- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या अद्ययावत होण्यासाठी जनजागृती करावी व विविध आस्थापनांनी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंदणी करुन मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाला गती द्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले आहेत.
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाचा मतदार नोंदणी कार्यक्रम दि. 1 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. त्यांची पूर्वतयारी म्हणून विभागातील विविध शासकीय तसेच निमशासकीय आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदवीधर कार्यरत असून सर्व पदवीधरांची मतदार नोंदणी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सर्व कार्यालयांनी कार्यालयातील पदवीधर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंदणी करुन घ्यावी जेणेकरुन कार्यालयात पदवीधर मतदार संघासाठी पात्र असणारे मतदार मोठ्या संख्येने मतदान नोंदणी करतील व नोंदणीची प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होईल, असे निर्देश डॉ. पांढरपट्टे यांनी दिले आहेत.