• Mon. Jun 5th, 2023

माय इंडिया : मानवी स्वातंत्र्यासाठी भाकरीचे महायुध्द् लढणारी कविता

  माय इंडिया कवितासंग्रह हातात घेतला तो कधीपूर्ण वाचून झाला हे कळलेच नाही. वर्तमान समाजव्यवस्थेची आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी असलेला हा कवितासंग्रह नव्या भारताच्या उभारणीसाठी नक्कीच हातभार लावले असा आशावाद या कवितेत आहे.आंबेडकरवादी साहित्याच्या प्रांतात अनेक कसदार अंगाने वाड्:मय निर्मिती होत आहे.मधल्या काळात जो साचलेपणा निर्माण झाला होता तो साचलेपणा प्रवाहित करण्यासाठी हा कवितासंग्रह उपयुक्त वाटतो.

  कवी दीपककुमार खोब्रागडे यांचे यापूर्वी वायटूळ,नवी पहाट,कर्जाची जखम असे दर्जेदार कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत.त्याच्या प्रगल्भ जाणीवांचा आलेख माय इंडिया या कवितातून रेखांखित झाला आहे.अवैज्ञानिक दृष्टीवर वैज्ञानिक दृष्टीची नजर कवीला गवसल्याने माय इंडिया कवितामध्ये ज्वलंत जीवनाचे भावचित्रन उत्कृष्टपणे रेखाटले आहे.ही कविता आंबेडकरवादी कवितेला नव्या उंचीवर घेऊन जाणारी आहे असे वाटते. स्वतःच्या कष्टप्रधान आयुष्याचे रडगाणे न गाता वैश्विक मूल्यांचे बीजं अंकुरत विश्वसमृध्दतेच्या नव्या मानवीय पादपाना बुध्द् प्रज्ञेचे फळ लावते हेच या कवितासंग्रहाची यशस्वीता आहे.

  आंबेडकरवादी कविता ही दिशादर्शक असून युगप्रवर्तन करण्याचे सशक्त माध्यम आहे.आंबेडकरवादी कविता हा समूहाचा सूर असून मानव उत्थांनाच्या आणि परिवर्तनच्या समाजक्रांतीचा पाया आहे.सृजनत्वतेच्या माध्यमातून जग बदल घडवून आणण्याची ताकत आंबेडकरवादी कवितेत आहे.ही कविता सौंदर्याच्या महाराजबागेत विहार न करता झोपडी झोपडीत भाकरीच्या महासूर्य प्रज्वलीत करणारा आहे.हाच संदेश माय इंडिया देत असून सर्व समाजाला नवा उन्नयन मार्ग प्रदान करेल यात शंका नाही.

  आंबेडकरवादी कवितेची लढाई प्रस्थापित कुव्यवस्थेबरोबर अाहे.या अवस्थेला परिवर्तनशील करायचं असेल तर हातात शस्त्र घेऊन आपण लढाई जिंकू शकत नाही.त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मुलमंत्र सदैव स्मरणात तेवत ठेवायला हवा.ते म्हणतात की,’ Since the Buddhist people can not rule with arms and weapons they should learn to rule with brain and pen.’ राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जी परिवर्तनची लढाई लढले ते कोणत्याही विध्वसंक शस्त्रांने लढले नाही,तर बुध्दी आणि पेन या सनदशीर मार्गानेच लढले.तीच शस्त्रे शब्दाच्या माध्यमातून समाजाला नव्या व्यवस्था परिवर्तनासाठी सज्ज करत आहेत हेच आंबेडकरवादी कवितेचे यश आहे.

  कविता ही ज्वालेसारखी असून रचनाबंधाचे सारे सनातनी बँरेकट्स उध्दवस्त करून सूर्यकुलाचे नवे नाते सांगत सुर्यमुखी होण्याचे आव्हान करते.जोतीराव फुले यांची अखंड मानवनिर्मितेची सुवर्ण कार्यशाळा असून सत्येच्या पुढे असत्याचे काहीही चालत नाही कारण “सत्य सर्वांचे आदी घर,सर्व धर्माचे माहेर” ही सत्य जाणीव नेणीव आंबेडकरवादी कवितेला लाभली यातूनच नवा माय इंडिया निर्माण करण्याचे शब्दबळ कवीला मिळाले आहे.

  माय इंडिया कवितासंग्रहाच्या मनोगतात म्हणतात की,’ भाकरीच्या स्वातंत्र्याचे दिवस संपतील असे मला वाटत होते.परंतु हाच भाकरीचा प्रश्न आज माझ्या समोर उभा आहे.भाकरीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सोडवतांना मला बुध्द्-मार्क्स-आंबेडकर असे मसिहा भेटल्याचे कबूल करतात .’ यावरून कवीचे तत्वज्ञान हे बुध्द्-मार्क्स-आंबेडकर या तीन रसायनांनी संपृक्त झालेले आहे.उर्ध्वपातनशीलतेच्या प्रयोगातून सत्व टिकवणारी ही त्याची धडपड वाखण्याजोगी आहे.ते पुढे म्हणतात की,’जात आणि वर्गवादातील शोषितांना या जगात धर्मशाही आणि भांडवलशाहीन आपल्या पायाखाली ,टाचेखाली दाबून ठेवले असून त्यांचे पंख छाटून टाकले आहे.’ही विषमता उध्दवस्त करण्यासाठी,प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अव्यवस्थेविरूध्द एल्गार पुकारून “माय इंडिया” हा कवितासंग्रह तयार झाला आहे.कवी दबलेल्या व पिळलेल्या वर्गाचा प्रतिनिधित्व करीत असून त्यांच्या वेदना माय इंडिया या कवितेतून साकार झाल्या आहेत.आजच्या भयकंप वातावरणात धर्मांध राजकारण्याचा एक छत्री अमल असतांना कॉमन मँनची लढाई लढण्यासाठी सज्ज दिसतो.आधुनिक बाजारपेठेतील शब्दाच्या खेळात चंगळशाही समूहात माय इंडिया भन्नाट दारिद्रयाचा देश कधी झाकोळून टाकला हे कळत नाही.म्हणून माय इंडिया मला न विसरणारा महाऊर्जावान सम्यक भारवाहक वाटतो.

