Header Ads Widget

मेळघाटातील आमझरी होणार ‘मधाचे गांव’

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व ग्रामीण भागातील युवक व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधाचे गांव संकल्पना राबविण्यात येत असून अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा तालुक्यातील आमझरी गावाची निवड ‘मधाचे गाव’ म्हणून करण्यात आली आहे. त्यादृष्टीने नियोजनाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंशु सिन्हा (भा. प्र. से.) दिनांक 2 व 3 ऑगस्ट रोजी अमरावतीला येत आहे.

    आमझरी हे गाव चिखलदरा पर्यटन स्थळाच्या नजीक असून आमझरी वन नर्सरी व पर्यटन स्थळ आहे. या गावामध्ये स्थानिक आदिवासी बांधव आग्या मधमाश्याचे मध काढण्याचा व्यवसाय पारंपारिक पध्दतीने करीत आहे. आमझरी या गावात खदी व ग्रामोद्योग मंडळामार्फत स्थानिक लाभार्थीना आग्या मधमाश्याचे शास्त्रीय पध्दतीने मध काढण्याचे प्रशिक्षण देवून मधकाढण्यासाठी लागणारे संपूर्ण साहीत्य लाभार्थीस वाटप करण्यात आले आहे. आमझरी येथे ‘मधाचे गाव’ संकल्पनेनुसार निसर्गातील मधमाशाचे संरक्षण व संवर्धनासोबतच मध व इतर उत्पादनापासून स्थानिक आदिवासीना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच चिखलदरा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना मधमाशाचे निसर्गातील व मानवी जीवनातील महत्व याबाबत माहिती होण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये मधमाश्याना उपयुक्त वनस्पतीची लागवड, हत्ती म्युझीअम वऑडीटोरीयम, सुशोभकरण व सेल्फी पॉईट, तसेच विविध प्रशिक्षण, कार्यशाळा व मधुफेस्टीवल आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंशु सिन्हा ह्या अमरावती भेटी दरम्यान जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पुढील नियोजनाबाबत चर्चा करतील. तसेच आमझरी येथे भेट देवून स्थानिक परिसराची पाहणी करणार आहेत व स्थानिक लाभार्थी आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या