- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : क्रीडा क्षेत्रात नैपूण्य मिळविणाऱ्या तरुणांना करिअर घडविण्यासाठी अनेकविध संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्राकडे वळविण्याची गरज असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी आज येथे सांगितले.
थोर हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन अर्थात क्रीडा दिनानिमित्त हॉकी सामना व कार्यक्रमाचे आयोजन पं. जवाहरलाल नेहरु विभागीय क्रीडा संकुलात आज करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस उपायुक्त विक्रम साळी, क्रीडा उपसंचालक विजयकुमार संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, पोलीस निरीक्षक राहुल आठवले, इरफान अथर अली, सलीम मिरावाले, मनिष शिरसाठ, शेख इमाम, अविनाश वैद्य, प्रमोद चांदुरकर, संतोष विघ्ने, वैशाली इंगळे, संजय मनवर, संजय कथलकर, अकील शेख, गणेश तांबे आदी यावेळी उपस्थित होते.
अमरावती विभागीयस्तरावर उत्तमोत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. साळी यांनी केले. अमरावतीच्या क्रीडा वैभवाचा वारसा अधिक उज्ज्वल करण्यासाठी नव्या पिढीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. संतान यांनी केले.
यावेळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांच्या हॉकी सामन्याचे आयोजन करण्यात आले. व ऑलिंपिकच्या धर्तीवर खेळाडूंनी स्टिक उंचावून फुलांचा वर्षाव करत मान्यवरांना अभिवादन केले. जिल्हा हॉकी असोसिएशनचे सचिव व माजी हॉकी खेळाडू शेख इमाम यांना मेजर ध्यानचंद यांचे छायाचित्र, शाल व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. श्रीमती. साळवी यांनी प्रास्ताविक केले. संदिप इंगोले यांनी आभार मानले. यावेळी विविध क्रीडा संस्थांचे प्रतिनीधी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या