  माय इंडिया हा कवितासंग्रह उत्कृष्ट व उत्कट बांधणीचा असून मुखपृष्ठ व मलपृष्ठावरील छायाचित्राने अंतरंगातील भावस्पर्शी स्पंदने प्रतिबिंबित केले आहे.युरो वलर्ड पब्लिकेशन मुंबई ने हे पुस्तक प्रकाशित केले असून ,या कवितासंग्रहात एकूण ८९ कविता आहेत.यातील प्रत्येक कविता महासूर्याच्या तेजवलयाने प्रज्वलीत झालेल्या आहेत.या कवितासंग्रहाची प्रस्तावना ख्यातनाम नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी लिहली आहे.ते प्रस्तावनेत लिहितात की,”माय इंडिया भाकरीचे महायुध्द् आहे”.ते पुढे लिहितात की,”सुटा सुटा आशयातील ही कविता मेंदूत साठत जाऊन एकसंघ असा विचार आपल्यात नकळत पेरत जातो.”ही मिमांसा या कवितासंग्रहाची भाव्योजकता प्रस्तुत करते.ते म्हणतात की,मी कविला काव्यकार या शब्दाने पुकारणार आहे.(जसा कथाकार,नाटककार,कादंबरीकार तसा काव्यकार) असा मूलगामी विचार शब्द कविला दिला आहे.कवितेची निर्मिती भावस्पर्शी अंतरंगात होत असली तरी तीचे प्रात्यक्षिक जीवनाच्या रणभूमीवरच दाखवावे लागते.भूक – भूकेतून शब्द –शब्दातून कविता—-आणि कवितेच्या ओळीओळीतून जाणवणारा विद्रोह ;हा बुध्दाच्या करूणेची व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विवेकशीलतेची जोड आहे.असा तर्कनिष्ठ विचारगर्भ व्यक्त केला आहे.

● हे वाचा – दीक्षाभूमी गौरव ग्रंथ : क्रांतिकारी सृजनत्वाची ग्लोबल निर्मिती

  कवी दीपककुमार खोब्रागडे यांच्या कवितेची खोली अतिशय गहरी असून पर्वताच्या शिखरावरून खळखळत पडणाऱ्या शुभ्र धबधब्यासारखी त्याची कविता नवे नंदनवन फुलवायला तयार आहे.दगडाच्या काळोखरेघातून प्रवाहित होणारा महाप्रपात ज्याप्रमाणे आपला मार्ग तयार करतो तसा मार्ग कविने आंबेडकरवादी कवितेत तयार केला आहे.प्रस्थापित पांढरपेशीय साहित्याच्या प्रांतात मानवतेचं नवं सम्यक शील्प कोरण्यासाठी तो सज्ज झाला आहे.

  साठोत्तरी काळापासून परिवर्तनवादी महाकविताजागर आंबेडकरांच्या ज्वालाग्राही क्रांतीने व्यवस्था परिवर्तन करायला निघाला आहे.या विचारांने नवे मूल्यगर्भ,चिंतनभाव,संविधानमूल्य, मानवमूल्य,जीवनवादी मूल्य प्रदान केली आहेत . जागतिक पातळीवर या कवितेने उत्तुंग भरारी घेतली आहे.कविजवळ भौतिकसाधनसामग्री नसतांना नव्या दीक्षाभूमीची समग्र मानवीय संवेदना कवितेतून प्रस्तुत झाली आहे.

  कवी ” या भटक्या चळवळीत उद्याची क्रांती” या कवितेत राजकिय व सामाजिक चळवळीची झालेली वाताहात राहून व्याकुळ होतो.उद्याच्या क्रांतीसाठी आपल्या बांधवाना तयार करतो.रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना आव्हान करतो.आकाशातील निळा ध्वज माऊंट एव्हरेस्टवर फडकवून पोटातील सूर्य घेऊन नव्या चंद्रावर जाण्याचे स्वप्न पाहतो.ते या कवितेत लिहितात की,

  “आता खेड्यातला आणि शहराच्या झोपडीतला
  माणूसच होईल उद्याचा पुढारी
  तोच लढेल शेतकरी,भूमिहिनांचे कामगारांचे युध्द..
  पृ क्र २

  कॉर्ल मार्क्स हा अतिरिक्त मूल्यांचा सिध्दांत मांडतो.दास कँपिटल,कॉमुनिस्ट मँनोफेस्टो या ग्रंथातून समाजवादी सिध्दांताची पेरणी करतो.नव्या क्रांतीसाठी कामगारांना एक करते.कवी “आम्ही हे युगच बदलवू शकतो ” या कवितेत म्हणतो की,

  त्यांच्या लॉगमार्चमध्ये मला दिसत आहे मार्क्स-आंबेडकर
  आणि बुध्द्ही ओठातून हसत आहे बाहून दोन गुलाबाकडे
  ……………..
  तुमच्या घामावरच लिहला जातो इतिहास मागील शतकापासून
  माणसा! पुढच्या काळात आम्ही हे युगच बदलवू शकतो..
  पृ क्र २२

  जग बदलविण्याचा आशावाद या कवितेतून दिला आहे.आधूनिक जगामध्ये आहे रे वर्गाचे नाही रे वर्गासोबत सातत्याने महायुध्द् सुरू आहे.आहे रे वर्गाची मक्तेदारी समाप्त करण्यासाठी मार्क्स समाजवादी सिध्दांतातून बंड पुकारतो,कामगारामध्ये लढण्याचे स्फुलिंग चेतवतो .याच विचारातून जग नव्या परिवर्तनासाठी तयार करतो.

