Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

दिवाळी : संस्कृती जपण्याचा सण

  दिवाळी म्हटले की लहानापासून तर मोठ्यापर्यंत आनंदाचे ठिकाण राहत नाही.दिवाळी हा आपल्या संस्कृती मधील सर्वात मोठा सण आहे ही भावना थोरा मोठ्यांची असते. आपण आपल्या संस्कृतीसह जन्माला येत नाही. परंतु एका विशिष्ट संस्कृतीत आपण जन्म घेत असतो. मग जन्मल्यापासून आपण ती ‘संस्कृती’ आत्मसात करत असतो. संस्कृती ही एक व्यापक संकल्पना आहे, जी आपण अविरतपणे व जिवंत असे पर्यंत पाहत असतो. ही गोष्ट आपण कधीच विसरू नये की, संस्कृती आपल्याला दिसते,आपण अनुभवतो ,आपण विविध गोष्टीतून शिकतो ती एवढीच नसून ती अधिक व्यापक प्रमाणात आहे. मानवाच्या जीवनाचा शोध घेण्यासाठी,किंवा त्याचे जीवन घडविण्यासाठी ‘संस्कृती’ हे वरदान ठरते. कारण संस्कृती ही एका जागी स्थिर नाही, तर ती एक गतिशील, क्रियाशील व प्रक्रियात्मक संकल्पना आहे. आपण बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत गेलो की संस्कृतीत वाढ होत राहते.याच संस्कृतीला जपण्याचा आपण मानवाने व्यापक विचार करणे गरजेचे आहे.

  नुकताच दिवाळी हा सण सुरू आहे.सण साजरे करणे म्हणजे नुसती आतिषबाजी, मिरवणुकी,पैशाची उधळण नव्हे तर त्या सणांमधून आपण काय बोध घेतो हा विचार करायला लावणारी एक गोष्ट आहे. संस्कृती ही आपली व आपल्या समाजाची ओळख असते. वंश परंपरेने चालणारे व्यवसाय, सामाजिक सहभाग ,आर्थिक देवाणघेवाण, आपली विशिष्ट भाषा इत्यादी संस्कृतीचा वापर आपण आपल्या जीवनशैलीचे वर्णन करण्यासाठी करत असतो तसेच आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असलेली विविध मूल्ये, प्रत्येक धर्माची आपली उपासना, श्रद्धा यांचे वर्णन करण्यासाठी देखील संस्कृती चा वापर होतोच. संस्कृतीमधे विविध कलाकारांच्या कला, सर्वधर्म रूढी, खाण्याच्या सवयी, विविध बोली भाषा, पेहराव, खाण्याच्या पद्धती, निवास व्यवस्था, वाहतूकीची साधने, पैसा, हवामान, जीवनशैली, खेळ, सण समारंभ यांना विशेष महत्त्व असते.

  एका संस्कृती दुसर्‍या संस्कृतीपेक्षा चांगली किंवा वाईट, ठरविणे चुकीचे आहे. संस्कृती ही माणसे जोडणारी असली पाहिजे, संस्कृतीने सर्वधर्म समभाव शिकविला पाहिजे.आपण सर्व एक आहोत ही भावना दृढ होणे महत्वाचे आहे.संस्कृतीचा वापर एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी होऊ नये. पण दुर्दैवाने तीच गोष्ट आज जगात दिसून येते. विशिष्ट संस्कृतीमुळे आजही समाजात फूट पडते, दुफळी निर्माण होऊन आम्हीच कसे श्रेष्ठ हे दाखविण्याचा प्रयत्न होतो.पण असे न करता आपले सण उत्सव जरूर साजरे करूया. तसेही संविधानात प्रत्येकाला आपले धर्म स्वातंत्र्य दिले आहे.

  माझी संस्कृती ही संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी काम करणारी असली पाहिजे, प्रत्येक संस्कृती स्वतःच्या पायावर उभी असते. भारत हा विविध धर्मियांचा देश आहे. या मध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.आपले सण उत्सव साजरे करतात.त्यांपैकीच एक हा दिवाळी सण आहे.

  म्हणून आपण मैत्रीच्या प्रकाशकिरणांनी द्वेषाची अंधारमय भावना झटकून टाकूया.दिवाळीच्या निमित्ताने जशी घराची साफ सफाई केली त्याप्रमाणे आपल्या मनातून जातीयवादी विचारांची साफ़ सफाई करूया.आपल्या आयुष्याला घराप्रमाणे सर्वधर्म समभावाचे नवं नवीन रंग लावूया.चांगल्या विचार रुपी कपडे परिधान करून जर आपण दिवाळी साजरी केली तर प्रत्येक घरात यशाचे दिवे जळण्यास वेळ लागणार नाही. म्हणून दिवाळी हा सण आपली संस्कृती जपण्याचा एक उत्तम पर्याय आहे असे आपण गर्वाने सांगू शकू.

  श्री अविनाश अशोक गंजीवाले, (स. शिक्षक)
  जि. प. प्राथमिक शाळा करजगाव
  पं. स. तिवसा जि. अमरावती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code