• Mon. Jun 5th, 2023

शिक्षकाच्या अंगी कोणते आदर्श असावे.?

शिक्षण ही एक प्रक्रिया असून या प्रक्रियेत विद्यार्थी, शिक्षक व संस्थाचालक हे प्रमुख घटक असून या तीन घटकांत शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची असते.शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक व सल्लागार असतो.विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे कार्य शिक्षक करत असतो. त्यामुळे शिक्षक हा चारित्र्यसंपन्न, शीलवान व आदर्शाचे पालन करणारा असावा,अशी रास्त अपेक्षा असते.शिक्षक जसा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा असतो तसाच तो समाजाला मार्गदर्शक करणारा एक सामाजिक अभियंता देखील असतो.या पार्श्वभूमीवर शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व आदर्श असायला पाहिजे.परंतु दुर्दैवाने आज शिक्षक आपले चारित्र्य,आपले व्यक्तिमत्व गमावून बसत असल्याचे दृश्य बघायला मिळत आहे.शिक्षण व्यवस्थेत शिक्षकाची भूमिका बघता शिक्षकाच्या अंगी कोणते आदर्श गुण असावे हा प्रश्न या अनुषंगाने महत्वाचा आहे. शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असून त्यांचा एकमेकांवर सतत परिणाम होत असतो. सध्याच्या माहितीच्या विस्फोटाच्या युगात शिक्षकांवरील जबाबदारी फार मोठी आहे. विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे कारण उद्याचा समाज हा सतत शिकत राहणार आहे. यासाठी शिक्षकांची कार्यत्परता खूप महत्वाची आहे. शिक्षकांच्या छोट्य़ा-मोठ्या कृतीतून हे संस्कार जोपासण्यासाठी शिक्षक मातृहृदयी हवा. यामुळे मुलांचे दडपण कमी होते व आनंददायी शिक्षण होते. वर्गातील वातावरण प्रेरक होते.शिक्षकांचे वक्तीमत्व जेवढे प्रभावी, परिणामकारक, ज्ञान समृद्ध असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्या यांना सामारे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हे शिक्षकांनी आपले ध्येय समजले पाहिजे. स्वतःमधील उणिवा जाणीवपूर्वक दूर करणारा शिक्षकच आपले अध्यापनाचे कार्य अधिक प्रभावी, रंजक आणि सुलभपणे करू शकतो.

विनोबांनी शिक्षणावर भाष्य करताना फार मार्मिक सूत्र सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘शिक्षक विद्यार्थीनिष्ठ असावा. विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा, ज्ञान समाजनिष्ठ असावे आणि समाज समतानिष्ठ असावा.’’ शिक्षक जर विद्यार्थीनिष्ठ असेल तर कळ्यांचे फुलांत रूपांतर करू शकतो. पाठय़पुस्तकाबरोबर उघड्या जगाचे पुस्तकही शिकवतो. चांगला विद्यार्थीनिष्ठ शिक्षक हा सहवासातून, संवादातून, आचरणातून, चारित्र्यातून मनाची श्रीमंती असलेला कर्तबगार विद्यार्थी घडवू शकेल. घडवू शकतो आणि तो आपल्या पंचेंद्रियांना ज्ञानसन्मुख करून जीवनाला समृद्ध करणार्‍या संस्कारांचीही तो पेरणी करू शकतो. खरे तर त्यातूनच साक्षर मतदार निर्माण करीत नाही, तर तो कर्तव्यदक्ष नागरिक निर्माण करतो. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की दुसर्‍या कोणत्याही उपायांनी नागरिक निर्माण करता येत नाही आणि ज्या समाजात ‘मतदारा’पेक्षा नागरिकांची संख्या अधिक असते, तो देश अजिंक्य ठरतो. इतरांसाठी आदर्श देश बनतो. असे सजग आणि सेवाभावी नागरिक केवळ उत्कृष्ट असणारा शिक्षक निर्माण करू शकतो, हे विसरता कामा नये.
मात्र आज अध्ययन अध्यापन एक व्यवसाय झाला आहे.अध्यापनाला व्यवसायाचे स्वरूप आले आहे.वर्गात अध्यापन करणारे बरेचसे शिक्षक बाहेर शिकवणीला जातात.शिक्षक वर्गात कमी शिकवणीत जास्त दिसतात
अध्यापन हा पोटार्थी धंदा नसून तो धर्म आहे. अध्यापन ही सर्मपित भावनेने करावयाची उपासना आहे. ते केवळ उपजीविकेचे साधन नाही, तर देश उत्थानाचा ऐतिहासिक प्रयोग आहे. ती केवळ अक्षर ओळख करून देणारी आणि चार गणिते, दोन कविता शिकविणारी शाळा नव्हे तर कर्तबगार नवी पिढी घडविणारी प्रयोगशाळा आहे, अशी भूमिका घेऊन काम करणारा शिक्षक आज हरविल्याचे दिसते.