  कवीच्या जीवनात अतिशय दुःखमय क्षण आले आहेत. चुनाभट्टीत व विटभट्टीत विटांना जसे भाजले जाते तसे कवीचे जीवन पोळून निघालेले आहे. जगण्याचे ओझे वाहणारा हा कवी ज्योतिषशास्त्राला आव्हान देतो. विद्रोहाची ठिणगी पेटवून अवघ्या विश्वाला क्रांतीसाठी तयार करतो.भंगार आयुष्य झालं आहे .गरिबी ह्या देशाला भिनलेला महागंभीर आजार आहे. हजारो लोक उकिरड्यावर भंगार गोळा करून स्वतःच्या आयुष्याचा सूर्य शोधत आहेत. अनवाणी फिरुन पसाभर कणासाठी जीवनाची लढाई लढतो.पण रक्तबंबाळ झालेल्या मनाला ममतेची पालवी फुटत नाही हे आपल्या माय इंडियाची कमाल आहे.पांढरपेशी लेखक/ कवी या ज्वलंत विषयावर का बरं लिहत नाही..? चंद्र, तारका, सौंदर्य यावर अवास्तव कविता रचणाऱ्यांना हा विषय का होत नाही. त्यांना जीवनवादी तत्त्वज्ञान मान्य नाही का.? कलावादी रुपरंगात श्रृगांरिक पेहरावात नटलेली कविता माय इंडियाला कोणतेच मोल देऊ शकत नाही. म्हणून “भंगार” कवितेत कवी म्हणतो,

  “लिहा ना माझ्यावर एखादी कविता, शब्दाची शाळा कुठे आहे ?
  क्रांती च्या दुनियेत हे जगच आता परागंदा झाले…..
  पृ क्र २४

  माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण न करणारे सरकार बेरोजगारांची थट्टा करीत आहे. त्यांच्या हाताला काम नाही फक्त जिओचा फ्री डाटा ने तरुणाईचं मन उद्ध्वस्त करून टाकलं आहे. प्रायव्हेट जिओला सुगीचे दिवस येऊन बीएसएनएल रसातळाला गेली आहे. राजकीय सारीपाटीवरचा खेळ पोटात भाकरीचा सूर्य घेऊन जीवन घालवणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन पंख देत नाही.नोटबंदीच्या कुअर्थचक्राने एटीएम मध्ये पैसा नाही .आता आपला आवाज बुलंद केला पाहिजे. आपण “बंद पुकारला पाहिजे” या कवितेत ते म्हणतात की,

  “कामाला दाम नाही आता संपावर गेले पाहिजे
  माणसाची झुंड घेऊन देशात बंद पुकारला पाहिजे.
  पृ क्र २६
  “गिरते रात्र तेव्हा “या कवितेत तो म्हणतो,
  गिरगिरते रात्र तेव्हा मी उठून उभा होतो
  सायकलचे पायडल फिरवित मी रस्त्यावर येतो
  पृ क्र २६

  भयावह रात्रीतून ऊठून सायकलवर स्वार होऊन रस्त्याने जातांना भिकारी दिसतो. आकाशातील चंद्र अस्तचलाला सरकत जातो. मडक्यात पाण्याचा सूर्य घेऊन येत आहे त्या कुंभाराच्या जीवनाचे प्रतिबिंब अधोरेखित करून वास्तव वास्तव जीवनाचा आरसा वाचकाला दाखवला आहे .नव्या युगाच्या निर्मितीसाठी सर्व माणसाने एक व्हावं. संघटित झाल्याशिवाय क्रांतीला किंमत नसते. सरकारच्या कावेबाजाला परावृत्त करून सामंतशाहीच्या पतनासाठी आपले आयुध पाजवली पाहिजेत. सम्यकतेची ज्वाला बनवून अन्यायावर पेटून उठले पाहिजे. “उद्याच्या माणसासाठी “या कवितेतील भावार्थ नव्या युगाची गाणी गाणार आहे ते म्हणतात,

  उद्या पुन्हा पुन्हा असेच झाले तर रस्त्यारस्त्यावर झाडे तोडू
  सगळ्या विजेच्या खाबांना लावू आणि या सत्तेला खड्ड्यात टाकून देशभर फिरत राहू
  उद्याच्या माणसासाठी
  नव्या युगासाठी …
  पृ क्र २८

  कवीला नवे युग निर्माण करायचे आहे. हे युग ग्लोबलमध्ये परावर्तित कसं झालं त्याची चिकित्सा मांडणी केली आहे.ग्लोबल संस्कृतीच्या वर्तमानाच्या जाहिरातबाजीने भविष्याच्या प्रकाशाला स्वतः पेटीत कुलूप बंद केलं आहे. कॉमन मॅनच जग जसं होतं तसं आहे .मोबाईलच्या सत्य युगातही चौकातील जग खरे ग्लोबल जग वाटते.कारण काॅमन मॅनचे जीवन चौकातच तयार होते ते “ग्लोबल युग” या कवितेत म्हणतात,

  “इथेच दिसते बाबा मला माझे गोल्बल युग
  बरे आहे पोटापुरते इथेच शोधले सूर्यजग…
  पृ क्र २९

  रंगचित्रांच्या माध्यमातून भावविश्वचितारणारा काॅमन मॅन कवी हा स्वतःचा भुतकाळ विसरत नाही. चित्राची रेलचेल भींतीवर असली तरी माझा असली चेहरा दिसत नाही. दारिद्र्याची लढाई संपत नाही.पिळवणुकीचा कारखान्यात स्वतःचा शहामृग हसत नाही. जगण्याचे स्तोत्र वाजवणारा पिपारी दिसतो पण भारताचा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकणारा माझा आंबेडकरवादी नेता दिसत नाही. ही खंत व्यक्त केली आहे. ते “डिझाईनचे कवर” या कवितेत म्हणतात,

  या दुनियेत बेदर्दी पिपारी वाजवतच चालावे लागेल
  या लाल किल्ल्यावर माझा माणूस अजूनही सापडत नाही …
  पृ क्र ३०

  भारत देश कृषिप्रधान आहे. या कृषिप्रधान देशात शेतकरी वर्ग खाऊजा या धोरणाने नेस्तनाबूत झाला आहे. आपल्या देशात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्याला आत्महत्या करायला लावणारी मुजोर व्यवस्था जागतिकीकरणाने निर्माण केली आहे. सेजच्या माध्यमातून अन्नधान्य पिकविणारा पोशिंदा वर्तुळा बाहेर फेकला जात आहे. म्हणून “क्रांतीसाठी” या कवितेत मायला म्हणतो.

