A P J Kalam : वाचते व्हा….

  वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष लेख

  (एपीजे अब्दुल कलाम एक महान वैज्ञानिकच नव्हे तर एक द्रष्टे विचारवंत आणि थोर शिक्षक होते. असंख्य युवकांचे ते प्रेरणास्थान आहेत. विद्यार्थ्यांना प्रेरणा देतानाच त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्याचे बळ कलाम यांच्या विचारांमध्ये आहे. त्यामुळेच 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून आपण साजरा करत असतो.)

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  एपीजे अब्दुल कलाम एक महान वैज्ञानिकच नव्हे तर एक द्रष्टे विचारवंत आणि थोर शिक्षक होते. असंख्य युवकांचे ते प्रेरणास्थान आहेत. विद्यार्थ्यांना प्रेरणा देतानाच त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्याचे बळ कलाम यांच्या विचारांमध्ये आहे. त्यामुळेच 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून आपण साजरा करत असतो.

  लहानपणी शाळेत असतांना शिक्षकांकडून आपल्याला प्रथम अक्षरओळख करुन दिली जाते आणि आपण हळुहळू शब्द वाचायला सुरवात करतो. वडिलधाऱ्यांचा हात धरुन रस्त्यावरुन जात असतांना दुकानांवरील पाट्या आणि इतर माहिती उत्सुकतेने वाचली जाते. कमीअधिक प्रमाणात सर्वांच्या आयुष्यात वाचनाचा प्रवास सुरु होतो तो इथूनच. कालांतराने वाचनाची लय बदलते पण हा प्रवास अखंड सुरु असतो. त्यानंतर शालेय दिवसात रोचक, रहस्यमयी कथा, बालकथांची पुस्तके दप्तरात राहू लागतात. सिंड्रेला, जादूचा बुट, बिरबलच्या कथा, अशा असंख्य कथांमध्ये बालपण रमत जाते आणि खुलतही जातं. या कथांमधून कोवळी मने बोध घेतात, घडत जातात. कथा वाचनाचे वेड त्या दरम्यान सर्वांनाच लागले असते. या कथांमुळे त्यांचे कल्पनाविश्व अफाट होत जातं. आणि एक सुंदर भावविश्वही साकारले जाते. कथेतील परी डोळ्यासमोर जशीच्या तशी यायला लागते. एवढा प्रभाव या पुस्तकांचा आपल्यावर होत असतो. परंतु अशी गोष्टींची पुस्तके केवळ उन्हाळी सुट्टयांमध्येच वाचण्याची मुभा असायची. कारण गोष्टींच्या पुस्तकांमुळे शालेय अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार असं ठाम मत पालकांचे झालेले असायचे. तरीही अभ्यास चुकवून, लपूनछपून, प्रसंगी चोरुन आपण या कथा वाचत असू. बऱ्याच जणांचा असाच अनुभव असावा. यानंतर मात्र आपल्या वाचनाचा परिघ अधिक विस्तीर्ण होत जातो.

  महाविद्यालयीन जीवनात समाज, संस्कृती, शास्त्र, इतिहास, भाषा अशा असंख्य विषयांचा आपल्या अभ्यासात समावेश होत जातो. वाचनालयांचे उंबरठे वारंवार ओलांडले जातात. वाचनाचा आयुष्यातला प्रभाव वाढत जातो. आपल्या वाचनामध्ये आलेलं झपाटलेपण आपल्याला जाणवत असतं. मिळेल ते वाचून आपण त्याचा फडशा पाडला असतो. या वाचनाचा सुक्ष्म, पण प्रभावी संस्कार संपूर्ण जीवनावर होत असतो. वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक मुल्यांची ओळख होत जाते. त्यातून आपली वैचारिक पायाभरणी अधिक मजबूत होत जाते.

● हे वाचा – संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ

  शारिरिक विकासासाठी आहार अन् व्यायाम जसे गरजेचा आहे तसेच आपल्या बौध्दिक प्रगल्भतेसाठी दर्जेदार साहित्याचे वाचन गरजेचे आहे. एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते. पुस्तकातील एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या जीवनाचं ध्येय ठरवू शकतं. वाचनामुळे जीवनाची दिशा ठरु शकते हे खरंच आहे. या जगाचा आतापर्यंत जो प्रबोधनात्मक आणि वैज्ञानिक विकास झाला आहे तो केवळ वाचनाने रुजवलेल्या विविध जाणिवांच्या अविष्काराने झाला आहे. युरोपात प्रबोधन युग अवतरले ते छापखान्याचा शोध लागल्यानंतरच. या शोधामुळे वाचनाचा प्रसार होण्यास मोठी मदत झाली त्यातून तत्कालिन धर्मग्रंथांची चिकित्सा सुरू झाली. या चिकित्सेतून वैज्ञानिक जाणिवा वाढत गेल्या आणि औद्योगिक क्रांतीमुळे मध्ययुगीन जग आधुनिक जगात परावर्तित झाले.

