Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

भविष्य घडविण्यासाठी युवकांनी इतिहासातुन प्रेरणा घ्यावी - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : देशाची संस्कृती, येथील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास मोठा आहे. त्याचा डोळसपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य चळवळीतील शहीद, लढवय्ये, महापुरुष यांच्या आदर्श व प्रेरणादायी कर्तृत्वाचे दर्शन इतिहासाच्या अभ्यासातुन होते. युवकांनी इतिहासाला साक्षी ठेवून, त्यातुन बोध घेऊन आपले भविष्य घडवावे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय कार्यालय व शासकीय विभागीय ग्रंथालय यांच्यावतीने आयोजित भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील घटनांची माहिती देणाऱ्या चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. इतिहास केवळ आपल्या वर्तमानासाठीच नाही तर आपल्या भविष्यासाठी देखील महत्त्वाचा आहे. आपला देश समजुन घ्यायचा तर आधी इतिहास समजुन घेणे गरजेचे असल्याचे श्री पांढरपट्टे यांनी सांगितले.

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे, श्री. शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र बुरंगे, विभागीय ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी यावेळी उपस्थित होते.

    प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध घटना-घडामोडी चित्र स्वरुपात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन 12 ऑगस्ट पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनात 1857 ते 1947 भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानी यांची जीवनगाथा, त्यांचे चरित्र चित्र व माहिती स्वरुपात येथे मांडण्यात आले आहे. आझाद हिंद फौजेची स्थापना, जलेजाव आंदोलन, मिठाचा सत्याग्रह, दांडीयात्रा, चौरीचौरा येथील उठाव, असहकार आंदोलन या विविध घटनांची माहिती सादर करण्यात आली आहे.

    10 ते 12 ऑगस्टपर्यंत ग्रंथ प्रदर्शन

    शासकीय विभागीय ग्रंथालय, सहाय्यक ग्रंथालय संचालक व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्यावतीने 10 ते 12 ऑगस्टपर्यंत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय आदींचे त्याला सहकार्य मिळाले आहे. स्वातंत्र्य लढ्याबाबत विस्तृत माहिती देणारे ग्रंथ येथे उपलब्ध आहेत. स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या अमरावती जिल्ह्यातील हुतात्म्यांची माहिती देणारे विशेष दालन येथे उभारण्यात आले आहे. आमदार प्रवीण पोटे पाटील व विविध मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली. ‘तिरंगा सेल्फी बुथ’वर विद्यार्थी व प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, श्री शिवाजी कला व वाणिज्य महविद्यालय, गणेशदास राठी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code