  ही माझी कविता गवताच्या भाऱ्यात असू दे उद्यासाठी
  माय, या बैलांच्या पेंढीत ठेव विचार क्रांतीसाठी
  ………………
  मी मांडव टाकला आहे म्हणूनच ऋतू चक्र फिरवण्यासाठी
  बापाची तिफन घेऊन मोर्चा काढणार आहे जगण्यासाठी…
  पृ क्र ३६

  अशी ज्वाजल्यपूर्ण कवितेत चपलख शब्द मांडून शासनाच्या चुकीच्या धोरणासाठी बापाची तिफन घेऊन कवी मोर्चा काढण्याचा इशारा देतो आहे.ही कविता निळ्या क्रांतीसाठी तत्पर असणारी आहे.आंबेडकरी कवितेची भाषा ही योग्य परिवर्तनासाठी असल्याने अशी कविता आंबेडकरवादी निर्माण करू शकतो.जगण्याचे संदर्भ बदलून गेले असून नवीन फॅशनेबल दुनिया निर्माण झाली आहे .शाळेतील संस्कार लोप पावले असून अनैतिकतेचा काळा बाजार भरला आहे. आदिवासी यांच्या जीवनाला काहीच मिळत नसताना त्याचे फक्त सांस्कृतिक चित्रणातून स्वतःची हौस पूर्ण करून अमाप पैसा चित्रकार कमावतो आहे. त्यानेच माय इंडियाला बंदिस्त करून टाकलेले आहे.आमचा युगनायक कुठे ठेवला आहे असा आर्त टाहो कवी “खुला चित्रपट “या कवितेत प्रदर्शित करतो तो म्हणतो,

  आता दुःखातही फुंकर घालावी असा कोणी राहिला नाही
  आमचा कालचा युगनायक तुम्ही कुठे ठेवला आहे.
  पृ क्र ३८

  ही कविता यशवंत मनोहरांच्या शैलीतील वाटते .सरांच्या शैलीचा प्रभाव काही वेळेवर कवितेवर नक्कीच जाणवतो आहे. कमी दीपककुमार यांच्या अनेक कविता एक ऊर्जेची बारूद असल्याचा भास होतो .काही कवितेतील शब्दाचे चित्र अनाकलनीय वाटते. शब्दांचे अर्थ जुळताना शब्दछटातील तारतम्य पुढे -मागे होते. पण ही कविता विश्व संवर्धनाची असल्याने कवितेचा भावार्थ हा वाचकाला नव्या उंचीवर घेऊन जातो. ग्रामीण व शहरी शब्दांचा साज कवितेला मिळाल्यामुळे कविने वाचकाला नवा मूल्यगर्भ भावस्पर्श ओयासीस दिला आहे.

  भारतीय राजकारणातील कुटिल कारस्थानांना बळी ठरलेला रोहित वेमुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शस्त्र घेऊन विद्यापीठात नाव कमावत असताना फँसिस्टवृत्तीच्या दहशतवाद्यांनी एका स्काँलरला आत्महत्या करायला भाग पाडलं. ही आत्महत्या मनूकपटाच्या जोरावर आधुनिक धर्मांद राजकारण्यांनी केलेला मनुखून आहे. येथेच भारतीय संविधानातील अनुच्छेदाचा चकणाचुर झाला आहे .जातीची वास्तविक दाहकता किती भयावह असते ते या प्रकरणातून दिसून येते .रोहित वेमुलाला श्रद्धांजली अर्पण करताना कवी म्हणतो,आता तुझ्या देहाची राख घेऊन आम्ही उठून उभे झालो आहोत रस्त्यात कोणी आडवे झाले तर तिथेच कब्रस्तान करणार आहोत.

  पृ क्र ४३

  असे आक्रंदन शब्दाच्या माध्यमातून मांडून वर्तमान परिस्थितीची तपासणी करतात. भारत देशात राष्ट्रवादी या नावाने देशभक्त व देशद्रोही अशी विभागणी करून रुढी परंपरेवर हल्ला केला तर ते कोणालाही देशद्रोही म्हणतात .कन्हैयाकुमार यांनी जे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला कवी शब्दांच्या माध्यमातून पाठिंबा देतो. ते “कन्हैयाकुमार” या कवितेत म्हणतो,

  कन्हैया,आ ग झालो मी
  हा जळता निखारा ठेवला आहे मुठीत
  आता अग्निबाण घेतला मैदानात या देशावर पहारा ठेवत राहू……
  पृ क्र ४४

  धर्मांध शक्तींपासून देशाला वाचवण्यासाठी अग्निबाणाचा वापर करून पाहारा ठेवणार आहेत. हे कवितेतून दिग्दर्शित करतात .शोषित, पीडित, आदिवासी यांना येथील उच्चवर्णीय समाज उन्नतीच जीवन जगू देत नाही .१९५६ नंतर झालेल्या भिमक्रांतीची प्रगती पाहू शकत नाही .शतकांचा अंधार जाऊन समतेची धम्म पहाट रूचत नाही.म्हणून भोतमांगे परिवाराला अमानवीय वृत्तीने मारून टाकतात. पुरोगामी महाराष्ट्रातील ही घटनाच माणसाच्या माणुसकीवर ठपका आहे .बौद्ध समाजातील दुफळीचा फायदा घेऊन एका निरागस परिवाराला समाप्त करणे म्हणजे अजूनही जातीची दहाकता किती भयावह आहे याची प्रचिती येते. आपल्या न्यायव्यवस्थेत आपले न्यायाधीश नसल्याने आपल्याला न्याय मिळत नाही. म्हणून कवी “भैयालाल भोतमांगे मु. खैरलांजी” या कवितेत म्हणतो,

  इतक्या वर्षानंतर आठवते आजही तो प्रसंग
  आणि गदगदून घायाळ होतो मी भैयालाल तू तर या दुनियेतून निघून गेला
  आता वाट पाहत आहे
  कोण फासावर लटकतात तर !
  या अत्याचारावर हातोडा मागण्यासाठी
  आपला न्यायाधीश कुठे आहे.?
  पृ क्र ४५

