Header Ads Widget

अविस्मरणीय ध्वजारोहण

  शाळेतून आलेल्या निमंत्रण पत्रिकेकडे पाहताच निर्मलाबाईंना हुंदका अनावर झाला. निमंत्रण पत्रिका मेजर साहेबांच्या फोटो समोर ठेवून निर्मलाबाईंनी आपल्या आसवांना वाट मोकळी करून दिली. कारण वीरपत्नी म्हणून तिच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार होते. कुठलेही अलंकार न घालता, कोणताही साज शृंगार न करता, आज निर्मलाबाई शाळेच्या प्रांगणातून ध्वजाकडे येत असताना सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. अनेकांचे चेहरे तिला पाहत असले तरी ती मात्र तिरंगा कडे पाहत होती. कारण ज्या ध्वजासाठी मेजर साहेबांसारखे अनेक सुपुत्र या देशाने गमावले आहेत, तो ध्वज तिच्या हस्ते फडकवला जात होता. खरंच तिचा आज खूप मोठा सन्मान गाव पाहत होते.

  ध्वजाला सलामी देताच तिला तो दुर्दैवी दिवस आठवला. ज्या दिवशी मेजर साहेबांचं प्रेत शासकीय इतमामात दारात उभं होतं. भारत मातेचा प्राण, भारत मातेचा अभिमान आणि भारत मातेचा स्वाभिमान असणारा तिरंगा आज तिच्या पतीच्या देहावर विराजमान होता. पती गेल्याचं दुःख तिच्यासाठी असह्य होतं. कारण पदरी असणारी दोन मुलं, घरात असणारे वयस्कर सासू सासरे आणि स्वतः ऐन तारुण्यात नशिबी आलेले विधवापण , या साऱ्या वेदना तिनं त्या तिरंग्याबरोबर गुंडाळून मेजर साहेबांच्या बरोबर जणू सोडून दिल्या. तिला रडत बसून चालणार नव्हते. कारण ती आज देशासमोर वीरपत्नी म्हणून उभी होती.

  खरंच 75 वर्षांनी का असेना पण खऱ्याखुऱ्या मानकऱ्याला देशामध्ये मान मिळाला आहे. ऐन तारुण्यात विधवा झालेली शहीद सैनिकाची पत्नी असेल किंवा म्हातारपणाचा आधार गमावलेले वीर माता-पिता असतील यांचे दुःख खरच न सांगण्यासारखं असतं. शहीद सैनिकांच्या मुलांच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधी न भरून येणारी असते. आयुष्याची अनेक स्वप्ने उराशी बाळगून सीमेवर लढलेले सैनिक निवृत्तीनंतर देशात सर्वसामान्यांसारखे जीवन जगत असतात. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने या निवृत्त सैनिकांना किंवा सुट्टीवर आलेल्या सैनिकांना ध्वजारोहणाचा सन्मान मिळाला आहे.

  त्याचबरोबर आणखी एक गौरवण्यासारखा सन्मान देशाने पाहिला. तो म्हणजे हेरवाडमध्ये घेतलेल्या निर्णयाची क्रांती देशभर निर्माण झाली. आज कित्येक शासकीय इमारतीवर विधवा स्त्री, अथवा विधवा कर्मचारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ज्या स्त्रीला कालपर्यंत कोणत्याही समारंभामध्ये डावलले जात होते, ती स्त्री आज सर्वांच्या बरोबरीने सन्मानाने जगत आहे एवढेच नव्हे तर तिच्या हस्ते झालेलं ध्वजारोहण साऱ्या गावासमोर एक चांगला आदर्श निर्माण झाला.

  खरोखरच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात 'हर घर तिरंगा' उपक्रमा बरोबरच शहीद सैनिक पत्नी, वीरमाता, वीरपिता, विधवा कर्मचारी, निवृत्त सैनिक, कार्यरत परंतु सुट्टीवर आलेले सैनिक, विधवा महिला, गरोदर माता यांचा खऱ्या अर्थाने मोठा सन्मान आज देशांमध्ये घडून आला. खरंतर ध्वजारोहणामध्ये याच लोकांचा सिंहाचा वाटा आहे. आणि खरा मान पहिला त्यांचाच आहे.

  15 ऑगस्ट दिवशी प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये परंपरेने चालत आलेले ध्वजारोहण होईलच मात्र 13 तारखेला 14 तारखेला झालेले ध्वजारोहण सर्वांसाठी अविस्मरणीय राहील हे मात्र नक्की.

  जय हिंद! जय तिरंगा! जय भारत!
  -सौ आरती अनिल लाटणे
  इचलकरंजी.
  मोबाईल नंबर -99 70 26 44 53

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या