Featured Post

काय घिऊन जासीन ?

Translate

Recent in Technology

Advertisement

Breaking News

दुर्गा ...एक वेगळा दृष्टिकोन

  आश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात नवरात्रोत्सवाचा प्रारंभ. गणेश उत्सवानंतर काही दिवसातच, मोठ्या उत्साहाने संपन्न होत असलेल्या, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीची जाणीव जागृती व्हावी या हेतूने हा एक वैचारिक लेखन प्रपंच....कशाला हवे पुरानातले दाखले अथवा मोठमोठे आदर्श? कित्येक आदर्श आपल्या आसपासच सर्वसामान्य स्त्रियांमध्ये असतात. आपल्या अवतीभवती सुद्धा कित्येक दुर्गा वावरत असतात. फक्त आपण त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहत नाही एवढंच! आता हेच पहा ना! सकाळी शाळेला निघण्यापूर्वीच फोन आला. समोरून केतकीताई बोलत होत्या. माझ्या शाळेतील एका विद्यार्थ्याची आई.

  "मॅडम, आज मी वेदांतला घेऊन कोल्हापूरला जात आहे. माझ्या ऑफिसमध्ये मी माझं टार्गेट पूर्ण केल्याबद्दल, आणि एक विशेष रेकॉर्ड केल्याबद्दल माझा, आज जाहीर सत्कार होणार आहे. त्याचबरोबर परवाच वेदांतला मिळालेल्या यशाबद्दल त्याचाही आमच्या कंपनीतर्फे कौतुक सोहळा होणार आहे. त्यामुळे या सत्कार सोहळ्यासाठी आम्ही सहकुटुंब जाण्याचा विचार करतोय. तुमची परवानगी मिळाली तर... तसा कार्यक्रम आवरला तर दुपारीच आणून सोडेल त्याला शाळेत."

  "अहो केतकीताई, परवानगी कसली मागताय? आवश्य जावा. अहो कौतुक सोहळ्याचे चार शब्द ऐकून वेदांतला देखील प्रोत्साहनच मिळेल की! तुमचे दोघांचे, आणि तुम्हा दोघांना साथ देणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या तुमच्या कुटुंबीयांचे देखील मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा." केतकीचा विचार मनात घोळतच मी शाळेत पोहोचले. तेवढ्यात, मीरा पदर खोचून, लालबुंद चेहऱ्याने आपल्या मुलाला अर्थात विजयला ओढतच जणू शाळेत आणत होती. तसं पाहता आज ती नेहमीपेक्षा अगदी लवकरच आली होती. चेहरा काहीसा सुजलेला होता. एक डोळा अंधुक, मात्र रक्ताळलेला दिसत होता. कपाळावर, गालावर, मानेवर, व्रण दिसत होते. एका हातात भरगच्च बांगड्या होत्या तर दुसऱ्या हातामध्ये अगदी दोन-तीनच राहिल्या होत्या. हाताच्या उरलेल्या भागावर जखमा दिसत होत्या.

  रडत असलेल्या मुलाचा एकही शब्द न ऐकता त्याला तिनं फरपटत आणून वर्गात बसवलं. काही न बोलताच ती निघू लागली. परंतु मला राहावेल कसं! "अगं मीरा, काय झालं? का चिडचिडतेस विजयवर? आणि तुझी ही अशी अवस्था?" "काय सांगू मॅडम, 'रोजचं मढ नि त्याला कोण रडं' अशी अवस्था झालीय माझी. रोज विजयचे पप्पा दारू पिऊन येतात. काही ना काही कारण काढून घरात अशी दंगामस्ती सुरू असते. मुलांच्या समोर गुरासारखा मार खायचा आणि मुलांसाठी जगत राहायचं. दुसरं काय!" "अगं मीरा दररोज तर तू दिवसभर कामाला जातेस तरीही..."