● हे वाचा – दीक्षाभूमी गौरव ग्रंथ : क्रांतिकारी सृजनत्वाची ग्लोबल निर्मिती

  असा सवाल स्वतः करत आहेत. कवीचे जीवन अनेक खाचखळग्यांनी भरलेल्या समस्येचा हिमालय डोक्यावर असताना पत्नीने दिलेल्या सहकार्याला ते विसरत नाही .तिने जर कवीला साथ दिली नसती तर माय इंडियाचा भाकरीच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा सैनिक निर्माण झाला नसता. रमाईच्या कारूण्याची जाणीव व सावित्रीमाईच्या त्यागाची परिणामकारकता असल्याने कवीला विद्रोहाचा सूर्य दिला असून आता तू हिमालयावर बुद्धाचा पंचशील ध्वज फडकवण्यासाठी जा असा संदेश दिला आहे. ते “राजेश्री दीपककुमार खोब्रागडे” या कवितेत लिहितात,

  या अग्नीच्या तांडवात माता भटकत होता
  या विद्रोहाच्या शाळेत मला सूर्य देत होतीस
  …………
  या हिमालयावर चढताना आता थांबणार नाही
  मी निघालो तेव्हा बुद्धाचा ध्वज देत होतीस…
  पृ क्र ४७

  आपल्या संसाराची प्रगल्भजाणीव कवीने मोठ्या खुबीने वाचकासमोर प्रस्तुत केली आहे .भटक्यांच गारुड हजारो वर्षापासून स्वतःच्या पाठीवर वागवत आहेत .स्वातंत्र्यानंतरही त्यांना गाव नाही, नाव नाही, दरी कपारीतून गावकुसाबाहेरील गावदरीत जगणारा बांधव स्वतःचे शिक्षण घेऊन शकत नाही. शिक्षणाचा उजेड त्यांच्या जीवनात पसरत नाही. माय इंडियाचा माणूसच भारतीय संविधानाच्या तरतुदी पासून वंचित आहे. या भटक्यांची लढाई लढणारा कोणीच पुढारी नाही. जे आहेत ते फक्त प्रस्थापित राजकीय पार्टीचे चमचे आहेत. त्यामुळे त्यांना नैसर्गिक हक्क सुद्धा मिळत नाही .राजकारणात प्रभाव पाडणारा नेता नसल्याने अनेक मोर्चे निघतात पण त्यांच्या मागण्या पूर्णत्वास जात नाही. म्हणून आता ते दीक्षाभूमीच्या पाठशाळेत प्रवेश घेत आहेत. या ज्ञानप्रकाशातूनच उद्याचा इतिहास हा भटक्यांचा असेल असा आशावाद कवीने रेखाटला आहे “भटक्याचं गाव” या कवितेत ते म्हणतात,

  यांना करा कुलगुरू विद्यापीठात द्या जागा
  पाठशाळेचा रस्ता याचा कोणी बंद केला ..?
  तुला स्वातंत्र्य मिळणार नाही कधीच या देशात
  तू झालाच या क्षितीजावर नेहमीसाठी उपरा
  आता मोर्चे निघत आहेत नागपूर पासून मुंबई पर्यंत
  तू कुठे दिसत नाही गल्लीपासून दिल्लीपर्यंत…..
  पृ क्र ४९

  माय इंडिया तील मूलनिवासी स्वतःचं अस्तित्व शोधत आहेत. पण त्याचं अस्तित्व कुविचारी ग्रंथांनी केव्हाच बंदिस्त करून टाकलं आहे. हा मूलनिवासी याला समाजात स्थान नाही .माय इंडियाला उन्नतीच्या शिखरावर नेणारा, सतत पहारा देणारा, वैदिक संस्कृतीच्या अंध भक्तीत मशगुल झाला आहे.स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी रोज लढतो पण जीवनात उजेडाची पहाट येत नाही .चित्रपटाच्या दृश्यात दिसणारी वास्तवता नायकांच्या जीवनात असत्य असते म्हणून या नायकांचे ऑडिट केले पाहिजे. धर्मग्रंथाच्या पानात लपलेल्या मूलनिवासीचा इतिहास जगाच्या भूपृष्ठावर आला पाहिजे. “मूलनिवासी “या कवितेत त्यांच्या अंतरंगाचे भावबंध जीवनचरित्र रेखाटले आहे.”तिसरे महायुद्ध” ही कविता उत्कट भावनेतून निर्माण झाली असून जगण्याच्या संघर्षातील महायुद्ध लढताना स्वतःच्या फॅक्टरीत अणूबाँम्ब तयार करून जटाधारी अधर्मला जाळत जावून नवीन पँलेशची उभारणी करून भुकेलेल्या माय इंडिया करुणेचा सागर देणार आहे .ते या कवितेत म्हणतात,

  तिसरे महायुद्ध केव्हा होऊ शकते फक्त जटाधारी धर्माला जाळत राहू
  आपणच उभारू आता आपले पँलेस
  भुकेच्या मैत्रीला करूणेचा विसावा देऊ….
  पृ क्र ५२

  वरील कवितेचा पोत उच्च आहे. त्यामुळे या कवितासंग्रहाची उंची मोठी वाटते. या कवीची कविता कलावादी नसून जडतत्त्वज्ञानाशी नाते सांगणारी आहे .”बुद्ध-मार्क्स- आंबेडकर “या कवितेत रेखांकित झालेले दिसते .ते म्हणतात,

  हे भाकरीच्या स्वातंत्र्याचे सर्वात मोठे विश्वयुद्ध
  हे कलेच्या मनगटावर बसलेले पर्वत
  आणि फडतुस सौंदर्याला लाथ मारून
  बुद्धाच्या ओठावर उगवलेले हे प्रज्ञायुद्ध
  ………….
  मी होईन एक सैनिक
  आणि विश्वाला घेऊन कडेवर जोराने म्हणीन जयभीम….
  पृ क्र ५४

