मुंबई, : राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख "जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील" कैद्यांसाठी; दिनांक 11 ऑगस्ट रोजी, "जीवन गाणे गातच जावे..." या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य विभागाने दिली आहे. समुपदेशन, प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमातून याचे सादरीकरण होणार आहे.
देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात देखील ही विविध कार्यक्रम/उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गतच "स्वराज्य महोत्सव" निमित्त, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक, देशभक्तीपर, थोर संत, जेष्ठ साहित्यीक व कवी, थोर महापुरुष यांच्या जीवनकार्यावर आधारीत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे राज्यभरात आयोजन करण्यात येत आहे.
जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना; स्वातंत्र्य, देशभक्ती, योगाचे महत्त्व, प्रबोधन व समुपदेशन करणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक 11 ऑगस्ट, रोजी सकाळी 11.00 वाजता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
कैद्यांकरीता आयोजित या कार्यक्रमात, महाराष्ट्राच्या लोककलेसोबतच, कैद्यांचे प्रबोधन, योगाचे महत्त्व, देशभक्ती भावना जागृत करणाऱ्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग व गृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राज्यभर होणार आहे.
या कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असणाऱ्या कैद्यांनाही त्यांचे कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे. आजपर्यत एकाच वेळी 36 जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकरीता कार्यक्रम करण्याचा महाराष्ट्र तसेच देशातील हा पहिलाच अभिनव उपक्रम आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या