  "तेच तर आहे ना मॅडम. दिवसभर पोरांसाठी राब राब राबायचं आणि संध्याकाळी आले की ह्या मेल्याचा मार खायचा. कंटाळा आलाय बघा जीवनाचा. शिकून सवरून सुद्धा माझी ही अवस्था झालीय बघा." असं म्हणत मिरा तोंडाला पदर लावून रड रडली. विजय केविलवाण्या नजरेने तिच्याकडे पाहत होता. मीदेखील निरुत्तर झाले. खरंच केतकी प्रमाणे झाल्या कष्टाचा आनंद व समाधान भोगणाऱ्या असल्या तरी मीरा सारख्या कित्येक स्त्रिया देखील आजही फक्त समाधान शोधत आहेत.

  कामगार वसाहतीतील माझ्या शाळेत असे अनेक माता पालक आहेत. ज्यांच्या वेदना, कौटुंबिक कलह, आणि केविलवाणी त्यांची मुलं पाहता हृदय गलबलून जातं. दारुड्या पतीचा संसार पराकोटीची बहादुर स्त्रीच करू शकते. हेकेखोर, संशयी, अहंकारी यासारखे दुर्गुण देखील एक प्रकारची व्यसनेच आहेत. असे दुर्गुण मग ते स्त्रीमध्ये असो वा पुरुषांमध्ये असो. फक्त पुरुषच असतात असं नाही काही अंशी स्त्रियांमध्ये देखील हे गुण दिसून येतात. मग संसार सांभाळणारी दुसरी बाजू ही नक्कीच बहादूर म्हणायला हवी. अशी ही दुसरी बाजू बऱ्याच अंशी स्त्रियांच्या वाट्याला येते.

  घरातलं, बाहेरचं, मुलांचं, पाहुण्यांचं, सारं काही कौशल्यतेने सांभाळून स्त्री स्वतःला सिद्ध करत असते. आपल्या आसपास शेजारी पाहिलं तर अशा कित्येक स्त्रिया सिद्धतेच्या धडपडीत दिसून येतात. स्वतःची शेती स्व कौशल्याने फुलवणारी शेतकरीन असो वा घर संसार सांभाळून बाहेरच्या चार घरची धुणी भांडी करून धावत पळत जगणारी मोलकरीणताई असो. नाहीतर ऑफिसच्या वेळा सांभाळणारी अथवा राजकीय डावपेचाला उत्तर देणारी रणरागिणी असो, प्रत्येकीला आपल्या कामात धैर्य तेवढेच आणि कष्ट ही तितकच घ्यावं लागतं.

  नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर नऊ दिवस अनेक जण नऊ दिवसाचे वृत्त घेतात. काही लोक कडक उपवास करतात, काही अनवाणी राहतात, काही ठिकाणी नऊ दिवस स्त्री शक्तीचा जागर होतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बऱ्याचशा प्रथा सार्थ देखील आहेत. गरीबाचे चटके काय असतात? याची जाणीव व्हावी यासाठी कदाचित पूर्वजांनी या प्रथा करून ठेवल्या असाव्यात. तरीही..

  सर्व काही संभाळत कधीतरी आजूबाजूला असणाऱ्या आपल्यातल्याच दुर्गेला जाणून घेऊया. तिची प्रशंसा करूया, तिला प्रोत्साहन देऊया व तिच्यातल्या दुर्गेचे अस्तित्व तिलाच दाखवून देऊया. ज्या स्त्रीला राष्ट्रपती मुर्मु माहित नाहीत, आकाश कन्या किरण बेदी माहित नाही, जिला अहिल्यादेवी माहित नाही, की जी सावित्रीच्याही कार्यापासून खूप दूर आहे अशा सामान्यातल्या सामान्य स्त्रीमध्ये देखील दुर्गा वसलेली असते. म्हणूनच राव रंक सर्वांचेच संसार टिकून आहेत. आजूबाजूची दुर्गा जाणून घ्यायची असेल तर फक्त ती वेगळी दृष्टी हवी, बस..!

  -सौ आरती अनिल लाटणे
  इचलकरंजी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code