अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई जोरात सुरू झाली आहे. शहराच्या विविध भागांतील अतिक्रमणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावेळी मोठा फौजफाटा घेऊन ही अतिक्रमणे काढली जात आहेत. मर्यादेपेक्षा अधिक, अनधिकृत बांधकामे दुकानदारांकडून केली जातात. तसेच घरांच्या बाबतही आढळून आले आहे. बेकायदा बांधकामांची गय केली जाणार नाही, असा संदेशच यानिमित्ताने महापालिकेकडून देण्यात आला आहे.
सोमवार दिनांक १ ऑगस्ट,२०२२ रोजी अतिक्रमण विभागामार्फत चांदनी चौक पासून कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पठाण चौक ते वलगावं रोडवरील अतिक्रमण निर्मुलनाची कार्यवाही करण्यात आली. चांदनी चौक ते पठाण चौक ते वलगावं रोडच्या दोन्ही बाजुंनी सदर अतिक्रमण निर्मुलन कार्यवाही करण्यात आली.
या कार्यवाही मध्ये वालकंपाऊंड, टिनाचे बांधकाम, पानठेले, अनधिकृत दुकाने, दुकानाचे शेड, बॅनर, पोस्टर, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नष्ट करुन रोड व फुटपाथ मोकळे करण्यात आले. जेसीपीद्वारे अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली. महानगरपालिकेतर्फे अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्याचा निर्णय मनपा आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांनी घेतला. अनधिकृत आणि वाहतुकीस अडथळा करणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली. सदर कार्यवाही दरम्यान अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्सेले, अतिक्रमण विभागाची टिम, झोनची टिम व पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या