Header Ads Widget

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शब्द सुरांची बरसात ; पांचाळे यांच्या गझलगायनाने अमरावतीकर मंत्रमुग्ध

  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : जीवनाचे गहन तत्वज्ञान सांगणाऱ्या सुंदर शब्दात सजून आलेल्या गझला आणि तितकीच दमदार सुरेल गायकी यांनी अमरावतीकरांचे काळीज काबीज केले. गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या 'शब्द सुरांची भावयात्रा' या कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

  महसूल अधिकारी, कर्मचारी परिवारातर्फे हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात झाला. कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या मैफलीला तुडुंब गर्दी करून अमरावतीकरांनी आपल्या रसिकतेचा प्रत्यय दिला. संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते. उत्तम शेर व गझलांना रसिकांनी 'वाहवा', टाळ्या व ' वन्स मोअर'ची दाद देऊन मैफलीची रंगत वाढवली.

  कविवर्य सुरेश भटांपासून ते अलीकडच्या काळातील तरुण गझलकारांपर्यंत अनेकविध गझला श्री. पांचाळे यांनी यावेळी सादर केल्या. इलाही जमादार यांच्या 'अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा' या गझलेने मैफलीचा प्रारंभ झाला. पुढे 'फुलपाखरास ठावे कुठे बसायचे', ' मी किनारे सरकताना पाहिले', 'नभातले तारे माळलेस का तेव्हा' अशा आशयघन गझलांनी मैफल उत्तरोत्तर रंगतच गेली. डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या 'तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते.

  तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ होते' आणि ' जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, हुंदका दाटून येता मज हसावे लागले' या गझलांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली. मैफलीत अनेक फर्माईशी आल्या. 'गरीबाच्या लग्नाला' या व अशा प्रत्येक गझलेला, गायकीला, तबलावादन, गिटार, बासरी व पेटीवादनालाही भरभरून दाद मिळाली. 'ही कहाणी तुझ्या न्हाण्याची' या गझलेने मैफलीची सुरेल सांगता झाली.

  तबल्यावर वर्ध्याचे देवेंद्र यादव, हार्मोनियमवर अकोटचे सुधाकर अंबुसकर, गिटारवर चंद्रपूरचे संदीप कपूर व बासरीवर अकोल्याचे प्रशांत अग्निहोत्री समर्थ साथ लाभली. कवी किशोर बळी यांनी सुंदर सूत्रसंचालन केले. ध्वनी संयोजन रफिक भाई यांनी केले.

  श्रेष्ठ गझलकार, कवी स्व. सुरेश भट यांच्यासोबत पूर्वी अमरावतीला आलो होतो. आपला गझल व अमरावतीशी जुना ऋणानुबंध आहे, असे विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले. अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी प्रास्ताविक केले. प्रसिद्ध निवेदक कवी किशोर बळी यांनी मैफलीचे, तर प्रवीण येवतीकर यांनी स्वागत समारंभाचे सूत्रसंचालन केले.

  यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वराडे, अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अनिल भटकर यांनी स्वागत केले. अति. पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, इब्राहिम चौधरी, रणजीत भोसले, नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, संतोष काकडे यांच्यासह विविध महसूल अधिकारी पोलीस अधिकारी विविध विभागप्रमुख, पत्रकार बांधव,विविध क्षेत्रातील मान्यवर, गझलप्रेमी, रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या