• Sun. Jun 4th, 2023

Rashtrasant Tukdoji Maharaj :देश-विदेशातील भाविकांनी अर्पण केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली

    * गुरुकुंजात लाखो गुरुदेव भक्तांची मांदियाळी
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५४ व्या पुण्यतिथी महोत्सवात देश-विदेशातून आलेल्या भाविकांनी ठिक ४ वाजून ५८ मिनिटांनी राष्ट्रसंतांना गुरुकुंज आश्रमात मौन श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण भारतात अश्याप्रकारे एखाद्या संत महात्म्याला इतक्या शिस्तबद्धरित्या पाच लाख भाविकांच्यावर उपस्थित राहिलेल्या भाविकांनी एकाचवेळी मौनश्रद्धांजली अर्पण करण्याचा हा देशातील एकमेव कार्यक्रम असून या नियोजनाची प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा केली. ‘एक दिन सारा जगत गुरुदेव सेवामंडल की शिक्षा और दीक्षा पायेंगा।’ या राष्ट्रसंतांच्या भाकितानुसार श्रद्धांजलीला अमेरिका, इंग्लंड, जॉर्जिया, जर्मनी, कॅनेडा, दक्षिण ऑर्फिका इत्यादी देशातील राष्ट्रसंत विचार प्रणालीचे अभ्यासक व परदेशी नागरिक आर्वजून उपस्थित होते.

    राष्ट्रसंतांचे महानिर्वाण मराठी पंचागानुसार अश्विन वद्य पंचमीला (इंग्रजी पंचागानुसार शुक्रवार ११ ऑक्टोंबर १९६८ साली) सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी झाले होते. तेव्हा पासून राष्ट्रसंतांना त्यांच्या विचारांचे सर्व धर्म पंथातील राष्ट्रसंत प्रेमी व भाविक-भक्त या दिवशी तन्मयतेने श्रीक्षेत्र गुरुकुंजात एकत्र येवून अश्विन वद्य पंचमीला श्रद्धांजली अर्पण करतात. गेल्या ५३ वर्षापासून अविरतपणे राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राष्ट्रसंतांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्यावतीने यासाठी जय्यत तयारी केली जाते. इंग्रजांच्या विरोधात राष्ट्रसंतांनी १९४२ च्या चलेजाव उठावात सक्रीय सहभाग घेतला होता. त्यावेळी चिमूर, आष्टी, यावली, बेनोडा, चंद्रपूर येथे इंग्रजांनी बेछूट केलेल्या गोळीबारात अनेकजण शहीद झाले व महाराजांना तुरूंगात टाकल्या गेले. ‘पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेंगी सेना, झाड झडूले शस्त्र बनेंगे नाव लगेंगी किनारे’ हे जाज्वल्यपूर्ण भजन महाराजांनी इंग्रजांच्या विरोधात म्हणून मोठी जन चळवळ उभारली होती. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम साजरा केला जात असल्याने स्वातंत्र्य लढ्याची आठवण म्हणून श्रीगुरुदेव सेवामंडळाने सर्व क्रांतिकारकांना सुद्धा राष्ट्रसंतांच्या बरोबर मौन श्रद्धांजली यावेळी अर्पण केली.

