१५ ऑगष्ट स्वातंत्र्याचा पच्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन. हा पच्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन असल्यानं मोदी सरकारनं हर घर घर तिरंगा म्हणत दि. तेरा ऑगष्टपासून शाळेच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा पाठवला. याचा उद्देश असा की या स्वातंत्र्याचे महत्व घरोघरी पोहोचणार. हे मोदी सरकारचं ब्रीद. तसं त्यांचं बरोबर आहे. त्यांच्या दृष्टीनंही बरोबर आहे. परंतू ते जरी त्यांच्यादृष्टीनं बरोबर असलं तरी जनसामान्य लोकांच्या दृष्टीनं बरोबर असल्यासारखं वाटत नाही. कारण हा उद्देश केवळ पैसा जमविणारा उद्देश वाटतो.
पैसा......कसा जमविणार सरकार? असा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. नाही का? हो तेही बरोबरच. परंतू विचार करा की स्वातंत्र्याची रम्य पहाट साजरी करतांना सरकारनं पंधरा रुपयाची कात्री प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला लावली आहे. तसेच एक प्रकारचा विद्यार्थी मनात न्युनगंडही तयार केला आहे.
न्युनगंड असा की तो विद्यार्थी.......त्याचा बाप श्रीमंत आहे. तो देवू शकतो पंधरा रुपये. माझा बाप गरीब. माझा बाप पंधरा रुपये देवू शकत नाही. मुळात ते निरागस वय. अगदी लहान लहान मुलं शाळेत जातात. त्यांना एखादी वस्तू मिळाली की आनंद होतो. त्याला पंच्याहत्तरावं स्वातंत्र्य माहित नसतं. फक्त त्याला एवढंच कळतं की झेंडा त्या मुलांच्या हातात आहे ना. मग माझ्याही हातात असावा. बस, हेच मागणं असतं त्याचं आपल्या आई वडीलांना. अन् त्याचे आई वडील महागाईच्या काळात राब राब राबून आपल्या पिल्लाच्या व आपल्या अन्नपाण्याची सोय करण्यात व्यस्त असतात. कारण त्यांना मुलांसाठी अन्नपाण्याचीच नाही तर कपड्यालत्याचीही सोय करावी लागते.
महत्वाचं म्हणजे कोणाला हवं स्वातंत्र्य. नेत्याला की या सर्वसामान्य जनतेला? कोणासाठी मिळवलं स्वातंत्र्य? नेत्यांसाठी की सामान्य जनतेसाठी. आज आम्ही स्वातंत्र्याची रम्य पहाट साजरी करीत आहोत. काही ठिकाणी सरकारी कार्यालयेही सजलेली आहेत. त्यातच दि. १३ पासून तीन दिवस ध्वज फडकविणे आणि सायंकाळी उतरवणे. घरी विद्यार्थ्यांना तीन दिवसासाठी झेंडा लावून ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. तो उतरविण्याची गरज नाही. तसं पाहिल्यास हा तिरंग्याचा अपमान आहे. परंतू तो सरकारच्या पुढं अपमान नाही. कारण यातून सरकारी तिजोरी भरेल आणि स्वातंत्र्याचं महत्वही कळेल हा दुहेरी उद्देश सरकारचा असून स्वातंत्र्याची रम्य पहाट सरकार साकार करीत असल्याचे दिसते. तसेच यातून भुखमरी, महिलांवर होणारे अत्याचार, महागाई, वाढती महागाई, शेतकरी आत्महत्या, अस्पृश्यांवर अत्याचार, सुशिक्षीत बेकारी या सर्व गोष्टींना तिलांजली दिल्याचं जाणवते.
विशेष म्हणजे सरकारनं स्वातंत्र्याची रम्य पहाट अवश्य साजरी करावी. ती साजरी करणं काळाची गरजच आहे. परंतू त्याचबरोबर ज्या स्वातंत्र्याला मिळवायला एवढे दिवस लागले. एवढे लोकं हुतात्मे झाले. त्या स्वातंत्र्याची रम्य पहाट साजरी करतांना सरकारनं बेरोजगारी, वाढती महागाई, शेतकरी आत्महत्या, महिलांवर तसेच अस्पृश्यांवर अत्याचार, भुखमरी याही गोष्टीकडं लक्ष द्यावं. तसेच प्रत्येकाला दोन वेळचं चांगलं जेवन, राहायला छोटसं पण हक्काचं लहानसं घर तसेच एक जोडी कपडा कसा मिळेल याचाही विचार करावा. ह्या गोष्टी जेव्हा प्रत्यक्षात साकार होतील आणि जेव्हा त्या सर्वांना मिळतील, तेव्हाच ख-या अर्थानं देश स्वातंत्र्य झाल्यासारखा वाटेल व स्वातंत्र्याची रम्य पहाट साजरी केल्यासारखे होईल. घरोघरी पंधरा रुपयाचे तिरंगे लावून व विचाररिठावर मोठमोठी भाषणे ठोकून नाही. त्यानं सरकारी तिजोरी भरेल. तिरंगा आणि स्वातंत्र्याचे महत्व कळणार नाही.
- -अंकुश शिंगाडे
- नागपूर
- ९३७३३५९४५०
- (Images Credit : Loksatta)
0 टिप्पण्या