आणीबाणीच्या कालावधीत तुरुंगवास भोगलेल्यांनी मानधनासाठी अर्ज करावा – आरडीसी विवेक घोडके

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : आणीबाणीच्या कालावधीत तुरुंगावास भोगलेल्यांनी मानधनासाठी अर्ज करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी केले आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    आणीबाणी कालावधीत दि. 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 मध्ये लढा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी ज्या व्यक्तींना 1 महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगावा लागला अशा व्यक्तींना 10 हजार रूपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या विधवा पत्नी यांना 5 हजार रूपये तसेच ज्या व्यक्तींना 1 महिन्यापेक्षा कमी कारावास भोगावा लागला अशा व्यक्तींना मानधन 5 हजार रूपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या विधवा पत्नी यांना 2 हजार 500 रूपये मानधन लागू करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.

    तथापि, सन 2020 साली कोविड-19 साथीमुळे योजना तत्कालीन सरकारमार्फत बंद करण्याचा निर्णय झाला. विद्यमान शासनामार्फत शासन निर्णय दि.28 जुलै 2022 च्या शासन निर्णयान्वये आणीबाणीत बंदिवास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्याची योजना नव्याने सुरू करण्यात आली. त्याची अंमलबजावणी ही दि. 1 ऑगस्ट 2022 पासून करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने आणीबाणीच्या लढ्यात सहभागी व्यक्तींनी यापूर्वी अर्ज केला नसेल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात परिपूर्ण कागदपत्रांसह नव्याने अर्ज दि.31 ऑक्टोबर पर्यंत सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी केले आहे.