Header Ads Widget

तिरंगा

  ह्या झोपडीवर माह्या
  डोले तिरंगा डौलात
  दुःख झेलते रे माय
  फाटक्याच पदरात !!
  झेंडा पाह्ये माय कडे
  माय पाह्ये झेंडयाकडे
  तिरंगी मायेची रे छाया
  तिच्या पदरात पडे !!
  सुख स्वातंत्र्याचं भोगे
  माय उपाशी पोटान
  केली आयुष्याची माती
  शाई लावल्या बोटान !!
  पोटासाठी पायपीट
  नाही आजून थांबली
  खऱ्या शिक्षणाची गंगा
  नाही गावात वाह्यली !!
  लय झालेत धनिक
  लांडया,लबाड्या करून
  मोठे महाल बांधले
  छोट्या झोपड्या तोडून !!
  महाली भगवा, हिरवा
  निळा,ओशाळे मनात
  ह्या झोपडीवर माह्या
  डोले तिरंगा डौलात !!
  डोले तिरंगा डौलात !!
  -वासुदेव महादेवराव खोपडे
  सहा पोलीस उपनिरीक्षक(सेवानिवृत्त)
  अकोला 9923488556

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या