- * आरोग्यासाठी स्वच्छताही खूप महत्त्वाची : डॉ कैलास घोडके
- * खाण्यापिण्याचा चुकीच्या सवयीनेही कुपोषण वाढते : डॉ प्रणिता कडू
- * केंद्रीय संचार ब्युरो, अमरावती तर्फे मेळघाटातील कारा गावात “राष्ट्रीय पोषण महिना” कार्यक्रमाचे आयोजन
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : कुटुंबातील एक स्त्री आजारी पडली की संपूर्ण कुटुंब आजारी होते. त्यामुळे सर्व प्रथम महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी समतोल आहार अत्यंत आवश्यक आहे, असे मत धारणीचे आमदार राजकुमार पटेल यांनी व्यक्त केले.
केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय,अमरावती यांच्यावतीने आयोजित “पोषण महिना – 2022” अंतर्गत “महिलांसाठी अन्न” या विषयावर ग्रामपंचायत कारा तालुका धारणी येथे काल विशेष जनसंवाद कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले. केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या या जनजागृती कार्यक्रमातून जी माहिती मिळत आहे ती प्रत्यक्षात कृती मध्ये आणली पाहिजे.गरोदर महिलांसाठी योग्य आहाराचे महत्त्वही त्यांनी सांगितले.
अमरावती जिल्हा परिषदचे महिला व बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कैलास घोडके यांनी महिलांना जेवणासोबत स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. घरांमध्ये आजी-आजोबा किंवा आई आपल्या मुलांना हात न साफ करता किंवा घाणेरड्या हाताने अन्न खायला घालतात. यामुळेही अनेक आजार पसरतात. प्रसन्न मनाने स्वयंपाक करून खा, असा सल्लाही त्यांनी दिला.
घातखेड कृषी विज्ञान केंद्राच्या गृह विज्ञान विभाग प्रमुख डॉ प्रणिता कडू यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की महिलांना त्यांच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले भरड व तृणधान्ये, मेथी व गूळ इत्यादी घटकांपासून होणारे फायदे व पौष्टिक घटकांची सविस्तर माहिती दिली. घरातील खाण्यापिण्यातील चुकीच्या सवयीमुळे जसे पोहे व मसालेदार अन्न खाल्यानंतर लगेच चहा पिणे, तंबाखू सारख्या घातक पदार्थांचे सेवन केल्याने देखील कुपोषण वाढण्यास मदत होते.
स्तनपान देणाऱ्या मातांसाठी योग्य आहार असलेल्या परसबागचे महत्त्वही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक नृत्य व पोषण रॅलीने झाली. कार्यक्रमात सुदृढ बालक, रांगोळी, पाककला व प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या व विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आली.कारचे सरपंच श्री.श्यामलाल, जंबूच्या सरपंच सौ.रुम्का ताई, श्री.महेश पाटील, गटविकास अधिकारी, नांदुरी, जांबू, कोट, मालूर व सोसोखेडा येथील 350 हून अधिक महिला, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व मुली कार्यक्रमास उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला व आभार एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल चव्हाण यांनी तर सूत्र संचालन योगेश मालवीय यांनी केले.