विद्यार्थी जसा निव्वळ परीक्षार्थी असता कामा नये तसा, शिक्षकही निव्वळ ‘अर्थार्जनाचे’ साधन म्हणून शिक्षण क्षेत्राकडे पाहणारे असता कामा नये. ‘शिक्षक’ असण्याची पहिली अट ‘विद्यार्थी’ असणे हीच आहे. ‘शिक्षक’ केवळ ‘पोपटपंची’ करणारा, प्रश्नांना वावच न देणारा असेल तर अर्थपूर्ण ज्ञान-व्यवहार संभवणार नाही. शिक्षक-विद्यार्थी परस्परपूरक असावेत. ‘चांगला’ शिक्षक विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करतो. माहिती तंत्रज्ञानाचा ‘विस्फोट’ झालेल्या काळात विद्यार्थी पूर्वीसारखा माहितीसाठी शिक्षकांवर अवलंबून राहिलेला नाही. माहिती देण्यासाठी सुसज्ज वाचनालयापासून ते माहिती महाजालापर्यंत अनेक साधने आज सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहेत. त्या साधनांची योग्य ती ‘दिशा’ त्यांना खुली करून द्यावी लागेल. विद्यार्थी त्यामुळे भटकणार नाही. ‘माहिती-व्यवस्थापन’ करत ‘कुतूहल’ व ‘जिज्ञासा’ जागृत करण्याचे काम शिक्षकांचे आहे. झपाट्याने बदलणार्‍या काळात सतत द्ययावत राहणे हे शिक्षकांसाठी देखील गरजेचे बनले आहे. काळाची नवीन आव्हाने पेलण्यासाठी शिक्षक-विद्यार्थी दोघांनाही आता स्वतःला परस्परपूरक व समर्थ केलेच पाहिजे.
शिक्षक आपल्या विषयात निष्णात असावा, विषयावर त्याची पकड असावी.
शिक्षक इतर बाबतीत विद्वान असो वा नसो आपल्याला जे शिकवायचे आहे त्या विषयात तो विद्वान असलाच पाहिजे. आपल्या विषयाच्या अनुषंगाने नवनीवन ज्ञान मिळवून, विभिन्न शैक्षणिक साहित्याचा अवलंब करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवले आणि आपली तासिका प्रसन्न चित्ताने शिकविण्यासाठी खर्च करील त्यांचे विद्यार्थी नक्कीच ऐकतात. या उमलत्या कळ्यांमधील आंतरिक शक्तींचा स्फुल्लिंग शिक्षकांनी चेतविला पाहिजे.
आदर्श शिक्षकाचा एक महत्वाचा गुण म्हणजे शिक्षक हा वाचनप्रिय पाहिजे. वाचनाचा व्यासंग त्याला असावा.विषयांसह इतर अवांतर वाचन शिक्षकांनी करायला पाहिजे स्वतःचा ग्रंथसंग्रह असणे आवश्यक आहे. आपले ज्ञान अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यामुळे कामात निर्माण होणारे कोणतेही प्रश्न हातळण्याची सूत्रे आपल्याला उपलब्ध होतात. शिक्षकाने नेहमी चिंतनशील असावे. कोणत्याही समस्येची उकल होण्यासाठी सखोल चिंतनाची आवश्यकता असते. शिक्षकाने चर्चा करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाच्या, बेशिस्तीच्या समस्या एकट्याने सोडविण्यापेक्षा सांघिक पद्धतीने सोडवाव्यात. इतरांची मने जाणून घेण्यासाठी समस्या हाताळण्याचे नवे तंत्र हाती येऊ शकते. आपल्या समस्या, अडचणी यांच्या नोंदी ठेवण्याची सवय शिक्षकांमध्ये आसायला हवी. आपल्या लेखनातून, पथनाट्यातून, एकांकिका, कथा, गीते, कविता, लेख यातून शिक्षक आपल्या समस्या मांडू शकतात. यातून त्यांच्या विचारांची तीव्रता इतरांना कळते. त्यावर चर्चा होते आणि समस्यांचा चक्रव्यूहातून मार्ग शोधला जातो.पण वास्तव काय आहे.किती शिक्षकांना वाचनाचा छंद आहे.किती शिक्षक वर्तमान पत्रासह अद्ययावत माहिती ठेवतात.? शिक्षकांना अध्यापन करताना उदाहरणे द्यायची असतात.सिद्धांताची सांगड घालताना त्याला व्यवहरिकतेची जोड देणे आवश्यक आहे.यासाठी शिक्षक बहुवाचक असला पाहिजे.मात्र शिक्षक केवळ थातुरमातुर वाचन करतात.वेळ मारून नेतात .