  जगाच्या इतिहासात बुद्ध -मार्क्स- आंबेडकर हे मानवतेचे खरे पाईक आहेत .बुद्ध हा मानवी विज्ञान शास्त्राचा जनक आहे. कार्यकारणभाव सिद्धांताच्या माध्यमातून घटनेचे वास्तविक स्वरूप पाहतो .प्रतित्यसमुत्पाद या सिद्धांतातुनच जगाचे कल्याण होईल. असा वैज्ञानिक दृष्टीकोण जगाला सर्वप्रथम दिला आहे. अणू-रेणूची संकल्पना मांडून दुःखी जगाला सुखाची संजीवनी दिली आहे .मार्क्स हा भांडवलदारी व्यवस्थेला सुरुंग लावून कामगाराची सत्ता प्रस्थापित करणारा पण तो भारतीय परिप्रेक्षात पूर्णपणे फसला आहे. तरी त्यांचे तत्त्वज्ञान मूलगामी जगासाठी आजही प्रेरक आहेत. क्रांती फक्त युद्धाने होत नाही तर तिला प्रज्ञा ची जोड असावी लागते .तिला धम्माचे आयुध असावे लागते. तेव्हा सम्यक क्रांतीला धुमारे फुटू शकतात .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षातूनच समतेच्या लोकशाहीची बाग फुलू शकते माय इंडियातील भुकेकंगाल यांचे महायुद्ध लढण्यासाठी सौंदर्याची गरज नसून बुद्धाच्या ओठावरील प्रज्ञायुद्धाची गरज आहे.तसेच भिमाच्या लोकशाहीनेच उद्याची क्रांती लढावी लागेल.तेव्हाच माय इंडियाचे स्वप्न पूर्ण होईल. या कवितेचा भावार्थ ,लक्षार्थ या पातळीवर ही कविता उत्तम बसते. यातील अभिधा शक्ती वाचकाला नवऊर्जा प्रदान करण्याचे काम करते.हे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. या कवितासंग्रहातील “बराक ओबामा” आणि “डोनाल्ड ट्रम्प” या कविता आंतरराष्ट्रीय पातळीवरील मर्मभेदाची विश्लेषण करते. बराक ओबामा या कवितेत कवी म्हणतो,

  बराक ओबामा तू फक्त
  आता आठवणीचा पक्षी राहशील
  आणि या क्षितीजावरच्या लढाईत आमचीच माणसे युद्ध पुकारतील.
  पृ क्र ६८

  निग्रो समाजातील एक अश्वेत व्यक्ती अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाल्यावर परिवर्तनाचे नवे विचार पोहोचू शकले नाही. श्वेताच्या मनाने राज्यकारभार करणारा ओबामा आता आमची लढाई आम्हाला चढावी लागेल. हा संदेश ही कविता देते.तर डोनाल्ड ड्रम हा रंगेल चरित्राचा माणूस साम्राज्यवादाच्या भुलभुलैया प्रचाराने अमेरिकेने जनतेला स्वदेशाची अफू पाजून निवडणूक जिंकली.भांडवलदारी रंगदार मोहजालात अमेरिका फसली आणि आपल्या पायावर धोंडा मारून घेतला.स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक लहान देशांना गिळंकृत करणारा हा चंगळवादी स्वैराचारी निसर्गाला ओरबाडून टाकत आहे. रोमॅन्टिकपणाच्या कामविश्वात मश्गुल असल्याने अब्राहम लिंकनच्या समतेचा संदेश वाईट हाऊस मध्ये बंद करून ठेवला आहे. ते या कवितेत म्हणतात,

  तू तुझ्या मायभूमीला तुझ्या विचाराने जिंकले
  दुनिया काहीही म्हणो,
  तू या देशाचा सुपरस्टार झालास तुझ्या साम्राज्यवादाचे मी कधी समर्थन करणार नाही
  …………
  पहिले युद्ध धर्माचे
  आणि दुसरे युद्ध भाकरीच्या स्वातंत्र्याचे
  पहिले युद्ध अणवस्त्राने लढले जाईल
  आणि दुसरे युद्ध आमच्या विचारांचे
  त्यात डोनाल्ड ट्रम्प तू राहणार नाहीस …..
  पृ क्र ७०
  व्हँटिकन सिटी हीएक कसदार कवीता असून कवी या कवितेत म्हणतो,
  आमच्याकडे या जातीय अर्थव्यवस्थेच्या भटारखान्यात माणूस यूसलेस होत आहे आणि पुंजीपतीचा व्यवहाराच कँशलेस होत आहे
  माझ्या गावात कुठे डेबिट-क्रेडिट कार्ड आहे
  तुमचा खंड केव्हाचा सूर्यावर गेला आहे ……
  पृ क्र ७३

  जगाच्या पाठीवर इसिस नावाच्या धर्मवादळाने मोठे थैमान घातले असून व्हॅटिकन सिटीच्या जवळच असलेल्या खंडात हिटलरने रक्तरंजित क्रांती केली होती. पण स्वतः या क्रांतीतून वाचू शकला नाही. सायनाइट नावाचं रसायन घेऊन हा पळकुटा निघाला. मार्क्सला त्याच्याच देशातून पलायन करावे लागले.रशियाला जावून उपासमारीची राज्यशास्त्र म्हणून समाजवादी क्रांतीची मशाल प्रज्वलित केली .त्यांचे तेज आजही अनेक देशाला प्रकाश देत आहेत .धर्माच्या नावाने होणारे अन्याय-अत्याचार समाप्त होण्यासाठी बुद्ध आज जागोजागी उभा आहे .जातीच्या अर्थव्यवस्थेच्या भटारखान्यात माणूस युजलेस झाला असून पुंजीपतीच्या व्यवहार कँशलेस झाला आहे. हा धोका माय इंडिया ला नक्कीच सतावत आहे .कारण आमची लढाई समाजपरिवर्तना सोबत आर्थिक परिवर्तनासाठी आहे.

