Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत बैठक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे ठेवा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

  * विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश
  * पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : गणेशोत्सव दि. 31 ऑगस्ट ते दि. 9 सप्टेंबर दरम्यान साजरा होणार असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे ठेवा. संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात पुरेसा बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

  सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की, संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात काटेकोर बंदोबस्त ठेवावा. संवेदनशील ठिकाणी जास्त प्रमाणात गुलाल उधळल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा ठिकाणी पोलीस पथक तैनात ठेवावे. रसायनयुक्त गुलाल असल्यास आरोग्याला बाधा पोहोचते. त्याचा प्रतिबंध करावा. मद्यप्राशन करुन गाड्या चालविणाऱ्यांवर वेळीच कारवाया कराव्यात. संवेदनशील परिसरात मिरवणूकीत अतिरीक्त गर्दी होऊन प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायती यांनी विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

  त्या पुढे म्हणाल्या की, उत्सव व विसर्जनाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. महापालिकेने गणपती विसर्जनासाठी 50 कृत्रिम तलाव तयार करुन विसर्जनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी व छत्री व वडाळी तलावावरील गर्दी टाळावी. विसर्जन स्थळी आरोग्य पथकही तैनात ठेवावे. मिरवणूकीच्या मार्गातील हातगाड्या तसेच रहदारीतील अडथळे दूर करावेत. खडड्यांची दुरुस्ती करावी. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. रस्त्यावर लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा ओढण्यात याव्यात. रस्त्यावरील सर्व पथदिवे सुरु असावेत. वीज पुरवठा नियमित ठेवावा. विसर्जनाच्या दिवशी पाऊस असल्यास वाहन चिखलात रुतणे किंवा अन्य अडथळे उद्भवू शकतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन क्रेन पोलीसांना उपलब्ध करुन द्याव्यात. जिल्हा शल्य चिकित्सकांनी वैद्यकीय युनिट रुग्णवाहिकेसह तैनात ठेवावे.

तलावांवर बचाव पथके ठेवा

  बडनेरा व अमरावती शहरातील छत्री तलाव, वडाळी तलाव, कोंडेश्वर तलाव या ठिकाणी सार्वजनिक व घरगुती गणपतीचे विसर्जन होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शोध व बचाव पथकाचे कर्मचारी बोट व बलून लाईनसह उपस्थित ठेवावेत.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा

  प्लाटर ऑफ पॅरीसच्या मूर्त्यांऐवजी शाडू मातीच्या मूर्त्या वापरण्याबाबत जनजागृती करावी. रसायन मिश्रीत गुलालाचा प्रतिबंध व्हावा. प्रदुषण नियंत्रण मंडळाने जनजागृतीपर उपक्रम राबवावे. त्याचप्रमाणे महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी घंटागाडीवरील ध्वनीक्षेपकाव्दारे मातीचे, शाडुचे गणपती विकत घेण्याबाबत व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आवाहन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. माझा गणेशोत्सव माझा मताधिकार हा उपक्रम निवडणूक कार्यालयातर्फे हाती घेण्यात आला. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

  जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदाळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. थोटांगे, महापालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, इ.आर. कुळकर्णी, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त शरद कोलते, पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव, हेमंत ठाकरे, परिवहन अधिकारी नितीन घोडके, ऋषिकेश गावंडे, महावितरणचे अभियंता विकास शहाडे, अग्निशमन अधिकारी सैय्यद अनवर, बी.के. तिरपुडे, एन.एम. बोबडे, नायब तहसिलदार श्याम देशमुख आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code