  आजमितीस असा कुठलाही विषय नाही ज्यावर पुस्तके प्रकाशित झाली नाहीत. दररोज विविध विषयांवरची हजारो पुस्तके प्रकाशित होत असतात . विविध भाषांमधील पुस्तके आपल्या भाषेत अनुवादीत केलेली, तसेच इतरही सर्व पुस्तके आज अगदी सहज उपलब्ध होऊ शकतात. विविध विषयांवरची पुस्तके मानवाच्या माहिती आणि ज्ञानात भर घालत असतात. या गोष्टीची जाणीव असूनही आजचा तरुण सकस वाचनापासून दुरावलेला आपण पाहतो. समाजमाध्यमांवर अनियंत्रित माहितींचा साठा असतो. या माहितीच्या वाचनाचे ज्ञानात रुपांतर होईलच असे नाही आणि ते वाचन प्रभावी ठरुच शकत नाही. अत्यंत थोड्या काळासाठी ते वाचन आपल्या स्मरणात राहू शकतं. रचनात्मक ज्ञानप्राप्ती अशा सहज वाचनातून होऊ शकत नाही. पुस्तक वाचन करुन ज्ञान अवगत करत असतांना एकाग्रता विकसित होत असते. स्थिर आणि विवेकाने विचार करण्याची क्षमता वाढीस लागते. त्याचा उपयोग जीवनभर होत असतो. सामाजिक समस्यांची जाणीव, आपल्या संस्कृतीचे मूल्य, ऐतिहासिक वारसा अशा असंख्य विषयाच्या वाचनामुळे आपल्या वैचारिक क्षमतांचा विकास होत जातो. समाज व राष्ट्रासाठी हे सर्व जोपासण्याची नैतिक जबाबदारी असल्याची जाणीव आपल्याला या विविधांगी वाचनातुन होत जाते. वाचनातून आपल्या वैचारिक जाणिवा समृध्द होत जातात. यात आपणही काही योगदान द्यावे ही प्रेरणा निरंतर वाचनातूनच मिळत जाते. देशाचा जबाबदार नागरिेक घडविण्याची किमया या वाचनाच्या सवयीतून घडून येते.

  वर्तमानपत्रापासून सरु होणाऱ्या आपल्या दिवसात इतर उपयुक्त माहितीपर पुस्तकांचा समावेश व्हायलाच हवा. कुटुंबामध्ये वाचनाचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पालक व घरातील मोठ्यांनी घ्यायला हवी. मोबाईलवर खेळ खेळण्यात गुंग असलेल्या आपल्या लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल अशा प्रसंगांची निर्मिती आपणच करायला हवी.लहान मुले वाचनापासून दुरावलेली आपण बघतो आहोत.वाचनाचे महत्व आपण त्यांना पटवून द्यायला हवे. मी तर सुचवेल, दिवसातील ठराविक वेळ मुलांना जवळ घेऊन आपण त्यांना वाचनाच्या प्रकियेत सहभागी करून घ्यायला हवे. त्यांना आवड निर्माण झाली की वाचनाशिवाय न राहू शकणारी पिढी आपोआप घडत जाईल.

  आपण वाचलेली एक कल्पना शंभर नव्या कल्पनांना जन्म देत असते. उत्तम अभिव्यक्तीसाठी वाचन गरजेचे असते. सकस वाचन तितकंच सकस लिहायला प्रवृत्त करणारं असतं. वाचनातून प्रेरणा मिळते लिखाणाची. अन् त्यातून दर्जेदार निर्मितीचा अविष्कार होऊ शकतो. वाचनाची सवय असलेली व्यक्ती आयुष्यात कधीही एकटी नसते. पुस्तकांच्या सानिध्यात आपण नेहमी सकारात्मक, प्रफुल्लित व आत्मविश्वासाने परिपुर्ण असतो. संस्कारक्षम वयातच नियमित वाचनाची सवय लावणे आवश्यक आहे. पुस्तकांच्या रुपाने पसरलेल्या ज्ञानाच्या अथांग सागरात आपण नखभर जरी भिजू शकलो ना, तर समृद्ध जीवनासह, सफलता आपण मिळविली असेल. त्यासाठी वाचनाला पर्याय नाही. तुम्ही वाचनाला छंद, कला, आवड काहीही माना, पण निरंतर वाचनाने वाचन अंगी रुजायला लागतं, हेच खरं!

  पल्लवी अनिल धारव
  विभागीय माहिती कार्यालय, अमरावती.
  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  – बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–