आजचे युग हे संगणकाचे युग आहे. कुठल्याही नव्या परिवर्तनाच्या आणि संक्रमणामागच्या शक्तीचा उगम प्रभावी शिक्षण हे माहिती व तंत्राधिष्ठीत आहे. आपल्या शाळांमधून परिक्षार्थी तयार करण्यापेक्षा खरे ज्ञानाकांक्षी, विवेकनिष्ठ प्रयोगवीर तयार होण्यासाठी प्रत्येक शाळा ही साक्षात प्रयोगशाळा झाली पाहिजे. शिक्षकांनी आपल्या वाट्याला आलेले काम कुशलतेने, आनंदीवृत्तीने, बिनचुकपणे, वेळेत आणि नियमांच्या आधीन राहून करायला हवे. बुद्धीवादी शक्ती या भूमिकेतून प्रत्येक शिक्षकाने नवनवीन अध्यापन तंत्राचा अवलंब करून विषयात सहजता आणावी. त्या त्या विषयाचा प्रत्यक्ष जीवनाशी असणारा संबंध स्पष्ट करावा आणि शिक्षण हे खऱ्या अर्थाने जीवन शिक्षण बनावे.विज्ञान तंत्रज्ञानाचे युग असल्याने शिक्षकाने स्वतःला अद्ययावत ठेवणे ,संगणकाशी जुळणे, तंत्रस्नेही असणे आवश्यक आहे.मात्र बहुतांश शिक्षकांना संगणक हाताळता येत नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालये बंद होते.या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना डिजिटल ऑन लाईन शिक्षण दिले जात होते.मात्र बहुतांश शिक्षक ऑन लाईन शिक्षण देताना चाचपडत होते आजही हीच परिस्थिती आहे.डिजिटल शिक्षण , ऑन लाईन शिक्षण त्यांना आव्हान वाटत आहे.काळ व परिस्थिती नुसार शिक्षकांनी स्वतःत बदल घडवून आणला पाहिजे.मात्र बहुतांश शिक्षक ऑन लाईन शिक्षणाशी जुळवून घ्यायला अजूनही तयार नाही.पारंपरिक साधने वापरण्यात शिक्षक स्वतःला धन्य समजतात.
दुसऱ्या घटकाचा, अध्ययनाचा, विचार केला, तर त्यासाठी आज प्रामुख्याने पारंपारिक साधने आणि पद्धतीच वापरल्या जात आहेत. अध्ययनाचे पारंपारिक साधन म्हणजे पाठ्यपुस्तक आणि पद्धत म्हणजे पुस्तकातले धडे वाचून त्याखालची प्रश्नोत्तरे सोडवणे. खरेतर कोणताही विषय शिकण्यासाठी आजच्या ऑनलाईन जगात प्रचंड मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेस उपलब्ध आहेत. युट्यूबवरचे व्हिडियोज, विकिपीडियासारखे माहितीचे संग्रह इथपासून ते अनंत ब्लॉग्ज आणि माहितीचे संकलन करणाऱ्या वेबासाईट्स उपलबद्ध आहेत. असे असताना अध्ययनासाठी फक्त पाठ्यपुस्तकावर अवलंबून रहाणे, हे शिक्षण मर्यादित चाकोरीमध्ये अडकवून ठेवण्यासारखे आहे. काही शाळांमधले काही शिक्षक, अशी साधने (रिसोर्सेस) वापरायला मुलांना प्रोत्साहन देत आहेत, मात्र बहुसंख्य ठिकाणी ऑनलाईन माध्यमाचा प्रभावी वापर करून, अध्ययन पाठ्यपुस्तकापलिकडे नेण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.
अध्यापन करताना काही वेळेला शिक्षकांकडून नकळत राजकीय परिस्थितीबाबत बोलताना आपली वैयक्तिक मते विद्यार्थ्यांवर लादली जातात तर कधी अंधश्रद्धा निर्मूलनासारखे विषय मांडताना विद्यार्थ्यांच्या श्रद्धेला, भावनेला धक्का पोहचणारी विधाने होतात. हे शिक्षकांनी टाळावे. अनेकवेळा विषयांचे स्ष्टीकरण करताना समाजाबद्दल अनेक नकारात्मक विचार मांडले जातात. जसे समाज खूप वाईट झाला आहे, आजकाल खरे बोलून जगताच येत नाही, पूर्वी जग चांगले होते, पण सध्या कलियुग आहे, समाजात नैतिकता राहिली नाही….. अशी मते मांडली जातात. काही अंश अशी अनुभूती समाजातून येतही असेल पण म्हणून ते काही विश्वसत्य नाही. त्यामुळे अशी विधाने टाळलेली बरी. मुलांच्या संस्कारक्षम मनावर त्याचा सखोल परिणाम होतो. मनात एक विकृत विचारसरणी रूजू लागते. समाजाकडे पर्यायाने जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. म्हणून वर्गामध्ये अशी विधाने करणे काटेकोरपणाने टाळावे. शिक्षकांच्या विचारातील सकारात्मकता, आशावाद, मुलांना जगण्याचे बळ देतो. भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करायची असेल तर शिक्षकांनी मुळात स्वतःला घडविण्याची, उत्तुंगतेची आस प्रथम असली पाहिजे. जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य आशावाद असला पाहिजे. कठोर वास्तवाला सामोरे जाण्याची जिद्द हवी. स्वतःचे एक व्रतविधान हवे.