  जगामध्ये आज आर्थिक असमानता निर्माण झाली आहे. जगाचे दोन भागात विभाजन झाले असून विकसित आणि विकसनशील असे भेद निर्माण झाले आहेत .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लुटालुटीच्या वसाहतवादाला समाप्त करण्यासाठी “प्रॉब्लेम ऑफ रुपी” नावाचा ग्रंथ ग्रंथ लिहिला. त्यात सामान्य नागरिकांच्या जीवनाचे अर्थ चिंतन मांडले आहे .औपनिवेश वसाहातवादाने आर्थिकतेच्या नावाखाली माणसाचे माणूसपण नाकारले आहे. अमानवतेची नवी जमात निर्माण करुन सिमेंट काँक्रिटच्या जंगलात झगमगणार्‍या रोषणाईने सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा आघात केला आहे .हा लुटालुटीच्या वसाहतवाद एक दिवस साऱ्या पृथ्वीलाच गिळंकृत करतो काय हा प्रश्न कविला पडला आहे.”आता वाजवू डंका” या कवितेत वास्तविक अर्थकारणाचे प्रतिबिंब पाहायला मिळते ते म्हणतात,

  बँका इथल्या मल्यांच्या
  माफीचे कर्ज कुठे रे
  अरे करता पुढे पुढे
  आता वाजूवू डंका…
  पृ क्र १०१

  अर्थचक्राच्या चिखलात माय इंडिया फसला असून सरकारीनौकरशाहीमुळे धर्मलंपट राजकारणामुळे दिवसाढवळ्या बँकांवर दरोडे पडत आहेत. आमचे नेते अभावग्रस्त जीवनाचा चित्रपट पाहात आहेत .त्यासाठी आपला डंका वाजवून अशी वल्गना कवी करतो .
  लढाई ही छोटेखानी कविता असली तरी कवितेची गहनता मोठी आहे.आशयाच्या अंगाने फुलून आलेल्या कवितेचे कंगोरे वाचकाला अंतर्मुख करते. ते या कवितेत म्हणतात,

  लढाई लढता लढता
  रात्र प्रकाशन झाली
  माझ्या दारावर आता
  उजेडाची पहाट झाली.
  ……………
  आता भेटला मला
  विश्वाचा बादशहा
  शब्दांच्या जगात
  कविता सूर्य झाली ..
  पृ क्र १०४

  आपली लढाई लढण्यासाठी माणसांची गर्दी नको तर दर्दी माणसेच हवी. माणसे मिळाले नाहीतरी माझ्या शब्दच कविता सूर्य होऊन जगात नवा प्रकाशपुंज प्रत जाईल. हा आशावाद या कवितेत व्यक्त केलेला आहे माय इंडिया या कवितासंग्रहातील “दहशतवादाचा सांड घुसलाला जागतिकीकरणात “आणि मा”य इंडिया “या दोन्ही कवितेची उंची मोठी आहे .आंतरराष्ट्रीय पातळीवर बदलत जाणारा राजकारणाचा,धर्मकारणाचा, अर्थकारणाचा व समाजकारणाचा वेध या कवितेत व्यक्त झाला आहे. कवी “दहशतवादाचा सांड घुसला जागतिकीकरणात” या कवितेत म्हणतो,

  आता तिसरे वर्ल्ड वार सुरू झाले आहे
  विचारांचे बाँम्बचे खुणांचे धमकीचे
  हे ग्लोबल युग अप डाऊन होत आहे
  आणि सनराईज लोकशाहीत दहशतवादास सांड घुसला आहे आरपार ……
  पृ क्र १०७

  ही कविता नामदेव ढसाळ कविच्या काव्यात्मकतेच्या आविष्कारातून निर्माण झालेली वाटते .कवितांचा साज /बंध हा एका विद्रोहाची परिणामकारकता किती ताकतवर असते याची ओळख करून देते .कारण जागतिकीकरणाचे माणसाचे माणूसपण हिरावून घेतले आहे. चक्षूसमोर विचाराचं उन्मत्त भरघोस पीक आले असून, लोकशाहीच्या सुर्योदयात दहशतवादाचा सांड उन्नतपणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर नंगानाच घालतो आहे .अँटम बॉम्ब सारखा भयावह खेळ माणसासोबत खेळला जात आहे .फॅसिस्ट वादाचे नवे रसायन माणसाच्या मेंदूतील नुरान्सला खतपाणी देत असून फँसिस्टनिर्मितीचे नवे कारखाने वेगाने वाढत आहेत. समाज सुधारकांचे विचारवंतांचे मुडदे पडत असताना माय इंडिया इतका सन्नाटा क्यू है। लगाम की दोरी खीचो यारो। अपनी जंजीरो को तोडो यारो ।अशा प्रकारची क्रांतीप्रज्वलता तयार होत नाही. प्रेमाचा व शांतीचा जगात मत्सर आणि बदला अशी प्राचीन धुर्त ॲम्बेसिडर तयार झाले असून ई विचारांच्या क्रांतीतून नव्या समाजाचे उत्थान न होता तो वर्तुळाबाहेर फेकला जात आहे. अनेक विकृतीने समाज ग्रासला असून माणसाचा सेल्समॅन करून टाकला आहे.

