मुंबई : शनिवारी आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या कमाईत थोडीफार वाढ पहायला मिळाली. या चित्रपटाने गेल्या तीन दिवसांत जवळपास २७.७१ कोटींचा गल्ला जमवला आहे. प्रदर्शनाच्या तिसर्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत २0 टक्कयांनी वाढ झाली. शनिवारी लाल सिंग चड्ढाने ८.७५ कोटी रुपये कमावले. तर दुसरीकडे अक्षय कुमारच्या रक्षाबंधन या चित्रपटाच्या कमाईत कोणतीच वाढ झाली नाही. या चित्रपटाने तीन दिवसांत जवळपास २0.६ कोटी रुपये कमावले आहेत.
हे दोन्ही चित्रपट ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले. लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचं दिग्दर्शन सिक्रेट सुपरस्टार फेम अद्वैत चंदनने केले असून मराठमोळ्या अतुल कुलकणीर्ने याची पटकथा लिहिली आहे. यामध्ये आमिरसोबतच करीना कपूर, मोना सिंग आणि दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य यांच्याही भूमिका आहेत.
शनिवारी रक्षाबंधन या चित्रपटाने जवळपास ६ कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतीय समाजातील हुंडा प्रथेचे दुष्परिणाम आणि वर्णद्वेषावर भाष्य करणार्या या चित्रपटात अक्षय कुमार हा चार बहिणींच्या एका प्रेमळ भावाच्या भूमिकेत आहे. बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तरप्रदेश, राजस्थान याठिकाणी रक्षाबंधनची कमाई चांगली झाली. मात्र मुंबई, पुणे, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. शुक्रवारी आणि शनिवारी गुजरातमध्ये फारच कमी कमाई झाली. तर दुसरीकडे लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या शनिवारच्या कमाईत ४0 टक्कयांची वाढ होणं अपेक्षित होते, मात्र ती वाढ २0 टक्केच झाली. या चित्रपटालाही महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं जात होतं. कथितरित्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि भारतीय सैन्याला वाईट पद्धतीने दाखवल्यामुळे हा चित्रपट वादात सापडला होता. सोशल मीडियावरील बॉयकॉटच्या ट्रेंडचा फटका कमाईवरही झाल्याचं पहायला मिळालं. आमिर आणि अक्षयसारख्या बॉलिवूडमधल्या दोन बड्या कलाकारांच्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अपेक्षित असं यश अद्याप मिळवले नाही.
0 टिप्पण्या