अमरावती (प्रतिनिधी) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाके दुकानांसाठी तात्पुरता परवाना देण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. विस्फोटक अधिनियम व नियमांचे पालन करुनच परवाने वितरित करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.
त्यानुसार तात्पुरता फटाके दुकाने यांचेकडील दुकानांमध्ये फटाके ठेवण्यासाठी लाकडी साहित्य तसेच कापडी पडद्यांचा वापर करण्यात येऊ नये. फटाके दुकानांमध्ये सुरक्षित अंतरावर ठेवावी. जेणेकरुन आग लागण्याच्या दुर्घटनांवर वेळीच प्रतिबंध करता येईल. फटाके सुरक्षित आणि ज्ज्वलनशील नसलेल्या सामग्रीच्या शेडमध्ये ठेवण्यात यावे. फटाके विक्रीसाठी असलेली तात्पुरती दुकाने ही एकमेकांपासून तीन मीटर अंतरावर आणि संरक्षित ठिकाणांपासून 50 मीटर अंतरावर राहतील, याची दक्षता घ्यावी. फटाके विक्रीसाठी असलेली तात्पुरती दुकाने समोरासमोर लावण्यात येऊ नये.
तात्पुरता फटाके दुकानांमध्ये प्रकाशासाठी कोणत्याही प्रकारचे तेल दिवे, गॅस दिवे अथवा उघडे असलेले विद्युत दिवे लावण्यात येऊ नये. जर कोणत्याही विद्युत वाहिनीचा उपयोग करण्यात आला असेल तर तो भिंतीव्दारे किंवा छतावर लावण्यात यावे. उघड्यावर विजेच्या तारा लोंबकळत असू नये. अशा विजेच्या दिव्यांसाठी लागणारे स्विच हे भिंतीवर लावण्यात यावे तसेच अशी विद्युत वाहिनी जर एकाच रांगेतील दुकानासाठी असेल तर त्यासाठी मास्टर स्विच लावण्यात यावे. फटाके दुकानांच्या 50 मीटर परिसरामध्ये फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. कोणत्याही ठिकाणी एका जागेवर एकाच ठिकाणी पन्नासपेक्षा अधिक फटाके विक्री दुकाने यांना परवाना देण्यात येऊ नये. तसा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विवेक घोडके यांनी निर्गमित केला आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या