- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रादेशिक कार्यालयामार्फत विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय नमुना पाहणी 79 व्या फेरीच्या सर्वेक्षणाला सुरवात झाली आहे. हे सर्वेक्षण जुलै 2023 पर्यंत करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय नमुना पाहणी फेरीमध्ये व्यापक वार्षिक मॉडयुलर सर्वेक्षण व आयुष या दोन विषयावर माहिती संकलित करण्यात येत आहे. या पाहणीमध्ये शाश्वत विकास ध्येय, निर्देशांक तयार करण्याच्या उद्देशाने प्राथमिक माहिती गोळा केली जात आहे. तसेच विविध सामाजिक, आर्थिक परिणामांमध्ये देशाच्या कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी व जागतिक स्तरावर तुलना करण्यासाठी या निर्देशांकांची माहिती संकलित केली जात आहे.
सर्वेक्षणादरम्यान औपचारिक व अनौपचारिक शिक्षण, प्रशिक्षणामध्ये तरूणांचा सहभागाचा दर, इंटरनेटचा वापर, वय वर्षे तीन किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्यांची मोबाईल व संगणक वापराबाबतची माहिती, सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, बारमाही रस्त्यालगतच्या दोन किमी परिसराच्या आत राहणाऱ्या ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण, वित्तीय संस्थेत खाते असलेल्या प्रौढांची टक्केवारी, वैयक्तिक भ्रमणध्वनीधारक स्त्री-पुरूषांचे प्रमाण, लोकसंख्येचे प्रमाण, स्वच्छता सेवा, साबण आणि पाण्याने हात धुण्याची सुविधा, वीज वापराबाबतचे प्रमाण इत्यादी अनेक बाबींवर माहिती गोळा करण्यात येत आहे.
आयुषअंतर्गत आयुष-आयुर्वेद, योगा व नॅचरोपॅथी, युनानी, होमिओपॅथी तत्सम विषयांबाबत माहिती तसेच वापराबाबतचा खर्च, आयुष प्रणाली वापर करणाची कारणे, प्रसुती पूर्व व प्रसुतीनंतर स्त्रियांनी घेतलेले आयुष उपचार व खर्चाबाबतची माहिती, बाह्यरूग्ण-आंतररूग्ण यांची उपचार व खर्चाबाबतची माहिती, प्राथमिक आरोग्य केंद्र-सामुदायिक आरोग्य केंद्र, दवाखाने या ठिकाणी उपलब्ध आयुष सुविधाबाबत माहिती गोळा केली जात आहे. तसेच कुटुंबाच्या आयुष सेवांच्या उपलब्धतेबाबत मुल्यांकन व औषधी वनस्पतीच्या ज्ञानाबाबतची माहिती संकलित करण्यात येत असल्याची माहिती अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रादेशिक कार्यालयाचे प्र. सहसंचालक सु. हे. आग्रेकर यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या