Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

शाळेतही मुली सुरक्षित नाही..!

  शाळा म्हणजे विद्येचं मंदीर, मात्र सध्या शाळांमध्येही अगदी घृणास्पद प्रकार समोर येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे दिल्लीमध्ये शाळांचा दर्जा सुधारल्याचे बोलले जात असताना व न्यूयॉर्क टाइम्सने दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्याची दखल घेतली असताना दिल्लीच्या एका महानगरपालिका शाळेत अत्यंत विकृत प्रकार घडल्याचे समोर आल्याने शिक्षण क्षेत्र हादरून गेले आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये अज्ञात व्यक्तीने आठ वर्षांच्या दोन मुलींचे कपडे उतरवल्याची घटना समोर आली आहे. ही व्यक्ती या मुलींच्या वर्गात गेली, त्यानंतर त्याने या मुलींचे कपडे उतरवले. त्यानंतर या व्यक्तीने स्वतःचेही कपडे उतरवून वर्गासमोर लघवी केली. दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांनी याबाबत माहिती दिली. ही शाळा दिल्लीच्या भजनपुरा भागातील असल्याचे त्यांनी सांगितले.धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेबाबत मुलींनी शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सांगितले तेव्हा त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या मुलींना हे सगळं विसरून जा असं सांगितल्याचा आरोप केला जात आहे. शाळा व महाविद्यालये हे शिक्षणाचे केंद्र.मात्र शिक्षणाच्या या पवित्र दालनात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा ठाकला आहे.अनेक शाळांमध्ये विद्यार्थी असुरक्षित आहेत. लैंगिक अत्याचार व बलात्काराच्या घटना घडत आहे.

  पुण्यातील ११ वर्षीय विद्यार्थिनीवर एका अज्ञात माथेफिरुने शाळेतच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून आता शाळेतही मुली सुरक्षित नाही का असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.शाळांमध्ये आपले मुले सुरक्षित राहील की नाही याची आता पालकांना चिंता सतावत आहे. खासगी शाळांसह जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही लावून विद्यार्थ्यांची सुरक्षितता बाळगणे सध्यातरी गरजेचे झाले आहे. आपल्याकडे असलेल्या सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांच्या सुरक्षेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही शाळांचा अपवाद सोडला तर बहुतेक शाळांना सुरक्षा रक्षक नसून याला शाळा प्रशासन जबाबदार आहे का? शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन समित्याही कार्यरत नसल्यामुळे या शाळांत शिकणा-या विद्यार्थ्यांची सुरक्षा वा-यावर पडली आहे का? शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्याची मुख्य जबाबदारी कोणाची आहे ? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी संबंधित यंत्रणा व शाळा प्रशासनाने योग्य ती सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असताना देखील अत्याचाराच्या घटना घडत आहे.

  सध्या शिक्षणाचा बाजार झाला असून, विद्यार्थ्यांची सुरक्षा तरच दूरच, पण योग्य त्या सुविधाही मिळत नसल्याचे समोर आले आहे. अवाच्या सव्वा फी आकारूनही सुविधांची बोंब असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार व शाळा प्रशासनाची आहे. असे असताना हे घटक अत्यंत बेजबाबदारपणा दाखवत आहे.या पार्श्वभूमीवरसर्व शाळांची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची आवश्यकता आहे. शाळांच्या परिसरात सी. सी. टी. व्ही. बसवावेत, विद्यार्थ्यांना आपत्कालीन अवस्थेत त्वरित शाळेबाहेर काढण्याची व्यवस्था करणे, तसेच ज्या शाळांमध्ये मुले शिकतात, अशा शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने पुढाकार घेतला पाहिजे. तसेच शाळांच्या सभोवती येणा-या-जाणा-या प्रत्येक व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे, तसेच प्रत्येक शाळांमध्ये प्रशिक्षित सुरक्षा रक्षक ठेवले पाहिजेत, तरच राज्यातील शाळांमधील विद्यार्थी सुरक्षित राहतील.

  विद्यार्थी शाळेत असताना विद्यार्थ्यांची सुरक्षा शाळेवरच येते. तसेच आपल्या मुलांच्या शाळा सुरक्षेबाबत परिपूर्ण आहेत का, याचा पालक म्हणून कोण विचार करतो का, किंवा आपत्तीच्या वेळी व्यवस्थापनाची काय तयारी आहे, सुरक्षा आढावा घेणारी समिती आहे का, याचा विचार कोणी करायचा.?असे कितीतरी प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होतात.

  जगात कुठल्याही ज्ञान मंदिरात शिक्षणाचे धडे गिरवणारे विद्यार्थी अथवा रस्त्यावरून चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही. त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था रामभरोसे आहे.एखादी समस्या उद्भवली की, त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जातो. पाणी गळ्याशी आले, की वाचण्याची धडपड करायची, हीच रीत सा-या जगाने अवलंबली आहे. सद्य:स्थितीत कुठलेही क्षेत्र सुरक्षित नाही. आपला पाल्य शाळेत सुरक्षित राहील की, नाही यासंबंधी पालक साशंकच असतात.पुण्यामध्ये नराधमांनी केलेला अत्याचार असो वा बसमध्ये चिमुरडीशी केलेले बेवर्तन असो. सुरक्षिततेचा प्रश्न अनुत्तरीत राहतो. शाळा- कॉलेज प्रशासन आता कारखाने झालेले आहेत. शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता बेभरवशाची झालेली आहे. भरमसाट फी घेऊन आपत्ती व्यवस्थापन समित्याही नेमणे अपरिहार्य आहे. आजच्या शिक्षण प्रणालीचा विचार केल्यास त्या माध्यमातूनही आजचा विद्यार्थी सुरक्षित नाही. त्यामुळे नैसर्गिक आणि शैक्षणिक आपत्तीच्या कचाटय़ात आजचा विद्यार्थी सापडलेला आहे. या पार्श्वभूमीवरविद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासन व शासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

  -प्रा डॉ सुधीर अग्रवाल
  ९५६१५९४३०६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code