• Sun. Jun 11th, 2023

लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी अमरावती महानगरपालिका सुसज्ज

    * अमरावती महानगरपालिकेचे मनुष्यबळ साधन-सामुग्रीसह सेवेस तत्पर
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महानगरीची सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेशोत्सवास यंदा दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरुवात झाली आणि अनेक अमरावतीकरांच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन होण्यासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये देखील गणराय विराजमान झाले. या लाडक्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी (दिनांक ०९ सप्टेंबर २०२२) निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे विनंतीही आपण करणार आहोत. या अनुषंगाने गणरायाला निरोप देण्यासाठी अमरावती महानगरपालिका विविध सेवा-सुविधांसह सुसज्ज आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांच्या मार्गदर्शनात अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने विविध स्तरिय सेवा-सुविधांबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने छत्रीतलाव व प्रथमेश जलाशय नैसर्गिक विसर्जनस्थळी करण्यात आलेली विविध स्तरिय सुव्यवस्था आणि २१ ठिकाणी अमरावती महानगरपालिकेद्वारे उभारण्यात आलेले कृत्रिम विसर्जन स्थळांचा समावेश आहे, अशी माहिती उपायुक्‍त डॉ.सिमा नैताम यांनी दिली आहे.

    याबाबत अधिक माहिती देतांना महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांनी सांगितले की, अनंत चतुर्दशी दिनाच्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठीची पूर्वतयारी ही साधारणपणे गणेश चतुर्थीच्या आधी जवळ-जवळ दीड ते दोन महिन्यांपासून करावी लागते. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेद्वारे विविध गणेश मंडळांबरोबर समन्वय साधून अगदी त्यांना मंडपाच्या परवानग्या देण्यापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतच्या विसर्जनापर्यंत दिवसरात्र पद्धतीने कार्य केले जाते. अनंत चतुर्दशीदिनी अमरावती महानगरपालिकेचे कामगार, कर्मचारी व अधिकारी अव्याहतपणे कार्यरत असतात. या दिवशी मोठ्या संख्येने अमरावती महानगरपालिकेचे मनुष्यबळ कार्यरत असते.

    जीवरक्षकांसह इतर व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जनापूर्वी भक्तांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य कलशांसह निर्माल्य वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.छत्री तलाव व प्रथमेश जलाशय येथे सुरक्षेच्या दृष्टीने निरिक्षण मनोरे उभारण्‍यात आले आहेत. स्‍वागत कक्ष तयार ठेवण्‍यात आली आहेत. आरोग्‍य विभागाकडून प्रथमोपचार केंद्रांची व्‍यवस्‍था करण्‍यासह रुग्णवाहिका देखील सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

    प्रभावी प्रकाश योजनेसाठी महानगरपालिकेच्या प्रकाश विभागाने खांबांवर व उंच जागी दिवे (फ्लड लाईट) व शोधदीप (सर्च लाईट) ची व्यवस्था, नागरिकांच्या सोयीसाठी फिरत्या शौचालयांची (मोबाईल टॉयलेट्स) व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहिनासहीत मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री गणेश विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी जे.सी.बी. मशिन्स इत्यादी यंत्रसामुग्री देखील तैनात करण्यात आली आहे.

    अनंत चतुर्दशीदिनी सर्व विसर्जनस्थळी नागरिकांनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवा दरम्यान गर्दीच्या ठिकाणी तसेच विसर्जन प्रसंगी पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी, जेणेकरुन अप्रिय घटना टाळता येतील. तसेच या दिवशी अमरावती महानगरपालिकेद्वारे व पोलीस दलाद्वारे देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

* हे वाचा – नवनीत राणांचा लव्ह जिहादचा दावा खोटा?, मुलीचा पोलिसांना जबाब

    * नागरिकांनी श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करतांना घ्‍यावयाची काळजीः-
    * १. खोल पाण्‍यात जाण्‍याचा प्रयत्‍न करु नका.
    * २. गणेशमूर्ती विसर्जनाकरीता महानगरपालिकेमार्फत नेमण्‍यात आलेल्‍या प्रशिक्षित मनुष्‍यबळाची मदत घ्‍या.
    * ३. अंधार असणा-या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाण्‍याचा प्रयत्‍न करु नका.
    * ४. महानगरपालिकेने पोहण्‍याकरीता निषिद्ध केलेल्‍या क्षेत्रात जाण्‍याचा प्रयत्‍न करु नका.
    * ५. गणेशमूर्तींचे विसर्जन करताना शक्‍यतो प्रशिक्षित मनुष्‍यबळाचा वापर करा.
    * ६. तलावात कुणी बुडत असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास त्‍वरित त्‍याची माहिती अग्निशमन दलाच्‍या जवानांना / पोलिसांना / जीवरक्षकांना द्या.
    * ७. नाका-तोंडात पाणी गेल्‍यामुळे श्‍वसनाचा त्रास जाणवत असल्‍यास तात्‍काळ वैद्यकीय मदत घ्‍या.
    * ८. अफवांवर विश्‍वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.
    * ९. भाविकांनी आपल्‍या लहान मुलांची विशेष काळजी घ्‍यावी. त्‍यांना पाण्‍यात / विसर्जनस्‍थळी जाण्‍यापासून मज्‍जाव करावा.

    अमरावती महानगरपालिकेने सर्व विसर्जनस्‍थळी सर्व ती व्‍यवस्‍था केली असून अमरावतीकर गणेशभक्‍त नागरिकांनी सर्वतोपरी काळजी घेऊन श्रीगणरायाला भावपूर्ण निरोप द्यावा, असेही आवाहन अमरावती महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *