Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

मेळघाटात आरोग्य सुविधांबरोबरच जनजागृतीही करा -खासदार डॉ. अनिल बोंडे

  * जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची आढावा बैठक
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : क्षयरोग तसेच इतर आजारांबाबत जनजागृतीसाठी मेळघाटात सर्वदुर शिबीरांचे आयोजन करावे. क्षयरोगाची तपासणी करतांना रुग्णांकडुन घेतलेले नमुने अचूकपणे तपासता यावे यासाठी आवश्यक यंत्रांची संख्या वाढवावी. खाजगी रुग्णालयांत क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांची व त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक करावे, अशा सुचना खासदार अनिल बोंडे यांनी यावेळी केल्या.

  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा खासदार डॉ. बोंडे यांनी घेतला. बैठकिला माजी आमदार रमेश बुंदिले, माजी महापालिका सभापती तुषार भारतीय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे, डॉ. कैलास घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रणमले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड, बालविकास प्रकल्प अधिकारी मंगल पांचाळ, निवेदिता दिघडे चौधरी आदी उपस्थित होते.

  दर्यापूर, धारणी, अचलपूर, चिखलदरा, तिवसा, मोर्शी, वरुड व चुरणी या सर्व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात क्षयरोग रुग्णांची तपासणी व निदान करणारी यंत्रे चालू आहेत किंवा कसे याची माहिती तात्काळ सादर करावी. मेळघाटातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव तात्काळ सादर करुन त्याबाबत पाठपुरावा करावा. जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे ग्रामीण रुग्णालये व आरोग्य केंद्रांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविण्याचे काम प्राधान्याने करावे. अशा सुचना श्री. बोंडे यांनी यावेळी दिल्या.

  मेळघाटात प्रामुख्याने बालके, महिला व सामांन्यांमध्ये आढळणाऱ्या सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यात यावी. या आजाराचे प्रमाण शोधून काढणे, चाचणी व उपचार करण्याबाबत जनजागृती करण्यात यावी. सिकलसेलचे निदान करणारी किट जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समिती किंवा आदीवासी उपयोजनेतुन निधी प्रस्तावित करण्याच्या सुचना डॉ. बोंडे यांनी दिल्या.

  दृष्टीदोष असलेल्या बालकांना मोठ्या भिंगाचे चष्मे दिल्यास त्यांच्यात न्युनगंड निर्माण होऊ शकतो. त्यांच्यातील दृष्टीदोषावर आधुनिक शस्त्रक्रिया करता यावी याकरीता स्थानिक नेत्रतंज्ज्ञाचे सहकार्य घ्यावे. चिखलदरा, मेळघाट भागात सध्या त्वचेचे आजार उद्भवले असुन त्यावर उपचार होणे गरजेचे आहे असे सांगुन आशा सेविकांनी येणारे पंधरा दिवस मोहिम स्वरुपात राबवुन याबाबत सर्वेक्षण करावे, असे सांगितले.

  महिला व बालविकास विभागाचा आढावा घेतांना श्री बोंडे म्हणाले, येणाऱ्या सप्टेंबरमध्ये जिल्हाभर पोषणमाह राबविण्याबाबत प्रभावी नियोजन करावे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातुन ग्रामीण भागात पोषण आहाराबाबत सर्व स्तरावर जनजागृती करण्‍याचे नियोजन करावे. सर्व विभागांनी समाजमाध्यमांवरील आपली खाती अद्ययावत करावी. सर्वसामान्यांना माहिती मिळावी, त्यांच्यात आरोग्यविषयी जनजागृती व्हावी यासाठी या माध्यमांचा वापर करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.

  स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेतांना ते म्हणाले, गावात वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात यावी. बचतगटांना मानधन तत्वावर ती स्वच्छतागृहे देखरेखीसाठी सोपविण्यात यावी. या स्वच्छता गृहाच्या निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना श्री बोंडे यांनी केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code