• Mon. Jun 5th, 2023

आपण सर्वांना बोनस मिळून सुद्धा…..

  बोनस शब्द ऐकला की सर्वानाच आनंद होतो. जशी काही बोनस ह्या शब्दातच जादू आहे. बोनस म्हणजे आपणाला काही तरी अतिरिक्त मिळणार हे अपेक्षित धरून आपण सर्वजण आनंदित होतो. दिवाळी-दसरा सण आला की, बोनस मिळणार ही सर्वसाधारण कर्मचारी वर्गाला अपेक्षा असते. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण असते. कर्मचारी वर्गाच्या कुटुंबातील सदस्य हे सुद्धा आनंदित असतात. बोनस म्हणजे पगारा व्यतिरिक्त मिळणारे मानधन होय. ह्या बोनसची आपण सर्वजण वर्षभर मोठ्या आतुरतेने वाट बघत असतो.

  काही कंपन्या आपल्या मिळविलेल्या लाभातून आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व आपले उत्पादन वाढविण्यासाठी बोनस देत असतात. ह्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक सकारात्मक संदेश जाऊन ते अधिक जोमाने काम करण्यास प्रवूत्त होतात. खाजगी, सरकारी, निमसरकारी किंवा अन्य कोणत्याही कर्मचाऱ्यांनो या दिवाळीत जो बोनस आपल्या खात्यात जमा झाला त्या बोनसवर, दिवली सणात साजऱ्या होणाऱ्या हरेक आनंदावर, गोड धोडावर एकच सही आहे ती म्हणजे भारतरत्न डॉ. बी.आर. आंबेडकरांची.

  बोनस बिल पारित करून घेऊन त्यांची अंमलबजावणी करून या देशातील तमाम कामगारवर्गाची दिवाळी गोड करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक सलाम तर प्रत्येकानेच करायला हवा. आपण खातो त्या भाकरीवर डॉ. बाबासाहेबांची सही आहे बरं. हे आपण सर्वानीच धन्यता मानली पाहिजे.

  बरे असो हे झालं आर्थिक लाभा बाबत. आपल्या जीवन बोनसच काय ? आपण क्रिकेटची कॉमेंटरी ऐकताना आपल्या कानावर बऱ्याच वेळा ऐकायला मिळत ” ये गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया और बल्लेबाज बाल बाल बचे.और यह फिल्डर के हांथ से कॅच छुटा और बल्लेबाज को जीवदान मिला | कॉमेंटेटर एव्हढ्यावरच थांबत नाही तर ते पुढे म्हणतात इस जीवदान का वह कितना लाभ लेते है वह अब हमे देखना है | क्रिकेट खेळात अशा बऱ्याच घटना आहेत की ज्याला शून्यावर जीवदान मिळालेले आहे त्यांनी नंतर सेन्चुरी मारलेली आहे. मित्र हो, असेच एक जीवदान आम्हाला सर्वांना मिळालेले आहे. असाच एक जीवनाचा बोनस आपल्या सर्वांना मिळालेला आहे.

  आठवा असे कोणते ते ? बघा आठवण करा अगदी २ वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. कोरोना महामारीने अगदी हाहाकार केला होता. कोरोना नावाचा बॉलर खूपच फार्मात होता. तो एका दिवसात लाखो बळी घेत होता. त्याने मानवाला सळो की पळो करून सोडले होते. मानव हा हतबल झाला होता. तो मेटाकुटीस आला होता. तो दहशत व दडपणाखाली जीवन जगात होता. अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी अंथुरणा वरून उठल्यावर स्वतःला धन्य समजायचा आणि परमेश्वराचे आभार मानायचा व मनोमनी म्हणायचा वाचलो रे बाबा मी एकदाचा. कोरोना कधी कोणाची विकेट काढेल ह्याचा नेम नसायचा.

  त्या कोरोनाच्या काळात मानव एकदमच विसरलेली माणुसकी अंगिकारित होता. एकमेकाला मदत करायचा. कोरोनाने मानवाचा अहंकार, इगो अगदी जागे वर आणला होता. अगदी तो घुटण्यावर आला होता. तो सर्वां सोबत अगदी आपलेपणाने वागत होता. त्याचा मदतीचा भाव जागा झाला होता व तो मनोमनी संकल्प करीत होता की, माझे हे जीवन मी दुसऱ्यासाठी सार्थ करेन. आता मी कपटीपणा करणार नाही, निंदा नालास्थि करणार नाही वगैरे वगैरे. चांगुलपणाचा आव आणत होता. जसा ही कोरोना संपला तसा तो आपल्या मूळ स्वभावावर आला. परत एकदा त्याचे कपट कारस्थाने सुरु झालीत . निंदा नालास्थि सुरु झाली. मानवच मानवाला संपवायला निघाला. त्यात आता परत एकदा अहंमपणा निर्माण झाला.

  अरे मानवा तू एवढ्या मोठ्या महासंकटातून वाचलास, तुला निसर्गाने जीवनाचे बोनस दिले. ह्या जीवन बोनसचे तुझ्या व इतरांच्या जीवनात काही तरी चांगले कर ! कुणाच्या मदतीला धाव. उगाच आपल्या हट्टापायी दुसऱ्याचे नुकसान करू नकोस. हे जीवन आपण सर्वांचे बोनस आहे. आपण सर्वजण मानव कल्याणाचा संकल्प करूया व या मिळालेल्या जीवदानाचा लाभ घेत आपल्या जीवनाची तर सेन्चुरी पूर्ण करू या व सोबतच इतरांची सेन्चुरी पूर्ण होईल त्यासाठी मदत करू या.

  सध्या दिवाळीचा उत्सव सुरु आहे व सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. बाजारपेठा सगळीकडे फुललेल्या आहेत. तर चला एक दिवा माणुसकीचा, ऐक्याचा, ज्ञानाचा, राष्ट्रप्रेमाचा, पर्यावरणाचा, परिवर्तनाचा, यशाचा व संस्काराचा लावू या व आपणास जीवन बोनस मिळालेल्या लाभाचा फायदा मानव कल्याण्या साठी करूया ! नाही तर सर्वांना बोनस मिळून सुद्धा ————- आपल्याला लाभ घेता आला नाही अशी मानवावर वेळ येणार नाही अशी अपेक्षा करू या. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

  -अरविंद मोरे,
  नवीन पनवेल
  मो. ९८२०८२२८८२
  email : arvind.more@hotmail.com

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *