- * प्रदर्शनाला अमरावतीकरांचा मोठा प्रतिसाद
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरोतर्फे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या कला दालनात आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शनाचा आज समारोप झाला. तीन दिवसांच्या या प्रदर्शनाला विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, अभ्यासक, महिला, ज्येष्ठ नागरिक व शेकडो अमरावतीकरांनी भेट दिली.
गांधी जयंतीला खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार प्रवीण पोटे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, रासेयोचे संचालक डॉ. राजेश बुरंगे उपस्थित होते. प्रदर्शनाला आमदार बच्चूभाऊ कडू, आमदार अमोल मिटकरी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, प्रसिद्ध कवी मिर्झा रफी अहमद बेग यांच्यासह अनेक मान्यवरांनी, विविध शाळेचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासकांनी भेट दिली.
प्रदर्शनाचा समारोप मंगळवारी सायंकाळी करण्यात आला. यावेळी प्र. माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार, क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, फिलेटलिक सोसायटीचे दिलीप फाले आदी उपस्थित होते. प्रदर्शनात सहभागी झालेल्या विविध कार्यालयांच्या प्रतिनिधींना यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महात्मा गांधी यांचे जीवनकार्य व विविध पैलूंचे दर्शन प्रदर्शनातून घडते, असे यावेळी श्री. पवार यांनी सांगितले.
प्रदर्शनात निवडणूक विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, महानगरपालिका, पोस्ट विभाग, कस्तुरबा सोलर खादी समिती आणि अमरावती फिलेटलिक सोसायटीतर्फे स्टॉल लावण्यात आले. विविध योजनांची माहिती या स्टॉलद्वारे देण्यात आली. फिलेटलिक सोसायटीतर्फे महात्मा गांधी यांच्यावरील विविध तिकिटांचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री. झाला, क्षेत्रीय प्रचार सहायक सुमित दोडल आणि श्रीकांत जांभूळकर यांनी परिश्रम घेतले.