• Mon. Jun 5th, 2023

Ravishkumar : रवीश,तू जीवंतपणीच इतिहास झालाय !

    प्रिय रवीश,

    तीन वर्षांपूर्वी तुला आशिया खंडाचे नोबेल समजल्या जाणाऱ्या मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि आता तुझ्यावर निघालेला एक चित्रपट टोरोंटोमध्ये प्रदर्शित झाला आहे.टोरोंटो फिल्म फेस्टिवल मध्ये परदेशी प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सिनेमा हॉलमध्ये शंभर मिनिटांचा हा चित्रपट जगाला प्रभावित करून गेला.भारतातील मीडियाने जरी अजूनपर्यंत तुझ्यावरील या चित्रपटाची दखल घेतली नसली तरी परदेशात मात्र तुझ्या प्रामाणिक पत्रकारितेचे खूप कौतुक होत आहे व यातच तुझ्या कार्याचा सन्मान आहे.मॕगसेसे पुरस्कार मिळाला तेव्हाही भारतीय मीडियाने तुला अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आताही तसेच झाले. परंतु तुला या बिकाऊ व लाचार मीडियाच्या प्रसिद्धीची गरज नाही. कारण सच्च्या देशप्रेमी लोकांच्या हृदयात तू घर केले आहे हे आम्हाला ठाऊक आहे.म्हणूनच परदेशातही तुझ्या नावाची आणि पत्रकारितेची सन्मानपूर्वक दखल घेतली जात आहे.

    रवीश, भारतीय पत्रकारितेची उज्वल नीतीमूल्ये एकीकडे पायदळी तुडविली जात असताना तुझ्यासारखा एक सामान्य पत्रकार हुकूमशाही प्रवृत्तीच्या लोकांविरुध्द खंबीरपणे उभा राहतो आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याचे धाडस करतो यातच तुझ्या पत्रकारितेचे महत्त्व आणि महात्म्य सामावले आहे.सर्वच लढाया या विजयासाठी लढल्या जात नसतात, तर काही लढाया युद्धभूमीवर शेवटच्या श्वासापर्यंत कोणीतरी लढत होता हा संदेश जगाला देण्यासाठी लढल्या जातात असे तू एकदा म्हणाला होता.देशात प्रश्न विचारण्याची अघोषित बंदी असताना आणि प्रश्न विचारणाऱ्यांना प्रचंड त्रासाला व संकटाला सामोरे जावे लागत असताना तू आपल्या कुटुंबाची पर्वा न करता सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन सत्ताधाऱ्यांसोबत दोन हात करत आहे. यातच तुझी निष्ठा,नितीमत्ता आणि निडरता दिसून येते.*एनडीटीव्ही* ला विकत घेऊन तुझा आवाज बंद करण्याचे कारस्थान सध्या सुरू आहे.परंतु तू न डगमगता स्टुडिओमधेच बातम्या वाचल्या पाहिजे असे काही कुठे लिहिले आहे का ? मी रस्त्यावर उभा राहून,बगीच्यात बसून किंवा घरामधून सुद्धा बातम्या देऊ शकतो हे कणखरपणे सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगतो आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या बाजूने प्रश्न विचारत राहणार हे निडरपणे सुचीत करतो.

● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!