● हे वाचा – दीक्षाभूमी गौरव ग्रंथ : क्रांतिकारी सृजनत्वाची ग्लोबल निर्मिती

  भांडवली, सनातनी गढीने स्वतःच्या मोहजालात माय इंडिया बंदिस्त केला आहे. भाकरीच्या स्वातंत्र्यासाठी गरिबांची लढाई पेटत असताना अगणित स्वापदे लढाई हरवण्यासाठी टपून बसले आहेत .इंटरनॅशनल बदलत्या ऋतुचक्राचा भेद या कवितेत घेतला असून माझ्या देशात माझीच माणसे गुलाम होत आहेत. जगाची दोन महायुद्धे झाली त्यात माणसाची मोठी हानी झाली आहे. युद्धाला करूणेशिवाय पर्याय नाही. म्हणून जगात बुद्धा शिवाय तरणोपाय नाही. दारिद्र्याच्या समाप्तीच्या सिद्धांत मांडणारा अमर्त सेन याचे विचार न एेकता कमी शिकलेल्या अर्थमंत्र्यांच्या सल्ल्याने देशाचे अर्थचक्र चालले आहे .येथेच माय इंडिया पराभूत होत आहे. देशात घडणार्‍या वाईट घटनाने देश पोखरत चालला आहे.आतंकवाद, भ्रष्टाचारी वृत्तीने पृथ्वीला धोका निर्माण केला आहे.त्यासाठी जगाने आता तरी तृष्णा सोडून सम्यक संबुध्द बनावे. असा भावस्पर्श विचार या कवितेतून व्यक्त केला आहे. माय इंडिया ही कविता बदलत्या जगाचा नवे सौंदर्य विशद करते.माय इंडिया आय लव यू अशी गर्जना करते विज्ञानाच्या क्रांतीने झपाटलेले जग कधी ग्लोबल झाले ते कवीला समजलेच नाही.कारण त्याचे महायुद्ध भाकरीच्या स्वातंत्र्यासाठी आहे.आज मानवी संबंध विस्कटून गेले असून पॉझेटिव्हिटी सोडून निगेटिव्हिटी तयार झाली आहे .आपला फक्त स्वार्थ बाकीचा अनर्थ याप्रकारे माय इंडिया ची दशा झाली आहे. इंडियाचे पुअर इंडिया व रिच इंडिया असे दोन डिव्हायडेशन झाले आहे.

  राजकारणाचा घरात भांडवलदारीचा सांड पाणी भरत आहे.अनैतिक व्यवहाराचा पूर वाढला असून चंगळवादी संस्कृतीचा काळाबाजार राजरोसपणे सुरु आहे. इंडिया शायनिंग न होता रायझिंग होत आहे.माणसाच्या जिवंतपणी कबरी बांधल्या जात आहेत. धर्माच्या नावाने भगवा व हिरवा दहशतवादाची सत्यरचना माय इंडियाला नेस्तनाबूत करीत आहे. भ्रष्टाचाराचा राक्षस भारतीय समाजावर बलात्कार करतो आहे. अशा भयावह परिस्थितीत भारतीय संविधानात्मक नैतिकता माय इंडियाला वाचू शकते. ही रास्त भूमिका कवीचे आहे. आंबेडकरांच्या भावविश्वावर दीर्घ कविता करणारा आहे. माय इंडिया हा कवितासंग्रह आशयाच्या समृद्धीने परिपक्व असून प्रतिमा व प्रतीकांचा योग्य वापर केला आहे.या कवितेला आंबेडकरी जाणिवांची अनेक कंगोरे असून आंतरराष्ट्रीय शब्द रचनेचा मोठ्या प्रमाणात वापर करून नव्या बदलाचा मार्ग स्वीकारला आहे. नव्या सामाजिक अभिसरणाची ही कविता अपकेंद्री बळाचा वापर करून सत्व चिंतन करीत आहे.

  आईन्स्टाईनचा सापेक्षवाद सिद्धांत जगाला उपयोग असला तरी आईन्स्टाईनचा गुरु तथागत गौतम बुद्ध आहे .तोच विज्ञानाचा जनक आहे.या कवितेने निर्विवाद स्वीकारले आहे.आशयाच्या अंगाने ही कविता उत्कट भावार्थ प्रकट करताना माय इंडियाच्या स्वातंत्र्यासाठी भाकरीचे महायुद्ध लढत आहे. या महायुद्धात कविच्या जीवनाचे चलचित्रण प्रतिबिंबित होत आहे. ते “माय इंडिया” या कवितेत म्हणतात,

  माय इंडिया भन्नाट दारिद्र्य लिंगाची विषमता
  इथे धर्म हायब्रीड होत आहे
  …………..
  आता मानवी स्वातंत्र्याचा रणांगणावर
  भाकरीच्या युद्धासाठी लढत राहीन
  हेच माझ्या कवितेचे उघडे-नागडे लाईफ
  जसा जगलो तसे लाईफ
  माझ्या संघर्षाची लाईफ …..
  पृ क्र ११८

  माय इंडिया कवितासंग्रह अग्निज्वालाने पोळलेल्या माणसाला नवी ऊर्जा देण्याचे काम करत आहे. यामधील अनेक कविता नवे तत्वमुलक जीवनदायी रसायन देत आहे. त्यामध्ये माझे स्विझर्लंड, जाहिरात ,राळेगण-सिद्धी कुठे आहे ,दाऊद इब्राहिम, अजमल कसाब, डिस्कवरी ऑफ इंडिया, लोकपाल की जोकपाल, नागपूर शहर अंधाराचा पिंजरा या कविताची उंची वाचण्याजोगी आहे.या कविता आशयसंपन्न असून वाचकाच्या मनाला भावस्पर्श करतात. जागतिकीकरणाच्या या आधुनिक दुनियेत कवितेतील प्रतीकांचा वापराने कवितेतील सौंदर्याविष्कार मोठा झाला आहे. कवी दीपककुमार खोब्रागडे यांची कविता सशक्त क्रांतीची कविता आहे .उद्याच्या जगाला नवे मुल्यमंथन प्र दान करणारी आहे .भीमसैनिकांना नवे विचारगर्भ देणारी आहे .वाटेला आलेल्या हालअपेष्टांना सोबत घेऊन जगण्याची इच्छा क्रांतीप्रवण आहे. आयुष्याच्या अनुभवनिष्ठेतून स्फुरलेले ही कविता नव्या जगाची गीत आहे. ज्या समाजव्यवस्थेने माय इंडिया बरबाद केले आहे त्या समाजव्यस्थेविरुध्द मानवी स्वातंत्र्यासाठी भाकरीचे महायुद्ध लढणारी ही कविता असून माय इंडियाला नवी उंच भरारी नक्की देईल यात शंका नाही. त्यासाठी काव्यकार दीपककुमार खोब्रागडे यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो पुढील काव्यप्रवास मंगलमय होवो हीच मंगलकामना…!

  -संदीप गायकवाड
  ९६३७३५७४००

● हे वाचा – दीक्षाभूमी गौरव ग्रंथ : क्रांतिकारी सृजनत्वाची ग्लोबल निर्मिती

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *