Header Ads Widget

जिल्‍हाधिकारी पवनीत कौर यांना महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांनी दिल्‍या शुभेच्‍छा

  अमरावती प्रतिनिधी : लोकसेवा समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी सीएसआर या क्षेत्रांमध्‍ये लक्षवेधी योगदान देणा-या व्‍यक्‍ती आणि संस्‍थांना दरवर्षी लोकमत महाराष्‍ट्रीयन “ऑफ द इयर” पुरस्‍काराने गौरवण्‍यात येते. लोकमत महाराष्‍ट्रीयन ऑफ द इयर पुरस्‍कारासाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्‍यात आली होती. आय ए एस (प्रोमिसिंग) या श्रेणीत सात जणांना नामांकन मिळाले होते. सन २०२२ च्‍या लोकमत महाराष्‍ट्रीयन “ऑफ द इयर” च्‍या प्रोमिसिंग आय ए एस अधिकारी म्‍हणून पवनीत कौर या पुरस्‍काराच्‍या मानकरी ठरल्‍या आहेत.

  मा.जिल्‍हाधिकारी पवनीत कौर यांना लोकमत महाराष्‍ट्रीयन “ऑफ द इयर” हा पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांनी त्‍यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्‍छा दिल्‍या.

  मेळघाट हा दुर्गम भाग, येथे माता व नवजात बालकांचे मृत्‍यु कमी होत नाहीत, त्‍यासाठी २८ हा अभिनव उपक्रम राबविला गेला आणि त्‍यामुळे नवजात मृत्‍यु आणि मातामृत्‍युचे प्रमाण कमी होण्‍यास सुरुवात झाली. त्‍याला कारण अमरावतीच्‍या मा.जिल्‍हाधिकारी पवनीत कौर ठरल्‍या. गरोदर, स्‍तनदा व हाय रिस्‍क असलेल्‍या मातांकडे २८ दिवस प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर आशा वर्कर्स व आरोग्‍यसेवा कर्मचा-यांच्‍या मदतीने ५६ दिवस विशेष लक्ष देण्‍याची योजना आखली गेली.

  दोन दिवसांतून एकदा त्‍यांच्‍या घरी भेट, वजन घेणे, निरीक्षण आणि तपासणी सुरु केली. जानेवारी २०२२ पासून झालेल्‍या मिशन २८ मुळे घरगुती प्रसूतीचे प्रमाण, तसेच नवजातांचे मृत्‍यु आणि मातामृत्‍युचे प्रमाण कमी होऊन सकारात्‍मक परिणाम दिसून येऊ लागला. वंचित तरुणींनाही स्‍वप्‍न पाहण्‍याचा अधिकार आहे व यासाठी तिला आकांशा प्रकल्‍पाने पाठबळ दिले गेले. अमरावती जिल्‍ह्यातील ६४०५ तरुणींची या प्रकल्‍पासाठी नोंदणी झालेली आहे.

  या सर्व तरुणींना उपजीविका प्रदान करणे, सोबतच सक्षम करणे, हा आकांक्षा प्रकल्‍पाचा मूळ उद्देश आहे. संपूर्ण विदर्भात जिल्‍हाधिकारी पवनीत कौर यांनी ही संकल्‍पना प्रत्‍यक्षात साकारली आहे. स्‍वत:च्‍या विशेषाधिकारात १८ महिन्‍यांचा निवासी सॉफ्टवेअर प्रशिक्षण कार्यक्रम व १०० टक्‍के नोकरीची हमी, हे या प्रकल्‍पाचे वैशिष्‍ट्य आहे. हा प्रकल्‍प सप्‍टेंबरच्‍या शेवटच्‍या आठवड्यापासून सुरु झाला आहे. वंचित युवतींना प्रत्‍यक्ष रोजगार देऊन डिजिटल इंडिया मिशन आणि महिला सक्षमीकरणाचे उद्दीष्‍ट यामुळे आकाराला येत आहे.

  यावेळी मा.जिल्‍हाधिकारी पवनीत कौर यांनी म्‍हटले की, अमरावती जिल्‍ह्यातील माझ्या मेहनती आणि समर्पित टिमच्‍या प्रयत्‍नाशिवाय हे शक्‍य झाले नसते. आज हा पुरस्‍कार मी अमरावती जिल्‍हाप्रमुख म्‍हणून स्‍वीकारला, व्‍यक्‍ती म्‍हणून नाही. मिशन २८ मेळघाट प्रदेशात बालमृत्‍यु कमी करण्‍यात आणि संस्‍थात्‍मक प्रसूती वाढवण्‍यात सकारात्‍मक परिणाम दाखवत आहे. आम्‍ही २६ सप्‍टेंबर,२०२२ रोजी विदर्भातील वंचित मुलींसाठी आकांशा प्रकल्‍प सुरु केला आहे आणि मला आशा आहे की हा प्रकल्‍प डिजिटल कौशल्‍याद्वारे मुलींना सक्षम करेल आणि त्‍यांना नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध करुन देईल जेणेकरुन त्‍या स्‍वावलंबी होऊ शकतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या