    आवडतो मज कणकण तिथला, मज वेडची गुरुकुंजाचे ।।

    या राष्ट्रसंतांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे राज्याच्या कानाकोपऱ्यातुन पालख्या, दिंडी-पताकासह लाखों भाविकांनी खंजिरीच्या नादात ‘श्रीगुरुदेव की जय हो !’ असा जयघोष करीत टाळ, मृदुंगासह गजर करत सर्व धर्मसमभावाचे प्रतिक असलेल्या गुरुकुंजात सात दिवसांपासूनच डेरेदाखल झाले होते. राष्ट्रसंतांच्या जीवन कार्याचे स्मरण करण्याची, त्यातून प्रेरणा घेण्याची आणि काही संकल्प करण्याची ही वेळ असते. त्यानिमित्त्य राष्ट्रसंतांच्या भव्यदीव्य विश्वव्यापक कार्याची महती शब्द व सुरांच्या माध्यमातून उपस्थित जनसमुदायाला करुन दिल्या गेली. घरदार न सोडताही संसारात सामुदायिक प्रार्थना व ध्यानाच्या माध्यमातून अमरपद प्राप्त करण्याचा संदेश जनतेला देणाऱ्या तुकडोजी महाराज नावाच्या कर्मयोग्याचे, मानवतेच्या महापूजाऱ्याचे, अध्यात्माची सांगड विज्ञानाशी घालणाऱ्या संताचे महानिर्वाण झाले होते तेव्हापासून त्यांच्या विचाराची आणि कार्याची मशाल सतत
    धगधगती ठेवण्याच्या उद्देशाने आणि सत्कार्याची प्रेरणा घेण्यासाठी हा मौन श्रद्धांजलीचा भावोत्कट कार्यक्रम अतिशय शिस्तबद्धरितिने श्रीगुरुदेव सेवामंडळाच्यावतीने येथे आयोजिला जात असतो.

    सत्य अहिंसा पर मर मिटने, दे निर्भयता मन में।
    तुकड्यादास कहे यह भक्ती ना भुलू क्षण-क्षणमें ।।
    ईश्वर ! हमारो भारत, आजाद कब रहेगा?
    जालिमसे छूटकरके, कब आनंदमें-नहेगा।।

    अशी महाराजांची क्रांतीकारी भजने यावेळी सादर करण्यात आली. मौन श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमाला दुपारी ३.३० वाजता ‘गुरुदेव हमारा प्यारा’ या अर्चना गीताने सुरुवात झाली. राष्ट्रसंतांच्या जीवन कार्याचे स्मरण करण्याची, त्यातून प्रेरणा घेण्याची आणि काही संकल्प करण्याची ही वेळ असते. त्यामुळेच या प्रसंगी राष्ट्रसंतांच्या भव्य दिव्य विश्व व्यापक कार्याची माहिती शब्द व सुरांच्या माध्यमातून अलोट जनसमुदायाला करुन दिल्या गेली. सुमारे दोन तास लाखोचा जनसमुदाय राष्ट्रसंतांच्या विश्वात्मक विचार व कार्याचा, त्यातून भासणाच्या त्यांच्या दिव्यत्वाचा अनुभव घेत ध्यानस्थ बसलेला होता. महाद्वारावरील विशालकाय घंटेच्या निनाद होताच ठिक ४ वाजून ५८ मिनिटांनी शिस्तबद्ध रितीने तमाम गुरुदेव भक्तांनी महासमाधी स्थळाच्या दिशेने हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर “चलाना हमें नाम गुरुका चलाना।” व आरती राष्ट्रसंता जगतगुरु कृपावंता। ही आरती व सामुहिक प्रतिज्ञा करण्यात आली तसेच हिंदु, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन अश्या सर्व धर्मांच्या प्रार्थना आपआपल्या धर्मगुरुकंडून येथे करण्यात आल्या. हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काही क्षणासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वरील वाहतुक थांबविण्यात येवून दुकानांतील व्यवहार, भोंगे स्वतःहून बंद करण्यात आल्यामुळे सर्वत्र निरव शांतता पसरली होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मौनश्रद्धांजलीचा नयनरम्य सोहळा पार पडला. यावेळी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे संचालक मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पा बोंडे, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, प्रचार प्रमुख दामोदर पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे, श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सर्वप्रचारक, कार्यकर्ते, धार्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होते.नजर जाईल तिकडे भाविकांच्या उपस्थितिने जनसागर जमला होता. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आध्यात्मिक विभाग प्रमुख डॉ. राजाराम बोथे यांनी केले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *