Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

धारणी उपजिल्हा रुग्णालयात रक्तपेढी निर्माण होणार

  *मिशन मेळघाटअंतर्गंत आदिवासी रुग्णांना आरोग्यदायी दिलासा
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : मेळघाट येथील आदिवासी बहुल दुर्गम क्षेत्रातील धारणी तालुक्यात शंभर खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयात रक्तसाठा केंद्र आहे. तथापि, तेथील गरज लक्षात घेवून मिशन मेळघाटअंतर्गंत रक्तपेढी व रक्त विलगीकरण केंद्र स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

  सद्य:स्थितीत येथील रुग्णांच्या निकडीनुसार त्यांना अमरावती सामान्य रूग्णालयातील मदर बँक येथून रक्तसाठा उपलब्ध होतो. गंभीर रुग्णांना अमरावती येथे संदर्भित केले तरी येथील रूग्ण अमरावतीस जाण्यास नकार देतात. बरेचदा वेळीच वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो. यासाठी आता धारणीतच निर्माण होणाऱ्या रक्तपेढी व रक्त विगलीकरण केंद्रामुळे रुग्णांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. हे काम जिल्हा नियोजन समितीकडून पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिली.

  धारणी उपजिल्हा रूग्णालय येथे रक्तपेढी निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मेळघाट येथील आदिवासी बहुल दुर्गम क्षेत्रातील धारणी तालुक्यात शंभर खाटांचे उपजिल्हा रूग्णालय असून ते अमरावती जिल्ह्यापासून 150 कि.मी. अंतरावर आहे. मध्यप्रदेश येथील खंडवा जिल्ह्यापासून धारणी 110 कि. मी. अंतरावर आहे. हा रस्ता पूर्णपणे घाटवळणाचा आहे. धारणी उपजिल्हा रूग्णालयात दर महिन्याला सरासरी शंभर प्रसुती होतात. या भागातील गरोदर स्त्रियांत रक्तक्षयाचे प्रमाण सुमारे 63 टक्के एवढे आहे. तसेच 20 खाटांचे नवजात शिशू चिकित्सा कक्ष आहे. येथे कमी वजनाचे व विविध आजारांच्या बालकांवर बालरोगतज्ज्ञांव्दारे उपचार करण्यात येतो.

  धारणी तालुक्यातील आदिवासी विभागात सिकलसेल, ॲनेमिया अशा आजारांचे प्रमाण मोठे आहे. येथील अंदाजे 1 लाख 84 हजार 665 लोकसंख्येमध्ये 2 हजार 708 रुग्ण सिकलसेल आजाराचे वाहक आहेत. यातील 387 रूग्ण सिकलसेल आजाराने ग्रस्त आहेत. मेळघाट येथील दुर्गम क्षेत्रात असलेले एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रूग्णालयाशी संलग्न आहेत. तसेच या विभागात माता व बाल मृत्यूचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. तसेच रक्तसंक्रमणाअभावी सिकलसेल रुग्ण यांचेही मृत्यू होतात. यासाठी आरोग्य विभागाने धारणी उपजिल्हा रूग्णालय येथे रक्तपेढी निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

  अन्न व औषधी विभाग आणि राज्य संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शन तत्‍त्वानुसार रक्तपेढी व रक्त विलगीकरण केंद्रासाठी येथील जुन्या इमारतीमध्ये नुतनीकरण करून रक्तपेढी स्थापन करण्याचा खर्च हा जिल्हा नियोजन समितीमधून करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code