    प्रिय रवीश,भारत हा मूल्यांसाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या लोकांचा देश आहे वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या लोकांनी आपली नीतीमूल्ये जपण्यासाठी सत्ता आणि संपत्ती सोबत संघर्ष करून देशासाठी आपले सर्वस्व बहाल केले आहे.त्यामुळे तू एकटा आहेस असे समजू नकोस.तुझ्यासोबत या देशावर प्रेम करणारे असंख्य नागरिक आहेत. रात्री नऊ वाजता एनडीटीव्ही वर प्राईम टाईम सुरू होताच, नमस्कार मै रवीश कुमार ! हे शब्द ऐकण्यासाठी लाखो लोक आपल्या ह्दयाचे कान करुन तुझ्या बातम्या ऐकण्यासाठी आतुर असतात.तुझा एक एक शब्द हृदयात सामावून घेण्यासाठी टीव्ही समोर एका एकाग्र चित्ताने बसलेले असतात.त्याचवेळी इतर चॅनलवर हिंदू-मुस्लिम,भारत- पाकिस्तान,जातीय,धार्मिक या विषयावर निरर्थक चर्चा सुरू असताना तू मात्र या देशातील बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे,विद्यार्थ्यांचे,महिलांचे, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन पोट तिडकीने आपली बाजू मांडत असतो.

    केवळ बाजू मांडून थांबत नाही तर ते प्रश्न कायमचे सुटले पाहिजे यासाठी एका एका विषयांवर अनेक भागांची मालिका चालवतो.जे लोक तुला टार्गेट करतात,तुझ्यावर,तुझ्या पत्नीवर,आई आणि मुलीवर अश्लील आणि घाणेरड्या भाषेत टीकाटिपणी करतात, त्याच लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तू सरकारसोबत संघर्ष करतो.त्यामुळे खरोखर तू मित्रांचा तर मित्र आहेसच,परंतु शत्रूंचाही मित्र आहेस.एनडीटीव्ही ला या देशातील उद्योगपती कदाचित विकत घेतीलही,परंतु तुला विकत घेणारा उद्योगपती या देशात अजूनपर्यंत जन्माला आला नाही हे मात्र आम्ही खात्रीने सांगू शकतो.तुझी प्रामाणिकता,तुझी तळमळ,तुझा संयम,तुझा सात्विक संताप या सगळ्या गोष्टी तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे झळकतात.कुठेही कोणाविषयी द्वेष नाही,कोणाबद्दल घृणा नाही,बोलण्यात कर्कशपणा,आक्रस्ताळेपणा नाही, विनाकारणची आक्रमकता नाही. अतिशय शांत,संयम आणि विरोधात्तपणे तू प्रत्येक विषय जेव्हा मांडतो,तेव्हा त्या विषयाची खोली आणि व्याप्ती फक्त खरा अभ्यासू व्यक्तीच समजू शकतो.न वाचताच आयटीसेलचे मेसेज फॉरवर्ड करणारे बाजारू लोक तुझी प्रगल्भता,विद्वत्ता आणि गुणवत्ता समजू शकणे शक्यच नाही.

    प्रिय रवीश, ज्यांना मनापासून पत्रकारिता करायची आहे त्या युवा पत्रकारांसाठी तू आदर्श आणि आशेचा किरण आहेस.उभरत्या पत्रकारांचा तू मार्गदाता आहेस.सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांसाठी तू कर्दनकाळ आहेस.तुझी दखल मेन स्ट्रीम मीडिया घेवो अगर न घेवो,पण या देशातील सर्वसामान्य माणसांसाठी तू प्रेरणास्त्रोत आहेस.भारतीय पत्रकारितेला नवा आयाम देणारा तू दिपस्तंभ आहे.त्यामुळेच टोरोंटो फिल्म फेस्टिवल मधे तुझ्यावरील चित्रपटाला सन्मानाचे स्थान मिळाले आणि विदेशी लोकांनी तुझ्या पत्रकारितेला सलाम केला.एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही सुध्दा तुझ्यातील प्रामाणिक पत्रकाराला सलाम करतो.कारण भारतीय परंपरेप्रमाणे इतिहासात नोंद होण्यासाठी तुला मरणाची वाट पाहावी लागली नाही.तू जीवंतपणीच इतिहास झालाय !

    -प्रेमकुमार बोके
    अंजनगाव सुर्जी
    ९५२७९१२७०६
    २४ सप्टेंबर २०२२ (सत्यशोधक समाज स्थापना दिन)
    ——————–

● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    – बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *