अमरावती (प्रतिनिधी) : जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करून स्व. मेजर ध्यानचंद यांनी हॉकीमध्ये केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस, 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्त विभागीय व जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विविध कार्यक्रम होणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा कार्यालय, अमरावती विभाग तसेच जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी, एकविध खेळाच्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन ‘सर्व समावेशक आणि तंदुरूस्त समाजासाठी सक्षम’ म्हणून या संकल्पनेवर साजरा करण्यात येत आहे.
या संकल्पनेवर आधारित विविध उपक्रमाचे उद्घाटन अमरावती विभागीय क्रीडा संकुल येथे दि.29 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येईल. ऑनलाईन प्रश्न मंजुषेचे तसेच आशु तो डो आखाडाचे समन्वयक संघरक्षक बडगे, डिस्ट्रीक कराटे असोशिएशनच्या संयोजक सोनल रंगारी प्रश्नमंजुषेसाठी काम करणार आहेत. सर्व स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल.
हॉकी प्रदर्शनीय सामना, नेटबाल क्रीडा स्पर्धेचे समन्वयक नितीन जाधव, मल्लंखाब प्रात्यक्षिकांचे समन्वयक नरेंद्र गाडे, कुडो क्रीडा स्पर्धेचे समन्वयक अस्लम शेख, बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेच्या समन्वयक धनश्री वावरे, बॅडमिंटनचे समन्वयक कृणाल फुलेकर, स्क्वॅश क्रीडा प्रकाराचे समन्वयक गणेश तांबे, बुध्दीबळाचे समन्वयक पवन डोडेजा, टेबल टेनिस स्पर्धेचे हमीद खान यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात येत आहेत.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. दिनेश म्हाला यांच्या मार्गदर्शनाखाली सायंन्स स्कोर मैदानात फुटबॉल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा संकुल येथे धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा, अतुल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विजया कॉन्व्हेंटमध्ये तायंक्वांदो क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येईल. या क्रीडा प्रकारात प्राविण्य प्राप्त झाल्याबाबत स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच विभागीय क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा संकुल येथे वृक्षारोपण व परिसर स्वच्छता उपक्रम राबविण्यात येईल.
वरील उपक्रमात भाग घेण्यासाठी इच्छुकांनी समन्वयकांशी संपर्क साधावा. तसेच क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, संस्था, मंडळे यांनी आपल्या स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करुन त्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती वर्षा साळवी यांनी केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या