अमरावती (प्रतिनिधी) : चिखलदरा तालुक्यातील ग्रा.पं. सोमठाणा खु. (मोथाखेडा) येथील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवार, दि. 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी सोमवार, दि. 17 ऑक्टोबररोजी होणार आहे. या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले आहेत.
मतदानासाठी सोमठाणा येथील मतदान केंद्रावर दि. 15 ऑक्टोबर रोजी मतदान पथके रवाना होणार आहेत. मतदान सुरळीत पार पडण्यासाठी मतदान केंद्रांच्या ठिकाणापासून 200 मीटर परिसरात कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपकासारखे उपकरण लावण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. या कालावधीत कुठल्याही राजकीय पक्षाने त्यांच्या पक्षाचे मंडप लावू नये. तसेच मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये प्रचार करणे, बेकायदेशीर जमाव करणे, हत्यार बाळगणे, मतदारांना आमिष दाखविणे, मतदारांना मतदानापासून रोखणे, धुम्रपान करणे तसेच ज्वलनशील पदार्थ नेण्यावर कडक प्रतिबंध करण्यात येत आहे. या कालावधीमध्ये अनधिकृतरित्या मतदारांची वाहतूक, ने-आण करणे, मतदान केंद्रापासून 200 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे वाहन आणणे, राजकीय नेत्यांचे फोटो चिन्ह लावणे, घोषणा करणे, जाहीररित्या ओरडणे, अथवा मोठ्याने आवाज करणे, मतदान करण्यास उपस्थित मतदाराव्यतिरिक्त जमाव करणे, मनुष्य अथवा प्राणी एकत्रित करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. तसेच झेरॉक्स, फॅक्स, एसटीडी बुथ चालू ठेवणे, हॉटेल, पानठेले तसेच खाद्य पदार्थांची दुकाने चालू ठेवणे यावर बंदी राहील.
चिखलदरा तहसील कार्यालयातील सभागृहामध्ये सोमवारी मतमोजणी होणार आहे. यामुळे मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सकाळी 8 वाजेपासून तर मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत काही बाबी करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. या काळात या परिसरात उमेदवार किंवा उमेदवाराचे प्रतिनिधी आणि मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मतमोजणी स्थळाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत पास दाखविल्याशिवाय प्रवेश देऊ नये.
मतमोजणीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे झेरॉक्स, फॅक्स मशिन, ई-मेल तसेच इतर संपर्क साधनांच्या गैरवापरावर प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच मतमोजणी ठिकाणाच्या 100 मीटर परिसरामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रांझिस्टर, कॅल्युलेटर इतर इलेक्ट्रीक्स उपकरणे तथा तत्सम साधनांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
सोमठाणा खु. (मोथाखेडा) या ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्षेत्रातील सर्व दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम तसेच ग्रामपंचायतीच्या लगतच्या क्षेत्रातील औद्योगिक वसाहती अशा ठिकाणी नोकरीनिमित्त कामास येणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीमधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी अथवा विशेष सवलत देण्यात यावी. आयोगाच्या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित आस्थापनांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या