मुलांमध्ये सदैव रमणारे साने गुरूजी म्हणतात त्याप्रमाणे जो मुलांना पावसात भिजायला शिकवतो, आकाशाशी दोस्ती करायला शिकवितो तो खरा शिक्षक. नाही तर विद्यार्थ्यांना गणिताची सूत्रे येतात पण त्या मागची तर्कसंगती समजत नाही. मग आयुष्यात तो विसंगतीचाच पाठपुरावा करतो. विद्यार्थी कविता शिकतात पण त्यातील सौंदर्य त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. विज्ञानाचे प्रयोग करतात पण त्यामागील विज्ञाननिष्ठा रुजत नाही. म्हणून शिक्षक हा मुळातच संवेदनशील हवा. शिक्षकांनी आपल्या समाजातील प्रतिमेला जडा जाणार नाही, आपल्या सुखदुखाचा, मानअपमानाचा लवलेशही विद्येच्या प्रांगणात प्रतिबिंबित होणार नाही याची दक्षता घेतली तरच ज्ञानदानाचे पवित्र कार्य तेवढ्याच तन्मतेने, उत्कटतेने पार पडेल.
शिक्षकाबद्दल समाजामध्ये कायम आदराचे आणि मान-सन्मानाचे स्थान असते. यात शिक्षकाचा भय, चिंता यांच्या गाठी शिक्षकांच्या सहज संवादाने दूर होऊ शकतात. विदयार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वत:च्या आयुष्यात नैतिक मूल्याचे आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडविणारे शिल्पकार टिकवून ठेवण्यास शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक शिकवण शिक्षक रुजवू शकतो.
जगात कुठेही गुरू आणि शिक्षकांचा आदर केला जातो, काहींना अपार प्रेम दिले जाते, तर काही शिक्षक हे आयुष्यावरच केवळ प्रभाव टाकत नाही तर त्यांच्या जीवनातही स्थित्यंतर घडवून आणतात. शिक्षक विदयार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतात. जी भावी स्वप्ने (मुलांनी उराशी बाळगलेली असतात ती समजून घेत ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. शिक्षकाचे काम हे मार्गदर्शक, समुपदेशकाचे किंवा दिशादर्शकाचे असते.
एकंदरीत,
भारतीय संस्कृतीत गुरूला जी प्रतिष्ठा मान सन्मान होता तो कुठंतरी हरवत आहे.यात काही शिक्षक अपवाद आहेत. चारित्र्य संपन्न, शीलवान, विद्यार्थी प्रिय शिक्षक आजही बघायला मिळतात .मात्र पूर्वी इतका सन्मान गुरूंना मिळत नाही.हे वास्तव आहे याचं ,भान शिक्षकांनी स्वत:च ठेवत स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. बर्‍याच वेळा असं होतं, शिक्षकांमध्ये हजारातील एकाकडून एखादी चूक घडली की, सार्‍याच शिक्षकांकडे त्याच नजरेने पाहणे चुकीचे आहे. अनेक आदर्श शिक्षक म्हणणपेक्षा सारेच आदर्श शिक्षक असतात. त्यांच्यातील गुणांकडे डोळेझाक करून चालणार नाही. शिक्षक म्हणजेच शी-शीलवान, क्ष-क्षमशील, क-कर्तृत्ववान. ज्यामध्ये हे सर्व गुण असतात तो खरा आदर्श शिक्षक. मग यला अगदीच शोधलं तर कुठेतरी एखादा गुण कमी जास्त असतो, म्हणून सर्वच शिक्षकांना एका मापात तोलणे चुकीचे आहे. शिक्षकांनी चांगल्या केलेल्या कामाची नोंद वेळोवेळी झाली पाहिजे. शिक्षकांमधील आदर्श गुणांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.
– प्रा डॉ सुधीर अग्रवाल
एस के पोरवाल महाविद्यालय,
कामठी, नागपूर
९५६१५९४३०६

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *