नवनीत राणांचा लव्ह जिहादचा दावा खोटा?, मुलीचा पोलिसांना जबाब

    अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी एका मुलीच्या संदर्भाने लव्ह जिहादचा आरोप करत अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये काल राडा घातला. मुलीला आत्ताच्या आता आमच्यासमोर हजर करा, म्हणत त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच पोलिसांनी कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप करत जवळपास २० मिनिटे पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला. या साऱ्या कालच्या प्रकरणानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे फिरवत तरुणीचा शोध घेतला. मात्र संबंधित तरुणीने काही कारणांना कंटाळून रागाच्या भरात घर सोडून गेले असल्याचं पोलिसांना सांगत नवनीत राणांना तोंडावर पाडलं. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुलीचा जबाब वाचून दाखवला.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १९ वर्षीय वयाची युवती मंगळवारी रात्री बेपत्ता झाली. त्यासंदर्भात तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनीही तरुणीचा शोध घेण्यासाठी तातडीने सूत्रे फिरवली. पण त्याचदरम्यान खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणावरुन राडा घातला. शहरातील आंतरधर्मीय विवाह व लव्ह जिहाद प्रकरणातील मुलाशी थोडा कठोर व्यवहार करा, असे सांगण्यासाठी फोन केल्यानंतर मनीष ठाकरे यांनी आपला कॉल रेकॉर्ड केला. त्याबाबत जाब विचारण्यासाठी आपण पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे राणा म्हणाल्या. यादरम्यान पोलीस आणि खासदार राणा यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली. काल या संपूर्ण प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा झाली.

    दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बँकेत जात असल्‍याचे सांगून घरातून बेपत्‍ता झालेली तरुणी बुधवारी रात्री साताऱ्यात सापडली. पुणे जीआरपी आणि सातारा पोलिसांनी मुलीला गोवा एक्‍स्‍प्रेसमधून ताब्‍यात घेतले. ‘लव्‍ह जिहाद’साठी या तरुणीचे अपहरण करण्‍यात आलं होतं, असा सनसनाटी आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. मुलीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. यावेळी काही कारणांनी रागाच्या भरात मी घर सोडलं, असं तरुणीने पोलिसांनी सांगितलं. तशी माहिती अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी माध्यमांना दिली.

हे वाचा – महिला आजारी असेल तर संपूर्ण कुटुंब आजारी : आमदार राजकुमार पटेल