Recent in Technology

Advertisement

Breaking News

पोळा खरंच बैलासाठी ना....!

  आम्ही श्रावण महिण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात अमावस्येला पोळा हा सण मनवतो.आदल्या दिवशीपासुनच बैलाला अाराम देत त्याने वर्षभर शेतात काम केल्याने त्याला आराम व्हावा म्हणुनच त्याचे खांदे तेल आणि हळदीने शेकुन देतो.आपल्याला तेव्हा हे कळत नाही की वर्षभर काम करीत असतांना जे बैलाचे खांदे दुखतात,ते खरंच एकच दिवस शेकल्यानं बसेल काय?तरीही आपण आपल्या समाधानासाठी करतोय ते...त्यात बैलाचं हित नसतंच. बैलपोळा साजरा करणं हा आपला सण.वर्षभर राबणा-या बैलाला एक दिवस आराम मिळावा म्हणुन आपला या सणाच्या निमित्यानं का होईना व्रत पाळणे हा बहाणा.खरं तर खोलात जावुन विचार केल्यास तो बैलाचा सण वाटत नाही तर आपला स्वतःचाच सण वाटतोय.आम्ही बैलाचे खांदे शेकुन झाल्यावर दुस-या दिवशी त्याला चांगलं वैरण खावु घालतो.या दिवशी त्याला कामालाही लावत नाही.दुपारी लवकर त्याला सजवुन त्याला पोळ्यात नेतो.तसेच तोरण तुटताच त्या बैलांना धावत आणुन त्यांना घरोघरी फिरवतो.या लवकर घरी आणण्याच्या गडबडीत काही मंडळी याच बैलाला प-हाणी टोचतांना बरेच जण दिसतात.

  ज्या बैलाला एक दिवस आराम मिळावा म्हणुन त्याला कामाला लावत नाही,त्याच बैलाला पोळ्यातुन घरी लवकर नेतांना प-हाणी टोचणे हे बरोबर नसले तरी त्या बैलमालकांना बरोबर असल्याचे वाटते.घरी कारभारणीला लवकर पुजा करायला लावुन चार घरी या बैलाला पुरणपोळी जेवायला मिळावी म्हणुन जेव्हा आपण फिरवतो.तेव्हाही बैलाला चांगले मानण्याची माणुसकी दिसत नाही.त्या बैलाची जरी ती पुरणपोळी खायची इच्छा असेल तरी ती खावु न देता आपल्याला पैसे मिळावे,ते जास्त मिळावे नव्हे तर जास्त घर फिरल्यावर जास्त मिळतील ह्या स्वार्थी हेतुने बैलाच्या भावनांचा बळी देत चक्क जास्तीत जास्त घर फिरवतो.त्यात नुकसान बैलाला जीवहारी जरी लागत असले तरी ते आपल्याला नुकसानदायक वाटत नाही.कारण आपल्याला पैसे जास्त मिळतात ना...यात आपण बदनामही होत नाही.कारण ते जरी दान मागत दारोदारी आपण फिरत असलो तरी ते बैलाच्या नावाने असल्याने आपल्याला असे दारोदारी फिरणे योग्य वाटते.आपणाला मिळालेल्या त्या पैशाचा कोणता उपयोग होतो?ही आता मात्र विचार करायला लावणारी बाब आहे. ह्या मिळालेल्या पैशाचा उपयोग शेतकरी मंडळी त्या बैलासाठी न करता अंधार पडताच बैलं बांधुन रात्रभर जुव्वा खेळण्यात वापरतांना वैषम्य वाटतं.पोळ्याला गावात दारुबंदी राहात असुनही दोन चार दिवसापुर्वीच दारु घेवुन ठेवुन दारुचा एक घोट घोट घेवुन जुव्याच्या अड्ड्यावर पैशाची खैरात उडत असते.त्यातच एखाद्या वेळी पोलिसांची धाड पडताच आम्हाला काही दिवस कारागृहात सडावं लागतं किंवा जमानतीवर राहुन न्यायालयाच्या चकरा तरी मागाव्या लागतात.एवढंच नाही तर जमानतीसाठी पैशाची जुळवाजुळव करतांना कित्येक स्रीयांचे आजही मंगळसुत्र गहाण पडलेले आहेत.नव्हे त्या शेतक-यांच्या पत्नीची इज्जतही...

  आज सावकारी पद्धत बंद झाली असली तरी आजही गावातील श्रीमंत माणसे अशा प्रकारची लेण देण करतात.तिच्या पतींना तर सोडवतातच,पण बदल्यात पतीला न माहीत करता इज्जतीचा सौदा करतात.बिचारी लाचार महिला आपल्या जुवारी,दारुडा पती का होईना त्यांच्यासाठी आपल्या इज्जतीचा सौदा करते.खरं तर याची त्या शेतक-यांना लाज वाटायलाच पाहिजे.हा पोळा तिच्यासाठी कर्दनकाळ आहे.एवढेच नाही तर आपल्याला फक्त जुव्यामध्ये पांडव पुर्ण राजपाट हारले होते हेच माहीत आहे.इथे तर पोळ्याच्या निमित्यानं भरलेल्या या जुवाजत्रेत हीच मित्र मंडळी फासे चुकीचे टाकत जेव्हा रडीचे डाव जिंकतात,तेव्हा ते घरदार सोडा,चक्क त्या मुर्ख शेतक-यांच्या पत्नीचाच सौदा करतात.नाईलाजानं व आपली बदनामी होवु नये.म्हणुन या स्रिया आपल्या अब्रुचेही निघत असलेले धिंडवडे आजही उघड्या डोळ्याने सहन करीत आहेत.जुव्याची झळ फक्त जुवा खेळणा-या माणसालाच सहन करावी लागत नाही तर सर्वांनाच सहन करावी लागते.मग ती पत्नीच नाही तर मुलंबाळंही.यात कित्येकांची घरंदारही गेलेली आहेत.काही काही जुव्वे उधारीनेही खेळली जातात.यात उधारी झालेली रक्कमही शेतक-यांना फेडायची असेल तर शेतच गहाण टाकावं लागतं.जो जिंकतो,त्याला फायदाच फायदा होतो.पण जो जिंकत नाही त्याचं काय?

