मुंबई, : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत जबाबदार धरून पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित केले जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्या नमिता मुंदडा, अबू आझमी यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरु असलेल्या विविध गैरप्रकारांबाबत सविस्तर तपास सुरू आहे. त्याबाबतचा एक अहवाल मिळाला आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित केले जाईल. त्याचबरोबर तेथील पोलीस उपअधीक्षक यांची अकार्यकारी पदावर नियुक्ती केली जाईल.
राज्यातील विविध ठिकाणच्या गैरप्रकारांची चौकशी करण्याच्या सूचना पोलीस महासंचालक यांना दिल्या जातील. दोषी आढळल्यास अंबाजोगाई प्रमाणेच दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांची कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ज्या जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांच्या सीमेला लागून आहे, त्या जिल्ह्यांत अवैध दारूबाबत तपासणी करण्याच्या सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या