जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगेच्या घटनेबाबत चौकशी समिती चोवीस तासांत अहवाल सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : जिल्हा स्त्री रूग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता केंद्रातील आगेच्या घटनेबाबत २४ तासांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून समिती गठित करण्यात आली आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    जिल्हा स्त्री रूग्णालयातील शिशु दक्षता केंद्रात व्हेंटिलेटर मशिनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. व्यवस्थापनाने अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. केंद्रातील १२ नवजात बालकांना तातडीने विशेष संदर्भ रूग्णालय व इतर रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेत कोणीही जखमी नाही किंवा कोणतीही जिवीतहानी नाही.

    घटनेबाबत माहिती मिळताच उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तत्काळ जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. याप्रकरणी समिती गठित करून चौकशी करण्याचे व तसा अहवाल २४ तासांत सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी स्वतंत्र आदेश निर्मगित करून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. अमरावतीचे तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, महापालिकेचे अग्निशमन अधिकारी, स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक आदी समितीचे सदस्य आहेत. समितीने चोवीस तासांत आदेश अहवाल सादर करण्याचे आदेश आहेत.