Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

प्रशिक्षणातून आर्थिक स्वावलंबनाबरोबरच परिपूर्ण व्यक्तिमत्व घडेल - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : ‘आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’ या उपक्रमातून विद्यार्थिनींना विविध बाबींचे प्रशिक्षण मिळून आर्थिक स्वावलंबनाबरोबरच परिपूर्ण व्यक्तिमत्व घडायला मदत होणार आहे. विद्यार्थिनींनी या अभ्यासक्रमातून आवश्यक कौशल्ये व ज्ञान मिळवून अधिकाधिक सक्षम व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे नवगुरूकुल फौंडशनच्या सहकार्याने ‘आकांक्षा : कौशल्यातून जीवनोन्नतीकडे’ या उपक्रमात अद्ययावत सॉफ्टवेअर प्रोगामिंग पदविका अभ्यासक्रमासाठी 225 विद्यार्थिनींची निवड झाली. या अभ्यासक्रमाचा अभिमुखता व संवाद कार्यक्रम डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय विकास प्रबोधिनीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनीही या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहून विद्यार्थिनींशी संवाद साधला व शुभेच्छा दिल्या.

  जिल्हाधिकारी पवनीत कौर, प्रबोधिनीचे संचालक गजेंद्र बावणे, सहायक प्राध्यापक पंकज शिरभाते, कौशल्य विकास उपायुक्त एस. आर. काळबांडे, सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, वैशाली पवार, ‘युएन विमेन’च्या सल्लागार ऋतुजा पानगावकर, नवगुरूकुल फौंडेशनच्या रूपाली वखरे, रिचा खोबरागडे आदी यावेळी उपस्थित होते.

  विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक स्वावलंबन महत्वाचे आहे. त्यादृष्टीने या रोजगारक्षम अभ्यासक्रमाची रचना आहे. निवड झालेल्या विद्यार्थिनींनी चाचणी परीक्षेत यश मिळवून बाजी जिंकली आहे. आता त्यांनी मनापासून शिकून प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करावे. प्रशिक्षणातून आर्थिक स्वावलंबी होण्याबरोबरच व्यक्तिमत्व विकासही घडण्यास मदत होणार आहे.

  जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, या प्रशिक्षणासाठी प्रशासनाच्या प्रस्तावाला कौशल्य विकास विभागाने तत्काळ मान्यता देत ३ कोटी रूपये निधीही मिळवून दिला. त्यामुळे हा कौशल्य प्रशिक्षणाचा रोजगारक्षम कार्यक्रम सुरू होत आहे. विद्यार्थिनींना आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी रोजगाराचे दालन खुले करणारे हे प्रशिक्षण आहे. विद्यार्थिनींनी अभ्यास, मेहनत व निर्धाराने हे प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

  प्रबोधिनीचे श्री. शिरभाते, श्रीमती खोबरागडे यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री. शेळके यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती पवार यांनी आभार मानले. करण पारेख यांनी सूत्रसंचालन केले. विभागाचे समन्वयक वैभव टेटू, प्रवीण बांबोळे, पंकज कचरे, रोहित मोंढे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code