Header Ads Widget

जिल्ह्यात कुष्ठरोग-क्षयरोगाबाबत मंगळवारपासून जनजागृती मोहीम - जिल्हाधिकारी पवनीत कौर

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : कुष्ठरोग व क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात दिनांक १३ ते ३० सप्टेंबर पर्यंत सक्रिय रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षीत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन क्षयरोग व कुष्ठरोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासह माहिती घेणार आहेत. या मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांनी केले आहेत.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.ढोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड, वैद्यकीय अधिकारी डॉ.अंकुश शिरसाट, जिल्हा वैद्यकीय पर्यवेक्षक दीपक गडलिंग, एकनाथ शिंदे, गजानन पन्हाळे, सांख्यिकी सहाय्यक सुभाष कुमावत आदी उपस्थित होते.

    या मोहिमेच्या माध्यमातुन आरोग्य विभागाचे प्रशिक्षीत कर्मचारी ग्रामीण व शहरी भागात सर्वेक्षण करुन सक्रिय कुष्ठरुग्णांचा शोध घेणार आहेत. तसेच घरोघरी जावुन सर्व नागरिकांची तपासणी करणार आहेत. नवीन कुष्ठरुग्णांना औषधोपचाराबाबत मार्गदर्शन करणार आहे. अशी माहिती श्रीमती कौर यांनी दिली.

    या रोगाच्या लक्षणांची तपासणी करणारी रुग्णालयातील यंत्रे सुस्थितीत असावी. सर्व आरोग्य संस्थांमध्ये औषधांचा साठा असावा. संशयीत क्षयरुग्णांच्या तपासणीचे अहवाल रुग्णालयाला तातडीने कळवावे. तपासणीचे दैनंदिन अहवाल तयार करावे. प्रशिक्षीत तंत्रंज्ञाच्या माध्यमातुन नमुन्यांची तपासणी करण्यात यावी अशा सूचना श्रीमती कौर यांनी संबंधितांना दिल्या. या मोहिमेची व्यापक जनजागृती करण्यात यावी असे आवाहन करुन मोहिम कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांच्या तपासणीचे उद्दिष्ट पुर्ण करण्यात यावे असे त्यांनी सांगितले.

    मोहिमेत आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, क्षयरोग अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्वयंसेवी संस्था यांचा समावेश राहणार असुन नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन श्रीमती कौर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या