Recent in Technology

Advertisement

Breaking News

आ. सुलभाताई खोडके यांनी मांडले मेळघाटातील कुपोषणाचे वास्तविक चित्र

  * मेळघाटातील महिलांना मिळावी सहा महिन्याची प्रसूती व बालसंगोपण रजा
  * मेळघाटातील महिलांचे समुपदेशन करणे काळाची गरज

  मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवस कुपोषणाच्या मुद्यावरून चांगलाच गाजला. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी गेल्या एक महिन्यातली मेळघाटातली आकडेवारीच दाखवित आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांना कोंडीत पकडले. तर अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी मेळघाटातील कुपोषणाच्या भीषण समस्येबाबत सभागृहाला अवगत केले.

  एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्र राज्यांतील १६ जिल्ह्यांमध्ये वाढता कुपोषणाचा आलेख चिंतेची बाब असून यातून होणारे बालमृत्यू व मातामृत्यू ही महाराष्ट्राला न शोभणारी बाब असल्याचे आमदार महोदयांनी सांगितले. राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचा आकडा १ लाख २२ हजार ७०० च्या वर असून त्यात ८,८४२ बाल मृत्यू झाले. तर १३,५०० तीव्र कुपोषित बालके असून २,३२३ बालके मध्यम कुपोषित आहेत. तर एकट्या मेळघाटात ३९८ बालके तीव्र कुपोषित आहेत. नुकताच राज्याचे विरोधी पक्ष नेता अजितदादा पवार यांनी धारणी भागाचा दौरा केला. धारणी भागातील एका महिलेचे बाळ हे ९ महिन्याचे होते व ती महिला सद्या ७ महिन्याची गरोदर होती. दोन महिन्यांनी तिचे दुसरे बाळ जन्माला येणार आहे. पहिल्या बाळाचे योग्य संगोपण होण्या आधीच ती महिला दुसऱ्या मातृत्वाचा भार सहन करीत होती. याचा त्या महिलेच्या आरोग्यावरही परिणाम होणार असून येणारे बाळ हे कुपोषित जन्माला येणार असल्याने मेळघाटात कुपोषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

  कमी वयात होणारे लग्न व केवळ २१ वर्षाच्या वयात तीन मुलांना जन्म देणे अशी परिस्थिती मेळघाटात आहे. तर नारवाटी गावातील एकही महिला प्रसूतीसाठी दवाखान्यात जात नाही. गावात प्रसुतालय नसल्याने त्यांना कळमखार, धारणी येथे प्रसूतीसाठी जावे लागते, त्यामुळे घरीच प्रसूती होत असल्याची परिस्थिती या भागातील अनेक गावात आहे. हे भीषण वास्तव बदलवायचे असेल तर आता मेळघाटातील महिलांचे समुपदेशन करणे काळाची गरज असल्याचे आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी पावसाळी अधिवेशनात बोलतांना सांगितले. तर मेळघाटत दोनच महिन्याची प्रसूती झालेली महिला ही आपल्या बाळाला घेऊन शेतात कामाला गेली, व झाडाला पाळणा बांधून बाळाला झोळी मध्ये टाकून ती महिला शेतात काम करीत होती , अशी स्थिती मेळघाटात असल्याने कुपोषण वाढले आहे. शासकीय महिला कर्मचाऱ्यांप्रमाणेच धारणी-मेळघाटातील महिलांना सुद्धा सहा महिने बाळ संगोपण रजा देणे आवश्यक असून मनरेगाच्या माध्यमातून प्रसूतकालीन वेतन सुद्धा देण्यात यावे, या मुद्याकडे आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले.

  मेळघाटात डॉक्टर व आरोग्य कर्मचारी संख्याबळ पुरेसे उपलब्ध नसून, आहे त्या परिस्थितीत कंत्राटी परिचारिका काम करीत आहे. त्यामुळे त्यांना स्थायी नियुक्ती दिल्यास त्या आणखी चांगल्या तऱ्हेने काम करू शकणार असल्याचे आमदार महोदयांनी उल्लेखित केले. तर अंगणवाडी केंद्रातून उपलब्ध होणारा आहार बालकांना नियमित व पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतो का ? यावर आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी शंका उपस्थित केली. बालकांना अंडी, उसळ व खिचडी दिली जाते असे सांगण्यात येते. मात्र ते त्यांना मिळत नसल्याची खंत अनेक महिलांनी आपल्या जवळ बोलून दाखविली. मग हा आहार जातो कुठे ? यासाठी चौकशी समिती गठीत करण्याची गरज असून संबंधितांवर कारवाई सुद्धा अपेक्षित असल्याची संतप्त भावना आमदार महोदयांनी सभागृहात प्रकट केली. धारणी-मेळघाट सारख्या दुर्गम भागातील घरे पडक्या स्थितीत असून पावसाळ्यात प्रसूत महिलांना त्रास सहन करावा लागतो, अश्या परिस्थितीत त्यांना चांगले घरकुल मिळावे, तसेच या भागात रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सुविधा उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे सांगून अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी मेळघाटतील कुपोषणाचे भीषण वास्तव पावसाळी अधिवेशनात मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code