्या संस्काराला देतो.
  खेड्यापाड्यातील व साखर कारखान्यातील अनुभव कवी कवितेत मांडून आपल्या मनाचा कोंडमारा तो उलगडत आहे.जीवन जगतांना संसाराच्या सागरात भीतीच्या नावेत, सुख दु:ख भोगताना कवी म्हणतो,

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  “दगडाच्या मूर्तीवर,
  टाकीच्या या ठोक्यावर,
  ठोक ठोकुनिया
  ही रुप घेऊनिया
  सुंदर दिसते किती ही”

  असे लिहून जातो दंगलीत तो गोधळतो, आई बाबांची व्यथा, कष्ट, लाल माती, पैलवानी बाणा,नोकरी,यातील अब्दूलचे धडपडी जीवन,कारखान्याचा भोंग्याचा हळवा क्षण जागवतो, आपल्या मनातील शक्तीचा झरा आपल्या गुणाची, कौशल्याची जाण होऊन मन उल्हसित करीत वहात असतो.स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करत गुणदोषाचा बारकाईने निरीक्षण मिणमिणत्या दिव्यानेच घर उजळते, बाणेदारपणाची भाकर इमानाने खाताना कवी म्हणतो,

  “मिणमिणत्या दिव्या
  सुखी कर रे संसार
  अंधार नाहीसा कर
  उजळ रे माझं घर”

  अशी साधीसोपी मागणी करतो.शेताला वेळेवर पाणी मिळत नाही सामान्य शेतकऱ्याची दैना होते. हा मनाचा कोंडमारा सहन करण्यापलिकडे असतो जे दिसतयं ते वास्तव विस्तवासारखे मनात धगधगत असतांना पिकाची होणारी अवहेना मांडताना अब्दुल म्हणतो,

  “ज्याचं शेततळ मोठ
  तेच भरून घेतो
  गरिब शेतकऱ्याच्या
  वाट्याला पाणी कुठं येतंय ?”

  म्हणूनच कवीला संस्कृती महत्वाची वाटते. थोराचं ऐकावं,विचारातून मार्ग शोधावा,शाळा शिकावं,आईबाबांची सेवा करावी,खरेपणा सोडू नये,निसर्ग नियम पाळावे, अंहकार सोडावा अशा विचाराची पेरणी कवीकरतो,लेकरू,कर्तव्य
  कर्म, नातं, दर्शन, कामगार, परी, फुलाचे मनोगत, तू, कामात असावं, शिकवण,

  आयुष्याच्या वाटेवर, बालपण,हट्ट,उपाय या कविता पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा आहेत आणि आपण जगत असलेल्या अनुभवाभोवतीचे वर्णन कवी आत्मियतेने करुन समाजमनाला जागृत करत जीवन जगतांना साधे नियम पाळले तर सुखी जीवनचा मंत्र देत साध्यातून कवी असामान्यत्वकडे जातो. मनाचा हळवेपणा प्रत्येक कवितेत ओतप्रोत भरला आहे तो जसा आहे तसा प्रकट होतो कवी कोणाचे अनुकरण न करता अस्सल अनुभव शब्दात मांडण्यात यशस्वी होतो म्हणूनच कवितेतील भाव,अनुभव,वास्तवता,यमक,साधे सरळ विचार याचे पदोपदी दर्शन करण्यात कवी कमी पडत नाही.

  विचार हे मोठे सामर्थ्य असून ते चल स्वरूपात असते.त्यानेच नवनिर्मिती होते त्याच सृजनशीलतेच्या जोरावर आपण अद्वैत कार्य करु शकतो. आपण फक्त आपल्यातील सामर्थ्यशाली शक्तीचा वापर करतो.हेच विचार अब्दूलची कविता वाचतांना जाणवल्याशिवाय राहत नाही.त्यामुळे कविता ही अब्दूलची न राहता ती सर्वसामान्याची प्रतिनिधित्व करते.

  दारातील चाप्याचं फुलाच झाड भरभरून देत आपला सुगंध मुक्तपणे उधळत,माळरानावर काट्याकुट्यात, निर्जनवनात उगवणारी रानफुल, गवतफुल, त्याच्या अस्तित्वाची साक्ष देत उगवतांना परिमळतात परिसराच्या सौंदर्यात भर घालतात आणि निर्माल्य होऊन जातात पण त्यांच जीवित कार्य सफल होत. सर्वच कविता वेगळपण सांगत मनातील असणा-या कल्पकतेची जाणीवकरून देत अब्दूलच्या काही कविता संदेश देत,आदेश देत तर काही स्वकतृत्वाने उड्डान घेण्याचा प्रयत्न करीत होत्या,व्यथा, कथा, जाणीव याही पलीकडे त्यांचे अस्तित्व सिध्द करण्याचा प्रयत्न करीत होत्या,काही शब्दाच्या शक्तीने आपली छटा उमटवीत होत्या. परंतु स्वप्नांच्या पंखाना वास्तवतेची पकड ब-याच कविता मधून जाणवत होती फक्त वरवरचा शब्द फुलोरा असून चालत नाही.

  म्हणतात ना, कवीला तिसरा डोळा असतो तीच अनुभूती काही कविता देऊ लागल्या……कवितेच्या निष्ठा जागोजागी विखुरल्या होत्या, आत्मिक सौष्ठव आणि आंतरिक प्रांजळता ही कवितेची महत्वाची वैशिष्ट्ये काही कवितामघुन प्रखशाने जाणवू लागल्या नाही तर कवीला काय हवे असते? मनातील विचारांची दाहक खळबळ थांबवण्यासाठीच ना ! मनावरील उमटलेले विचारांचे ओरखड्यांचा विसर करण्यासाठीच. ना! एकूणच कवी मनावरच्या ताणाला शब्द कुंचल्याने साकारतो आपल्या अनोख्या रंगानी देतो एक रंगशिल्पला आतूनही नखशिखांत इंद्रधनू होऊन ……रंगाच्या साम्राज्यांचा सम्राट… बनून.

  कवितेमध्ये असते एक अनामिक शक्ती; जी अंतर्बाह्य फुलारून आणते कवीला ……..वर्षानुवर्षे मनाच्या नक्षीदार कोंदणात जपून ठेवलेले विचाराचे, चिंतनाचे आणि जगण्याचे वेगवेगळे सल एकाचवेळी रिचवतो कवी डोळसपणे कवितेत …..या आयुष्य उसवून जमलेल्या शब्दांची एक कोवळी डहाळी कवी तपासूनच त्याचा काव्याचा प्रवास सुरू होतो. हाच प्रवास कौतुकास्पद आहे यातुनचं अब्दूल कवी नावाजरूपाला येईल यात शंका नाही या संग्राहाचे सर्व साहित्यिक, वाचक, जाणकार स्वागत करतील हीच सदिच्छा मनात ठेऊन “आयुष्याच्या वाटेवर “हा संग्रह लक्ष दीपांसारखा सर्वांना मार्गदर्शन करत राहो हीच अपेक्षा.

  -मुबारक उमराणी,
  राजर्षी शाहू कालनी
  शामरावनगर, सांगली
  मो.९७६६०८१०९७.
  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  – बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–