Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देणार - कृषीमंत्री अब्दुल सत्तार

    * धामणगाव रेल्वे तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकरी, ग्रामस्थांशी कृषीमंत्र्यांनी साधला संवाद
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यात येईल. शासन अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज व्यक्त केला.

    कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज धामणगाव रेल्वे तालुक्यातील मौजा बोरगांव धांदे, मौजा रायपूर (कासारखेड ), मौजा इसापूर तसेच मौजा भातकुली येथील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतकरी, ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला, त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते.

    कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक संशोधन केंद्राच्या प्रमुख वर्षा टापरे, महसूल उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, धामणगाव रेल्वे तालुका कृषी अधिकारी राजेश वालदे , उपविभागीय कृषी अधिकारी माणिक त्र्यंबके तसेच अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

    श्री. सत्तार म्हणाले, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, या कामात कुठलीही हयगय होता कामा नये. बांधावर जाऊन उर्वरित पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करावी. येत्या आठवडाभरात शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीच्या नुकसानाची भरपाई मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतली.

    धामणगाव रेल्वे तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 63932.71 हेक्टर आहे. सर्वसाधारण पेरणी खालील क्षेत्र 55323.20 हेक्टर एवढे आहे. सद्यस्थितीत तालुक्यामध्ये खरीप हंगामामध्ये 54302. 00 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. आतापर्यंत तालुक्यात एकूण 777.90 मिमी (133.7 टक्के ) पावसाची नोंद झालेली आहे. जून- जुलै महिन्याचे सर्वसाधारण पर्जन्यमान झालेले आहे. जुलै महिन्यातील सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे अंदाजे 44104.00 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

    मौजा बोरगांव धांदे येथील सोयाबीन, कापूस व तूर पीकांचे एकूण बाधित क्षेत्र 603 हेक्टर असून नुकसानीची टक्केवारी 94.81 टक्के आहे. मौजा रायपूर (कासारखेड ) सोयाबीन, कापूस आणि तूर पीकांचे बाधित क्षेत्र 193 हेक्टर असून नुकसानीची टक्केवारी 93.05 टक्के एवढी आहे. मौजा इसापूर येथील सोयाबीन, कापूस आणि तूर पीकांचे बाधित क्षेत्र 196 हेक्टर असून नुकसानीची टक्केवारी 89.50.0 टक्के एवढी आहे. मौजा भातकुली येथील सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर पीकांचे बाधित क्षेत्र 383 हेक्टर असून नुकसानीची टक्केवारी 95 टक्के एवढी आहे. यावेळी गावातील शेतकरी, नागरिक, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code