  पोळा हा बैलाचा सण आहे.जुवा खेळण्याचा आणि दारु पिण्याचा सण नाही.या जुव्यामुळे अधिकतर संसार धुळीस मिळतात.कधीकधी याच जुव्याच्या माध्यामातुन मित्रामित्रात वैमनस्य निर्माण होवुन त्याची परियंती एकमेकांच्या खुनात होते.एवढा पोळा विचित्र अनुभवावयास मिळतो कधीकधी......एवढेच नाही तर सकाळी जी मारबत किंवा बडग्या हाकलण्याची परंपरा आहे.त्यात असंख्य शिव्यांची लाखोली वाहात मारबत हाकलली जाते.तसेच विशेषतः ग्रामीण भागात मारबत शिवेवर नेल्यानंतर चिलीमीत किंवा सिगारेटमध्ये चरस,गांज्या पिवुन मुलाबाळांचे स्वप्न धुळीस मिळवले जात आहेत.

  आम्ही लहान होतो तेव्हा आम्हीही घरोघरी नंदीबैल फिरवत होतो.त्याला आम्हाला पाच पैसे दहा पैसेच तेवढे मिळायचे.चार आणे खुप मोठे वाटायचे.ते पैसे गोळा करुन त्या पैशात आम्ही शाळेचा खर्च भागवीत होतो.आताचीही मुले भागवत असतीलच.वडीलधारी मंडळींनीही आमच्या या बालगोपाळांकडुन बोध घ्यायला हवा.जुव्वा खेळणे,दारु पिणे,चरस गांजा ओढणे या वाईट गोष्टी.मग ते पोळ्याच्या निमित्यानं का होईना.......आपणाला तसले वाईट शौकं करण्याची गरज नाही.आज आपण आपला दृष्टिकोण या बैलाप्रतीही बदलवला आहे.आम्ही आज बैलाला भाव न देता चक्क ट्रँक्टरला भाव देत आहोत.ट्रँक्टरलाच बैल मानत पेरणी करीत आहोत.काही दिवसानं बैल म्हणुन चक्क बैलाचं महत्व कमी करणा-या या ट्रँक्टरला पैसे मागण्यासाठी फिरावे लागेल घरोघरी.कारण आम्हाला जुव्याची आदत पडलेली आहे.पैसा कुठून येणार!

  या ट्रँक्टर क्रांतीमुळे आम्ही बैल विकतो तेही कसायाला.आमच्या ह्रृदयातील आधारस्तंभ...... जीवनभर ज्या बैलानं आम्हाला आधार दिला.आमचा संसार पोषला.फुलवला.त्या बैलाला छळतो आम्ही.त्याने केलेले उपकारही विसरतो.अन् त्याला त्यांचं काम संपताच कापण्यासाठी दोन पैसे मिळतात म्हणुन विकतो.हे काही बरोबर नाही.तरीही हा सौदा.खरं तर पोळा मानणा-या माझ्या शेतकरी बांधवांनी या पोळ्याच्या निमित्यानं शपथच घ्यायला हवी की आम्ही काहीही झाले तरी चालेल,पण आमच्या घरचे बैलं कसायाला विकणार नाही.

   मित्रांनो, पोळा हा आपलाच सण आहे.तो आनंदाने साजरा करावा.पण त्या निमित्यानं बैलाला तसंच स्वतःला त्रास देवु नका.आज आपण आपला पोळा सण साजरा करतोय.पोळ्याला बैलाचा सण समजतोय.त्याला एक दिवस का होईना आराम देण्याचा सण समजतोय.मग त्याला कसायाला विकु नये.त्यांच्या शेणापासुन शेणखत मिळतं.ते शेतीला उपयोगी पडतं.त्याच्या मुत्रातही वेगवेगळे असाध्य रोग नष्ट करण्याची ताकद आहे.ते तंत्र शिकुन घ्या.ट्रँक्टर आलं म्हणुन काय झालं.हलकी फुलकी कामं तरी बैलाच्या साहाय्यानं करुन घ्या.तो तुमचा जीवलग मित्र आहे.बदल्यात काहीही न मागणारा.ट्रँक्टर तरी डीझल मागतं.पण बैल काहीही मागत नाही.हे या पोळ्याच्या तरी निमित्यानं लक्षात घ्या.नाहीतर काही दिवसांनी बैलं नष्ट होतील.बैल चित्रातच दिसेल.मग नवल वाटेल आणि म्हणण्याची पाळी येईल पोळा खरंच बैलासाठी होता ना....!

   -अंकुश शिंगाडे
   ९३७३३५९४५०
   (संस्कार)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code