Recent in Technology

Advertisement

Breaking News

सुभाष किन्होळकरांचा बाल काव्यसंग्रह 'फुलपाखरे आहोत आम्ही'

  साहित्यिक सुभाष किन्होळकर यांच्या लेखणीतून साकारलेला 'फुलपाखरे आहोत आम्ही' हा बालकाव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला. बालकुमारांचं संस्कारासह मनोरंजन करणाऱ्या बाल साहित्यिकांना त्यांनी तो अर्पण केला आहे. 'क्लेव्हर फॉक्स' या राष्ट्रीय स्तरावरील प्रकाशन संस्थेने तो प्रकाशित केला आहे. 21 कविता असलेल्या काव्यसंग्रहाला पन्नास पाने आहेत.

  मुलांसाठी खास मोठी आणि ठळक अक्षरे व प्रत्येक पानावरील कृष्णधवल छायाचित्रे ही या काव्यसंग्रहाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. कवी सुभाष किन्होळकर यांनी थोडक्यात आपले मनोगत या काव्यसंग्रहात मांडले आहे. 'बालकांच्या सानिध्यात रोजचा वावर असल्यामुळे त्यांच्या मनाचा मला ठाव घेता आला. त्यातून फुलपाखरे आहोत आम्ही हा बालकवितासंग्रह साकारला', असे त्यांनी लिहिले आहे. या बालकविता खरोखरच बालपणाचा शोध घेतात.

  वळण वाटा तुडवत आम्ही
  चढतो डोंगरकडा
  इकडे तिकडे हिंडून खूप
  फुलांशी लावतो लळा

  अशी साधी आणि सरळ काव्यरचना या संग्रहात आहे. मुलांच्या भावविश्वात चित्र, परी, पुस्तके, आई, सणवार, पशुपक्षी, आकाश आणि सवंगड्यांचं महत्त्व असते. हा धागा पकडून त्या विषयावर या काव्यसंग्रहात रचना आहेत. कुठेही कठीण शब्द नाहीत. समूहाने गाता येतील आणि ओठांवर ठरतील अशाच काव्य ओळी आहेत.

  निळी परी परी
  ड्रेस निळा निळा
  निळ्या निळ्या रंगाचा
  भारी तिला लळा
  (परीची निळी कहाणी)

  असं परीचं विश्व कवीच्या लेखणीतून उतरले आहे. भरारी नावाची कविता अशाच पद्धतीने पाखरांना उभारी देणारी तशीच बालकांसाठी प्रेरणादायी आहे.

  'घे भरारी उंच पाखरा
  घे भरारी रे
  गाठ ध्येयाचे शिखर तू
  घे भरारी रे

  या छोट्या छोट्या रचना मुलांना नक्कीच आवडतील. मोठ्यांनी छोट्यांसाठी लिहिताना त्यांच्या संस्कारक्षम मनावर सकारात्मक परिणाम होतील कशी रचना करायची असते याचे चांगले भाण किन्होळकर यांना आहे. लहान मुलांवर कडवट संस्कार रुजले की, त्यांच्यात समस्या निर्माण होतात. कवी सुभाष किन्होळकर यांच्या या काव्यसंग्रहात कुठेही अंधश्रद्धा व दैववादी मजकूर नाही. त्यांच्या कविता मुलांना मनोरंजनासोबत सहजीवनाचे महत्व पटवितात. 'आनंदाच्या तऱ्हा' ही कविता छोट्यासह मोठ्यांनाही आनंद देते.

  कोणी लिहितो छान कविता
  कोणी काढतो सुंदर चित्र
  पेरूनी मनी ओला जिव्हाळा
  कोणी जमवतो
  कुणी जमवतो नाना मित्र

  बुलडाणा जिल्ह्याच्या साहित्य विश्वात खुप प्रतिभावंत आहेत. सुभाष किन्होळकर हे कवी, कादंबरीकार आणि प्रयोगशील शिक्षक आहेत. आपला मौल्यवान वेळ ते लेखन कार्यासाठी देत आहेत. यातून त्यांचे बरेचसे साहित्य प्रसिद्ध झाले आहे. प्रस्तुत काव्यसंग्रह 'फुलपाखरे आहोत आम्ही' मध्ये किन्होळकर यांनी सुंदर कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या हातून यापुढेही अशाच सुंदर साहित्यकृती येत राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा..!

  - रवींद्र साळवे,
  साथी 20, सहजीवन सोसायटी, खामगाव रोड,
  मारुती शोरूमच्या बाजूला, सुंदरखेड बुलडाणा
  मो. 9822262003

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code